स्पर्धेसाठी
विश्व लेखाकांचे
ललित लेखन
विषय ... प्राजक्त
सकाळी उठून अंगणात गेले. काल संध्याकाळी अलवार उमलू पहाणा-या प्राजक्ताच्या कळ्यांच्या मंद सुगंधाने , पूर्ण आसमंत दरवळत होता. प्राजक्तच्या कळ्या अर्धंवट उमलेल्या होत्या आणि वा-यावर हेलकावे घेत होत्या.आणि आता सकाळी. पहाते तो .....छान टपोरी प्राजक्त फुले जमिनीवर पसरलेली होती.जणु फुलांची उधळण केली होती. पारिजात वृक्षाने सर्व फुले भुमीला समर्पित करुन रिक्त हस्त झाला होता.
फुले जणु हसतमुखे प्राचीचे स्वागत करत होती. प्राजक्ताच्या शुभ्र पाच पाकळ्या व तितकेच मोहक केसरी देठ , अशी फुले विखुरलेली होती.सुंदर सडा पडला होता. पाहून सहज ओळी सुचल्या....
टपोरे शुभ्र प्राजक्त
फुलले मम अंगणी
किती मोहक रूपाने
पाहता आनंद मनी
देठ शोभते केसरी
शुभ्र पाकळ्या मोहक
पडे सहज भुवरी
सडा चित्ताला वेधक.
खाली वाकून मी पटपट,.... पण हळुवार फुले परडीत गोळा केली.फुलांकडे पाहताना विचार आले. किती नाजूक आहे फुल. गर्द हिरव्या पानांत किती शोभून दिसते. फुल उमलते ... , ते पण गुच्छात बरोबर दुसऱ्या फुलांना साथ देत. रात्र भर झाडाच्या पानांच्या सान्निध्यात रहाते. स्वत:चा परिमल जनांना देते आणि तितक्याच अलगदपणे वृक्षाच्या फांदीवरुन वेगळी होऊन भूमीवर स्वतः ला झोकून धरणी मातेच्या कुशीत विसावते.
या प्राजक्ताच्या वृक्षाबद्दल अनेक म्हणी आहेत, ज्यांना लोकमान्यता आहे. एक म्हणजे अर्जुनाने हे वृक्ष स्वर्गातून आणले . कुंती, शिवजींना प्राजक्ताच्या फुलांचा मुकुट द्यायची . दुसरी म्हण आहे की भगवान श्रीकृष्णांनी हे त्यांच्या प्रिय राणी सत्यभामेसाठी आणले होते.
प्राजक्त वृक्ष हे पवित्र आणि दैवी वृक्ष आहे. ज्याला हिंदू पौराणिक कथांमध्ये मोठा मान आहे. पारिजात या शब्दाचा अर्थ स्वर्गातून उतरलेला किंवा खगोलीय असा होतो. भागवत पुराण, विष्णु पुराण आणि महाभारतानुसार पारिजात फुले समुद्र मंथनाच्या परिणामी निर्माण झाली . त्यामुळे हे स्वर्गीय वृक्ष मानले जाते.
हे सारे झाले वृक्षाचे. पण प्राजक्त फुल स्वतः नाजुक .....अती अल्प काळ टिकणार असते. पण त्या अल्पावधित स्वतः च्या मोहक रुपाने व तितक्याच मन मोहक सुगंधाने जन-मनास हर्षित आकर्षित करते.व जगाला सुंदर शिकवण देते . आयुष्य किती अल्प असो ,..जगायचे ते आनंदाने व दुसऱ्यांना प्रसन्नता देत जगायचे. हे विचार, फुले प्राजक्ताची , मला क्षणात सांगून गेली.
मी काही फुले प्रगतीतील ओंजळीत घेतली. व श्री कृष्णा चरणी अर्पण केली.देवघर काय सुगंधाने दरवळले सांगू ! शोभिवंत दिसले. सहज ओळी मनात आल्या.
अल्प काळाचे आयुष्य
आनंद देणे दुसऱ्यास,
घ्यावी शिकवण प्राजक्ताची
उपयोगी किती जगण्यास,
खरच छोटं फुल पण काम किती महान. मी ओंजळी शिवायच्या परडीतील बाकीच्या फुलांकडे पाहत होते पाहता पाहता सहज मनात आले. व लगेच त्या फुलांनी श्रीकृष्णांची आकृती बनविली. तशी मला चित्र कलेची आवड आहेच व बरी पण जमते. त्यामुळे थोड्याच वेळात मी श्रीकृष्णाची फुलांची कलाकृती देवघरात तयार केली.
किती मोहक सुंदर दिसत होती माझी कलाकृती . त्या कलाकृतीला पाहून मन तर आनंदलेच आणि मी मनाने त्या प्राजक्त फुलांची कलाकृती बनविण्यात माझे मन हरवून गेले. लगेचच त्या कलाकृतीचे 2/4 फोटो पण काढले. आणि साहित्य समूहावर धाडले .
आणि पहाते तर काय ! किती तरी कृष्ण भक्तांचे शेअर केलेल्या कलाकृती ला लाईक आले होते., व सर्वांनी भक्ती भावे नमन. व *जयश्री कृष्ण* चे संदेश पण आले.
मी पण हे पाहून खूप खुश झाले . लगेच त्यावर चित्र काव्य ,श्रीकृष्णावर,व त्याच्या बासरीचे वर्णन केलेली काव्ये पण सादर झाली. मला पण प्राजक्ताने कृष्ण दर्शन घडविले केले. मी पण राधे प्रमाणे कृष्ण भक्तीत लीन होऊन कृष्ण मय झाले.
आज प्राजक्ताने माझा दिवस आनंदात व प्रसन्नतेत घडविला. मीच बनविलेल्या कलाकृती पहात सहज विचार आले ते असे काव्यात
वाटे बसावे पहात
कलाकृतीचा श्री हरी
भान हरपले माझे
दर्शन जाहले घरी.
अशाप्रकारे दिवस खूप मजेदार सुरू झाला. आणि कारण काय ? तर प्राजक्ताची फुले ,प्राजक्ताचा अंगणी पडलेला सडा.
वैशाली वर्तक
अहमदाबाद