माझ्या मनातील ध्वजारोहण
सकाळी चालायला जाऊन परत येत होते. रस्त्यात एका शाळेच्या मैदानात
ध्वज रोहणाचा कार्यक्रम चालू होता. हो ! 15 आॕगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन त्या दिवशी ध्वजा रोहण असते. दोरी द्वारे झेंडा खालून वर चढविला जातो. व फडकवला जातो .म्हणून ध्वजा रोहण. ...तर ते होऊन राष्ट्र गीताचे स्वर कानी पडले. मी होते तिथे च फूटपाथवर राष्ट गीताच्या सन्मानास उभे राहून राष्ट्र गीत म्हटले व मग पुढे चालू लागले.
मी पुढे चालत असता स्वतः शाळेत असतानाचे स्वातंत्र्य दिनाचे दिवस
डोळ्यासमोर उभे राहिले. सकाळी तयार होउन शाळेचा गणवेश घालून जायचो तसेच आईने क्रांती वीरावरा लिहून दिलेले भाषण बोलायचे. अनेक विद्यार्थी वकृत्व करायचे..अध्यक्षांचे ....मग हेड मास्तरांचे वगैरे भाषणे व्हायची. काय मजेचे आनंदाचे दिवस ..वेगळाच उत्साह असायचा. एक तर त्या दिवशी दप्तर नाही अभ्यास नाही .स्वातंत्र्य वीरांची भाषणे ऐकून हृदय भरुन यायचे. कारण सारे आपण स्वातंत्र्यात जन्मलेले.पारतंत्र्याची झळ न सोसलेले.
पुढे महाविद्यालयात तर घरीच असायचो. रजाच असायची. पुढे बँकेत लागल्यावर 2/4 वर्ष कौतुकाने गेलो ध्वज वंदनास पण रहात्या सोसायटी त
मात्र नेमाने जाते. छान शिस्तबद्ध ध्वज वंदन होते.
पूर्वी रेडीओ प्रसारणातून पंतप्रधानांचे भाषण ऐकायचो .पुढे दूरदर्शन आल्याने पुन्हा या दोन्ही( स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक )दिनाची रोनक सरळ घर बसल्या अनुभवण्याची मजा औरच येत आहे. कित्येक जण हा सोहळा पहाण्यास
थेट दिल्लीला पण जातात. खरच एक देशभक्तीचे दर्शन घडते.
काय ती लोक होती . ज्यांनी घरदार संसाराचे रान करुन देशासाठी जीवन
अर्पण केले होते. बलिदान केले होते. त्यांच्या स्मृतींचे स्मरण होऊन आपोआपच नतमस्तक होते. याच ध्वजाला हाती घेऊन फासावर हसत चढले. स्वातंत्र्य प्राप्तीच्या वेडाने ती झपाटलेली होती. ते मिळवणे हेच ध्येय ठरले होते. व त्या सा-यांच्या प्राणांच्या आहुतीने आज हा दिन दिसला. आता स्वातंत्र्य पण पहाता पहाता 74 वर्षाचे झाले.
हे सर्व विचार मनात येत होते व मी कधी घराशी आले कळलेच नाही.
विचारांच्या तंद्रित मी किती तरी ध्वज रोहणे मनात अनुभवली . दाराशी येते तर नातू शाळेतून येऊन मला शाळेतील ध्वजारोहणाचा अनुभव सांगण्यास उत्सुकतेने वाट पहात होता. तो आनंदाने आधी वदला "भारत माताकी जय".माझे ही मन देशभक्तीने भरुन आले.