सोमवार, ९ फेब्रुवारी, २०२६

वृत्तबद्ध ... पादाकुलक वृत्त. 8). 1पहिली वही. पहिली कविता) 2क्षणाक्षणा3..4..पानगळ.

 
विश्व लेखकांचे साहित्य मंच पुणे प
आयोजित दोन दिवसीय उपक्रम 
9/2/26

(1)

विषय ...पहिली वही
पादाकुलक वृतांत


सहज काढला ,आवरायला
निवांतात खण ,फडताळाचा
हाती आली, रोज टिप्पणी 
हर्ष मिळाला, गतकाळाचा

उचलुनी वही, घेता हाती
भरभर टिपली , सारी पाने
दिसली मजला, माझी कविता 
वाचन केले, आनंदाने 

जागी झाली, जुनी आठवण
पहिली वाचक , होती आई
 कौतुक केले,  तिने  तोंड भर
तिला दावण्या माझी घाई.   

  हसू  वाचुनी आता येते
लिहिली कैसी , मला कळेना
भाव मनीचे, कसे उतरले
अजून मजला, ते उमजेना 

नीट लावले  कपाट सारे
पण दिन सरला, आनंदाने 
 ताज्या झाल्या  आठवणी त्या 
उजळा दिधला् आवरण्याने..

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

(2 )

२९\१\२६
वृत्त..पादाकुलक
    क्षणा क्षणाने

 काळ पुरुष तर, चाले अविरत 
उषा आजची न येते परत

दिवस आजचा,संपेल क्षणी.     
गत काळाची, सय नको मनी

क्षण न पाहतो, रंक व राजा
कधीच न करी , गाजावाजा ,

सुखी क्षणांना , झणी लुटूया,
क्षण जो आला ,मौज करूया. 
 
 क्षण सरताची,उल्हासाचा 
तोची पुन्हा.  न परतण्याचा 

                  
निसटे वाळू,  . हातामधुनी
क्षणही सरतो  जीवनातुनी.               

दिवस आजचा,हा सोन्याचा 
विचारच नको,काल उद्याचा    


वैशाली वर्तक 
 अहमदाबाद


(3)

पादाकुलक

नाही भरवसा क्षणाचा      


 आहे अगदी खरेची कथन

 नसे भरवसा कधी क्षणाचा

 निसटते जशी  रेत   हातची

वेळ हा सरे आयुष्याचा


  येईल खचित  उद्या  दिवाकर

  शुभची सकाळ  करण्या  मंगल

   तोच आजचा सुख शांतीचा

आला क्षणची करण्या चंगळ


   दिन तर सरती   क्षणा क्षणाला 

   नको रहाया मनात आशा 

   नसे भरवसा कधी क्षणाचा

   नकोच पदरी उगी निराशा

  

देवे दिधला. जन्म  मानवी

विचार करण्या असेची मती

 बहाल करिता  मेंदू त्याने

वाढव आता कामात गती


   काळ हातचा क्षण भाग्याचा

 नको पहाणे वाट उद्याची

 गवसत नाही दुसरी संधी

ही खरी असे  रीत यशाची. 

वैशाली वर्तक


( 4..)

वृत्त पादाकुलक

(पद्मावर्तनी समजाति)

मात्रा८-८=१६


  शीर्षक.माझे मला कळेना



समोर दिसता  रोज टिप्पणी     

मनात आले विचार काही 

करून वंदन  सरस्वतीला

लिखाणास मन उत्सुक राही


 शब्द मनीचे  झरू लागले

 ओवत गेले  मी शब्दांना 

 सहज जाहली तयार कविता 

झरू लागता शब्द फुलांना.           


मलाच माझे नाही कळले

कशी प्रसवली मजला कविता 

पठण करूनी पुन्हा पाहिली 

जना भावली माझी रचिता 


देत चालना कल्पकतेला  

 नेहमी स्फुरे  पहा लेखणी.

छंदच जडला आता मजला

झरणी माझी  दिसे देखणी


विचार येता शब्द गुंफता

शब्दकार मी कशी जाहले

नित्य लिहीणे सराव घडिता.

मलाच माझे नाही कळले


वैशाली वर्तक 

अहमदाबाद

 (5.)   शिव शंकरा


पादाकुलक

    शीर्षक.    शिव शंकरा

आज शंकरा ,  तव नामाचा
महिमा   गर्जे ,  मुखी निरंतर 
करूनी तुला   वंदन सारे
तुझिया नामें चालला गजर.     1

कैलासीचा,  असशी  राणा
जटेत गंगा , तूची धारी 
उमा पती तू ,त्रिनेत्र देवा
भव भय व ताप , दुःखे हारी.   2

भक्ती भावे, करण्या पूजन
देऊळी जन, झाले गोळा,
वाहण्यास तुज, त्रिदली पाने
अपूर्व भासे. आज सोहळा.        3. 

आला धावत उदधि मंथनी
तूची देवा , विष प्राशियले 
कंठ जाहला  , रंगे नीळा
नीळकंठची ,नाम जाहले.         4 

आवड तुजला, . नृत्य कलेची
तांडव नृत्यी , त्रिशूळ धारक.
संकट येता ,  तव भक्तावर
तूची त्यांचा होशी तारक.           5


वैशाली वर्तक 
अहमदाबाद
 6.   पानगळ     पादाकुलक ८-८

ऐकू आली  सहजच कानी
 पानोपानी  हलके सळसळ
 शोभा गेली तरूलतांची
सुरु होताची पहा पानगळ

होता पाने   रंगे पिवळी
जागा देती हिरव्या पाना
नियमच असतो या सृष्टीचा 
होतच नाही   खेदची  मना.   


 घेता घेता गिरक्या पाने   
 पडती खाली जमीनीवरी
 मिळून जाती  मातीमध्ये 
 खत होवूनी  मग काम करी


शरदात पहा  दिसे  पानगळ
मरगळ भासे  तरू लतावरी
पाचोळ्याचा   पिवळा पिवळा
रंग सांडला  जणु भुमीवरी


ऋतुराज पहा वसंत येता.      
  सरली आता   सारी मरगळ 
   बहरती तरू परत नव्याने  
   विसरुन जाती   तरू पानगळ   

वैशाली वर्तक 
अहमदाबाद


****************************************
 ७). विषय कुटुंब 
कुटुंब माझा आधार 


कुटुंब नसते    चार जणांचे 
सहवासाने   लागतो लळा. 
स्नेहाचा अन,  प्रेमळतेचा
जीवलगांचा , गळ्याशी गळा                   

वळण शिस्त ती माय पित्याची
बाबा असती आधार खरा
भाऊ भगिनी   प्रेमळ नाते
ताई  वाटे  .प्रेम रुप झरा 

 खंबीर  सदा असती  भिंती 
स्नेह तर वसे , ठायीं ठायी    
साथ   देतसे  परस्परांना 
कुटुंब नांदे सुख सुख दायी

 नाती गोती कुटुंब  जपते
कुटुंब ताठा  तर  मनोमनी
हर्ष सदोदित तेची देते.         
मान वाढवी लोकात क्षणी

राहती सदा  एकजूटीने
विचार स्वार्थी  नसे कदापी 
 सुखीच राहो सर्व कुटुंबी
आळविती  जन ही आलापी


8) श्रावण मास 

श्रावण मास 
पादाकुलक वृत 
मात्रा 8-8


आला महिना नाचत गाजत
उधाण *आले* उत्साहाला 
असे सणांचा श्रावण महिना 
*उरे न* सीमा आनंदाला 

सण तो पहिला  *अवस दिव्याची*
पूजन  करूया  दिव्यादिव्याचे 
*तमा सारुनी प्रदीप्त  करिते*
भाव दाविण्या *कृतकृत्याचे*

नागपंचमी कृष्ण सोहळा 
सारे येती श्रावणमासी 
श्रावण महिना भावे सर्वां 
*असे* सणांचा *मास विलासी*
                             
*सखा भेटता राजा वरूण* 
हिरवाई ने वसुधा सजली
शेला हिरवा पांघरलेली 
हर्ष भरे  जणु नवरी नटली

गरजत बरसत या मेघानो 
नकोच नुसती गर्दी गगनी 
गडगड करिता बरसा सारे
वेळ शिवारी *देते धरणी*

काळे काळे ढग आकाशी 
कृष्ण मेघ ते करित गर्जना
झाली घाई तया बरसण्या 
रेघ दामिनी असे दर्शना






Count बरोबर आहे, गेयता वाढण्यासाठी, आणि एक काळ maintain करण्यासाठी...काही शब्द बदलले




वृत्तबध्द 
वृत्त : पादाकुलक
मात्रा : 8-8
शीर्षक :  शिव शंकरा

रोज शंकरा, तव नामाचा
महिमा गर्जे, मुखी निरंतर 
*करून तुजला* ,वंदन सारे
*जय जय शंकर, करीती  गजर*    1

कैलासीचा, एक तू  राणा
जटेत गंगे, *चा नजराणा* 
उमा पती तू ,त्रिनेत्र देवा
*दुःख हारितो, हा तव बाणा*   2

भक्ती भावे, करण्या पूजन
*जन देऊळी*,होती गोळा,
तुला वाहुनी, त्रिदली पाने
अपूर्व भासे, *पूज्य सोहळा*.        3. 

*तत्क्षण धावत* उदधि मंथनी
तूची देवा , *गरळ प्राशले*
कंठ जाहला, *रंगून नीळा*
नीळकंठची ,नाम जाहले.         4 

आवड तुजला,  नृत्य कलेची
*तांडव रचितो* , त्रिशूळ धारक.
संकट येता, तव भक्तावर
तूच तयांचा, होतो तारक.           5


वैशाली वर्तक 
अहमदाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

चित्र काव्य

मोहरली लेखणी साहित्य समूह आयोजित  उपक्रम क्रमांक 1615 29/8/26 चित्र काव्य    *निवांताच्या गप्पा*  उभ्या दोघी शेजारणी   गप्पा कधी...