शनिवार, १३ मार्च, २०२१

गीत....लेखणी सखी अशी

काव्य स्पंदन राज्य स्तरिय  02
दैनिक उपक्रम 
भावगीत लेखन
विषय -- लेखणी सखी अशी


वाटे जवळची मला लेखणी सखी अशी । 
किती आवडे मला ती सांगू  शब्दात कशी ।। 

  भाव माझ्या  मनीचे तीच जाणिते क्षणात
  झरझर शब्द झरती जरा येताच मनात 
आहे गुणी लाडकी घेते जुळून सदा जनांशी   
किती आवडे मला ती सांगू शब्दात  कशी         1

तिच्या विना  मला पळ पण सुचत नाही  
नजरे समोर न  येता तिजला शोधत राही 
पहा नुसत्या विचाराने जीव येई  कंठाशी 
किती आवडे मला ती सांगू शब्दात कशी         2

किती कवितेत तिने दिधली मजलाच साथ
लिहीतांना मला वाटे तीच देतसे मला हात
तिच्या बळावर रहाते मी निवांत लेखनाशी        
किती आवडे मला ती सांगू शब्दात कशी  । ।       3


वैशाली वर्तक
अहमदाबाद

बुधवार, १० मार्च, २०२१

स्वप्न विषयक अष्टाक्षरी१ स्वप्नातीलजग,२ स्वप्न मनीचे.३ )सहाक्षरी भोगलेले स्वप्न,



अ भारतीय मराठी साहित्य परिषद 2
आयोजित उपक्रम क्रमांक 703

१)विषय.. स्वप्नातील जग

काल  पाहिले स्वप्नात 
मन माझे  आनंदले
केले वंदन देवाला 
काव्यातून रेखाटले.
        
माझे  स्वप्नातील जग
मनोहर रमणीय
जन  घेतात काळजी
राखण्यास  लोभनीय

विश्व शांतीचा एकची
सर्व  जगी नांदे भाव 
जन गुण्या गोविंदाने
नसे कुणा दुःख  ठाव


नाही कोणीच उपाशी
सर्व जनांना निवारा
समजून राही जन
कुलुपाचा न पहारा

जन जपतात नाती
विश्व बंधु भाव मनी
संस्कृती ची परंपरा
दिसे सदा क्षणोक्षणी

 रोज येती सांजवेळी
ऐकायला  पसायदान
देई  संदेश जगाला
विश्व शांती  योग्य दान

वैशाली वर्तक
अहमदाबाद

२)विषय ...स्वप्न तेचि लोचनी

     अष्टाक्षरी


     *मनीचे स्वप्न*


होता  पाहिला स्वप्नात

मनातला. साथीदार                     

जसा हवा तसा होता

झाला  आनंद अपार    1


उंच पुरा राजबिंडा

 मनी भासला मिळावू 

 मनी भरला पाहता

वाटे जाऊनी   खुणावू.   2


स्वप्नातील  संवादात

विद्याधर. उमजले 

*स्वप्न माझ्या लोचनीचे*

हळुवार साकारले             3


भेटलाच  अवचित

केले संवाद  भाषण

दिली मनाची संमती

वाढले ते आकर्षण .    4


स्वप्नात  मी रंगलेली

पाहुनिया गोतावळा

जन कौतुके वदती

छान जाहला सोहळा     5


प्रातः पूजेच्या घंटेचे   

ऐकू आले स्वर कानी

जागी झाले स्वप्नातूनी

क्षणार्धात आले ध्यानी.      6


वैशाली वर्तक


३)भंगलेले स्वप्न

   
आवडे मजला
स्वप्नात रंगणे
नित्य रंगे नवे
स्वप्नची देखणे

काढले सुंदर 
चित्र  मी नवीन
वाटले मजला
झाले मी प्रवीण

स्पर्धेत चित्रास
धाडणे उचित 
येईल नंबर
चित्राचा खचित

स्वप्न लागे रंगू
विचारी  मनात
सर्वोत्कृष्ट माझे
असेल सर्वात 

पण अचानक
रंगाचा कुंचला
पडे चित्रावर
विचार  खचला

रुपच चित्राचे
मजला गमेना
स्वप्न रंगविले 
काहीच सुचेना

स्पर्धेच्या स्वप्नात
उगाच रंगले
भंगलेले स्वप्न 
नसते दिसले

जागे होता कळे
अरे हे स्वप्नात
चित्र तर आहे
 माझे प्रत्यक्षात 


वैशाली वर्तक




अहमदाबाद


मंगळवार, ९ मार्च, २०२१

स्पर्श षडाक्षरी..../निशु शब्दिका ...स्पर्श

अ भा म सा प स्वप्न गंध समूह  आयोजित  सराव उपक्रम
षडाक्षरी काव्य  लेखन
विषय- स्पर्श

  *विविधता स्पर्शाची*

पहिलाच स्पर्श 
असतो मातेचा
वाटे जिव्हाळ्याचा 
जीवास मायेचा

माध्यमे प्रेमाची
स्पर्श वा कटाक्ष   
भाव  अंतरीचे
दाखवी चाणाक्ष

प्रेमळ स्पर्शाने  
मनास उभारी
घेण्या जीवनात
सदैव भरारी

स्पर्शण्या जलाला
अवनी अतृप्त
 मेघ बरसता
 होत असे  तृप्त

सागरीच्या  लाटा
येती उसळूनी
स्पर्शता किना-या
विरती लाजूनी

विठु दर्शनाची
स्पर्शण्याची आस
चोख्याला लागली 
मनी एक ध्यास

अजून स्मरतो
स्पर्श तो सख्याचा
बेधुंद केलेला
हर्षीत मनाचा

वैशाली वर्तक
अहमदाबाद




सोमवार, ८ मार्च, २०२१

निसर्ग ... निसर्ग किमया दशाक्षरी. 2. ऋतुचक्र


    निसर्ग  किमया
 दशाक्षरी रचना
शब्दसेतू  रविवारीय उपक्रम

निसर्गाची  किती पहा कृपा
तोची आहे जगी एकमात्र
गर्मी थंडी वर्षा घडवितो
त्याची सत्ता दिसे दिन रात्र 

येता रवी हसली वसुधा
नभी उधळण केशराची
ऐका किलबील ती पक्षांची
थंड  मंद झुळुक वा-याची

येता वर्षा रूक्ष वसुंधरा
पहा कशी नटली सजली
रंग तियेचा एक  हिरवा
तृणांकुरे पहा अंकुरली

सुनील नितळ जलाशय
तितकेच नभ मनोहर
मंद पवने वृक्षे डौलती
उंच उभी शिखरे सुंदर 

ओहळ वाहती खळखळ
भासे जणु शुभ्र दुग्ध धारा
लोभस  सृष्टीच्या नजाराचे
गाणे गातोय खट्याळ वारा


निसर्गाचे किती गुणगान
तयानेच घडविली सृष्टी 
माना त्याला ईश्वर समान
हवी त्याचीच कृपेची दृष्टी 

राहो निसर्गाचा समतोल
नाहीतर  न दिसे सुकाळ
कधी न व्हावा  असमतोल
अती वृष्टीने ओला दुष्काळ

प्रलय भुकंप ही कोपाची
नको कधी तो कोप ईश्वरा
अशी कारणे सृष्टी  नाशाची
सदा ठेव सुखी विश्वंभरा

वैशाली वर्तक 
============================&=&=
ऋतू चक्र 

निसर्गाची पहा कृपा

तोची आसे एकमात्र

कधी गर्मी कधी वर्षा

त्याची सत्ता दिन रात्र 


येता  वर्षा रूक्ष धरा

पहा कशी बहरली

ओली चिंब होता माती

तृणांकुरे अंकुरली


वृक्ष लता वेली सा-या

दिसे हिरवे सर्वत्र 

शालू  हिरवा धरेचा

रंग तिचा एकमात्र


रुप भूमंडळाचे ते

बदलले पहा कसे 

दिन सुगीचे ते येता

रुप नवे शोभतसे


होता पाने ती पिवळी

जागा करी हिरव्यास 

नियमच तो सृष्टी चा

होत नाहीत उदास 


शरदाची  पानगळ 

निस्तेजता वृक्षावरी

पाचोळ्याच्या पसा-याने

पीत रंग भूमीवरी


मोहरेल तो बहावा

फुटे नव पाने वनी

नव चैतन्याची सृष्टी 

फुले वसंत तो मनी


ऋतू मागूनी ऋतू ते 

बदलत जाती असे

निसर्गाची ही किमया 

भूमंडळी  शोभतसे


वैशाली वर्तक 

अहमदाबाद









शनिवार, ६ मार्च, २०२१

अष्टाक्षरी आनंदाच्या गावा जाऊ

शब्दसेतू साहित्य  मंच

*आनंदाच्या गावा  जाऊ*


वसलेले एक गाव
जाऊ मिळूनिया सारे  
आहे गाव मनोहर
चमकते पहा तारे

कशी कालची कलिका
उमलली हळुवार 
केला परिसर सारा
 सुगंधित अलवार


 झाली गंधित पहाट
वारा लागे कुजबुजू
पाखरांची किलबिल
झाल बघा झुंजूमुंजू


कशी उडती रांगेत
आभाळात  दिसे  नक्षी
जणु माळ ओवियली
मनोहर दिसे पक्षी

शोधा मोद दडलेला
आहे   तो चरा चरात
 फुले  पाहताच वाटे
 सदा आनंद मनात


कसे निरागस हास्य 
दिसे  बाळ  मुखावरी
हासे हात पसरुनी
किती गोड  पहातरी

 हीच  आनंदाची सारी
गावे आहे सभोवती
चला  जाऊयाआपण  
 घेता समजूनी महती


वैशाली वर्तक

शुक्रवार, ५ मार्च, २०२१

गृहीणी



पेलते जवाबदारी घराची
 प्रवेशिते माप ओलांडूनी 
होते पती गृही गृहिणी
वावरते लाजूनी लाजूनी

तीच सावरे  घराला
 मोठा  तिचाच आधार 
घरपण देते घराला
 पेलून कुटुंबाचा भार

पै पाहुण्यांचा करते आदर
किती रुपात वसे गृहिणी 
चिंता तिला सा-या घराची
कधी बहिण ,आई, वा  वहिनी

आधुनिक गृहिणी तर
आहे शिक्षीत कर्तृत्वान
संभाळुनी घरपणाला
जगात  मिळवे  सन्मान .

 गृही  नसता गृहिणी 
घर भासे लगेच भकास
जाते   घराची शोभा
 कुटुंबजन होतात उदास

वैशाली वर्तक

पुस्तक (पंचाक्षरी)

रोही पंचाक्षरी समूह आयोजित 
रोही पंचाक्षरी काव्य स्पर्धा

विषय - पुस्तक

करा वाचन
सदा पठण
ते अज्ञानाचे
करे हरण          1


ज्ञानाची खाण
अगाध छान
पुस्तकातील 
घ्यावे हो ज्ञान       2

वाचावे ग्रंथ
सांगती संत
मिळवा ज्ञान
मिळे सुपंथ         3

मनीची आस
हवा हो ध्यास
वाचनालय
त्यासाठी खास      4

नसे लहान
असे महान
पुस्तकं देते
जगी सन्मान      5

असे सोबती
करी गंमती
वाचनासाठी
नको संमती        6

मनोरंजन
बुध्दी व्यंजन
ज्ञान वर्धन
मानती जन           7

येताची घरी
पुस्तक  करी
आनंद वाटे
तो क्षणभरी    8

वैशाली वर्तक

अलिप्तता व दुर्लक्षता

अलिप्तता आणि दुर्लक्षता. तसे पहाता दोन्ही   प्रवृत्ती.वेगवेगळ्या आहेत.  .मनुष्याच्या स्वभावाची जडण घडण ही  तो लहानाचा मोठा   होतो.          ...