गुरुवार, २५ जानेवारी, २०२४

माझ्या मनातले ध्वजारोहण

 माझ्या  मनातील ध्वजारोहण


 सकाळी चालायला जाऊन परत येत होते. रस्त्यात  एका शाळेच्या मैदानात 

ध्वज रोहणाचा कार्यक्रम  चालू होता. हो ! 15 आॕगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन त्या दिवशी ध्वजा रोहण  असते.  दोरी द्वारे झेंडा खालून वर चढविला जातो. व फडकवला जातो .म्हणून ध्वजा रोहण. ...तर ते होऊन  राष्ट्र गीताचे स्वर कानी पडले. मी होते तिथे च फूटपाथवर राष्ट गीताच्या सन्मानास उभे राहून राष्ट्र गीत म्हटले व मग पुढे चालू लागले. 

      मी पुढे  चालत  असता  स्वतः शाळेत असतानाचे  स्वातंत्र्य  दिनाचे दिवस 

डोळ्यासमोर उभे राहिले. सकाळी तयार होउन शाळेचा गणवेश घालून जायचो तसेच आईने स्वातंत्र्य  वीरांनी लिहून दिलेले भाषण बोलायचे.   अनेक विद्यार्थी  वकृत्व करायचे..अध्यक्षांचे ....मग हेड मास्तरांचे वगैरे भाषणे व्हायची. काय मजेचे आनंदाचे  दिवस ..वेगळाच उत्साह असायचा. एक तर त्या दिवशी दप्तर नाही अभ्यास नाही .स्वातंत्र्य वीरांची भाषणे ऐकून हृदय भरुन यायचे. कारण सारे आपण स्वातंत्र्यात  जन्मलेले.पारतंत्र्याची झळ न सोसलेले. 

      पुढे महाविद्यालयात  तर  घरीच असायचो. रजाच असायची. पुढे बँकेत लागल्यावर  2/4 वर्ष  कौतुकाने गेलो ध्वज वंदनास पण रहात्या सोसायटी त

मात्र  नेमाने जाते. छान शिस्तबद्ध  ध्वज वंदन होते. 

      पूर्वी  रेडीओ प्रसारणातून पंतप्रधानांचे भाषण ऐकायचो .पुढे दूरदर्शन  आल्याने पुन्हा  या दोन्ही(  स्वातंत्र्य  दिन व प्रजासत्ताक  )दिनाची  रोनक सरळ घर बसल्या अनुभवण्याची मजा औरच येत आहे.  कित्येक  जण हा सोहळा पहाण्यास 

थेट दिल्लीला  पण जातात. खरच एक देशभक्तीचे दर्शन घडते. 

       काय ती लोक होती ज्यांनी घरदार  संसाराचे रान करुन  देशासाठी जीवन

अर्पण  केले होते. बलिदान केले होते. त्यांच्या  स्मृतींचे स्मरण होऊन आपोआपच  नतमस्तक होते. याच ध्वजाला हाती घेऊन फासावर हसत  चढले. स्वातंत्र्य प्राप्तीच्या वेडाने ती झपाटलेली होती.  ते मिळवणे हेच ध्येय ठरले होते. व त्या सा-यांच्या प्राणांच्या आहुतीने आज हा दिन दिसला. आता  स्वातंत्र्य  पण पहाता पहाता 74 वर्षाचे झाले.

       हे सर्व  विचार मनात येत होते व मी कधी घराशी आले कळलेच नाही. 

विचारांच्या  तंद्रित मी किती तरी ध्वज रोहणे मनात अनुभवली . दाराशी येते तर नातू शाळेतून येऊन  मला शाळेतील ध्वजारोहणाचा अनुभव सांगण्यास उत्सुकतेने  वाट पहात होता. तो आनंदाने आधी वदला "भारत माताकी जय".माझे ही मन देशभक्तीने भरुन आले.

बुधवार, २४ जानेवारी, २०२४

लेख..V घराचा कोपरा



 घराचा कोपरा

    माझ्या घराचा प्रत्येक कोपरा न कोपरा मला आवडतो. प्रत्येक जागी काही विशेषता आहे. घराला
पुढे  छान लॉन आहे.  बरीच फुले झाडे आहेत. वर ,खाली ,साईडच्या अंगणात झोपाळा पण आहे. 
झोपाळ्यावर झुलत बसणे फार आवडते. किती वेळ फोनवर गप्पा मारायला ..तर कधी आवडती गाणी ऐकत बसायची मनमुराद हौस पुरी होते. 
   हे सारे असून लॉनच्या उजव्या बाजूच्या कोपऱ्यात खूर्ची  ठेवून, रोपांकडे पहात , रोपांचे निरीक्षण
करणे, कुठल्या रोपास वाढीसाठी काय हवे नको पहाणे ... त्यांच्यावर प्रेमाने हात फिरविणे,
हा छंद झालाय. कुठल्या रोपास कळी बसलीय. उद्या फुल उमलेल  त्याची वाट पहाणे,
आणि सकाळी कळ्यांची फुले पाहून मन आनंदाने ने पुलकित होते. या निसर्गात मी तासन् तास
रमते. आधी सर्व लाॅन झाडून  एकही पिवळे पान दिसणार नाही,  सर्व अंगण निव्वळ हिरवेगार. जणु
हिरवे कार्पेट टाकलंय असे दिसायला हवे हा माझा अट्टाहास असतो. त्यासाठी मी खूप मेहनत घेते.
आणि त्या कोपऱ्याची खास काळजी घेते कारण ती खुर्ची तो कोपरा माझ्या साहित्याचे स्फूर्ती स्थान
आहे. 
थंड वा-याची येई झुळुक
करी मनाला प्रफुल्लित
 येती विचार मनात माझ्या 
जे करीती लिखाणास उत्तेजित
     सकाळीची मंद झुळूक ... त्या झुळुके सरशी डौलणारी रोपे पाहून वाटते की पाने जणु
आनंदाने टाळ्या वाजवीत आहेत. व त्यासरशी मलाही नवनव विचार कल्पना सुचतात.
याच खूर्ची तर बसून मी अनेक काव्य रचना केल्या आहेत. किती गद्य लेखन ..  ललित
लेखन ..कथा लिहिल्या आहेत. .
   एवढंच काय आजवर येथेच रचलेल्या कविता मी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात
सादरीकरण पण केल्या आहेत. बडोदा, यवतमाळ  गेल्या वर्षी चे साहित्य संमेलन वर्धा ....
सा-या सा-या कविता जन्मल्या त्या याच कोपऱ्यात.  माझ्या अंतर्मन काव्य स़ंग्रहाच्या
अधिकाधिक रचनांची हा कोपराच जन्मभूमी आहे.  तेव्हा ह्या कोपऱ्याचे विशेष कौतुक असणार च ना?
      आणखीन  सांगायचे की, मधेच मी  कोप-यात बसली असता खारुताई चपळता दाखवून जाते. दोन सेकंद थांबते न थांबते   तोवर.. गवतातून काही शोधून खाते व लगेच  चपळतेने पळून जाते. सतत तेथे मी बसते त्यामुळे ती पण आता निर्ढावली आहे. तिचा माझा रोजचा जणु परिचय झाल्याने मध्यंतरी तिच्या वर पण मी बाल कविता लिहिली होती. जी  बाल विभाग मधे  बाल मासिकात प्रकाशित झाली.
      तसेच या कोपऱ्यात मी पक्ष्यांसाठी पाण्याचे दगडी भांडे ठेवले आहे.  सकाळी त-हे त-हेचे पक्षी
पाणी पिण्यासाठी येतात. तेव्हा तर फारच मजा येते . मोठे पक्षी येतात ते लहान पक्ष्यांना गणकारत नाही .. लगेच लहान पक्षी त्यांना जागा करून बाजूला होतात.. मधेच बुलबुल तर ...साळुक्या  तर मधेच
लहान चिमण्या... असे पाणी  पिण्यासाठी येतात . पक्षी त्यांचे तन पाण्यात बुडवून मस्त पाणी उडवत स्नान करतात..मधेच धिटुकली खारूताई पण पाण्यासाठी सरसावते
असा सकाळी बर्ड शो चालू असतो. अशा मस्त वातावरणात कोणी ही सहजची रमेल अशी जागा माझी
खुर्ची.. कोपरा आहे. सकाळचे ऊन खात  व्हिटॅमिन डी घेत माझी लेखणी सरसावत असते.
        मधेच बाजूच्या झाडाचे पिकलेल पान ऐटीत गिरक्या घेत खाली येते .ते पाहून सहजची पिवळे पान
 वा  निसर्ग नियम... पिवळी पाने कशी हिरव्या पानांना जागा करून देतात. याची  सहजतेने कल्पना
येते. व पानगळ नंतर  वसंत येणार.  निष्पर्ण झाड पुन्हा बहरेल यांची जाण होते.
  असा हसत खेळत  सृष्टीचा खेळ  पहात...सहज निसर्गाची जाणीव करणारा.... माझा कोपरा आहे.
      त्या कोपऱ्यात कधी साथीदार डास पण असतो हं. बारीक चिलटे. पण रक्त शोषून जातात
मग मला सुचते 

  अशा निर्मळ  वातावरणी
 गुणगुणे हळुच डांस कानी
भुणभुण त्याची असता चालू 
दुर्लक्षित करते मोठ्या मनानी

      तेव्हा असा हा कोपरा खरच स्फूर्ती दायी आहे. म्हणून मला तो अतिशय आवडतो. तुम्ही पण या
एकदा सहजच ,तुम्हाला पण आवडेल खचितच. मी एवढेच म्हणेन की

आवडीचा कोपरा असे 
लाॅनच्या अंगणातील खूर्ची
जिथे बसता मजला मिळे
विचारांची सदा स्फूर्ती .


वैशाली वर्तक

सोमवार, २२ जानेवारी, २०२४

राम वसावा या मनी

स्पर्धेसाठी
काळीज माझे साहित्य सामाजिक संस्था
उपक्रम क्रमांक 3
दि 22/1/24
काव्य प्रकार अष्टाक्षरी
विषय..राम वसावा या मनी
   शीर्षक.. अंतरीची ईच्छा 

ध्यानी मनी स्मरे राम
सुख  लाभते स्मरणी
तव नावाचे रटण
राम वसावा या  मनी.

मुखी घेते सदा नाम
विसरते देहभान.          
आसावला जीव वेडा
गाते तव गुणगान    

राम नामाचा गजर
चाले आज देशभर
डोळे बघ झाले तृप्त 
दर्शनाने पळभर
   
मन   जाहले प्रसन्न
येता अयोध्या नगरी
दर्शनाला  मी आतुर
आस धरूनी अंतरी

रामा तव दर्शनाने
 किती आनंदले जन
करी आनंद सोहळा
प्रफुल्लित तन-मन

राम वसला ग मनी
रूप त्याचे चित्ती ठसे
मन माझे संतोषले
आनंदाला सीमा नसे.

वैशाली वर्तक
अहमदाबाद

रविवार, २१ जानेवारी, २०२४

स्नेहाचा गोडवा

वर्ल्ड व्हिजन टाईम्स मुंबई मधे प्रकाशित 

 KA मराठी प्रेरणा प्रतिष्ठान आयोजित भव्य राज्यस्तरीय  मकर संक्रांती निमित्त काव्यलेखन स्पर्धा

*स्पर्धेसाठी*


विषय.. स्नेहाचा गोडवा 

शीर्षक .. वाणीत हवा गोडवा


 वाणी असता मृदुल 

त्यात स्नेहाचा गोडवा

मग काय विचारता 

जगी  ठरतो तोची बरवा


स्नेह भाव सदा मनी 

वाणीत  साखर थोडी

सन्माननीय  ठरतो जगती

कोण करेल उगा कुरघोडी


 भारतीय संस्कृतीच अशी

देई सहज शिकवण,

वाणी महत्त्व सणातून

तिळगुळ देता  जिंकती  मन.


जुनी कटुता सारूनी

स्नेह तिळाचा , गुळाची गोडी

घट्ट बंधन जिव्हाळयाचे

 प्रेम भावाची सदा जोडी


असे सणांचे महत्त्व

सांगे आपली संस्कृती

तीळगुळ घ्या गोड बोला

जाणा स्नेह गोडव्याची महती


 वैशाली वर्तक

अहमदाबाद

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...