मात्रा वृत्त कविता उपक्रम क्रमांक ३
१२\१०\२५
वृत्त उध्दव
विषय... पहाट
तम निशेचा पहा सरता
खग नभात उडती सारी
किलबिलाट भासे सुंदर
उठ ,प्रातः झाली न्यारी
पूर्व दिशा पहा उजळली
शीत मंद वाहे वारा
सुमनांचा गंध दरवळे
शुभ भासे परिसर सारा
घर रांगोळीने सजले
स्वर भुपाळीचे कानी
प्रातः वेळी ऐकू येते.
सुमधुर स्वरांची गाणी
आशा रुपी कळ्या फुलती
होता रवीचे आगमन
दूर दूर होई मरगळ
मनाने आनंदती जन
क्षण आनंदाचे भासे
नव आशा येती ध्यानी
रामाचा गजर अंतरी
भजन धून येते कानी
वैशाली वर्तक
उध्दव वृत्तात
कविता .
शीर्षक...देव पाहते
मात्रा. 2+8+4. व.2+8+4. उद्धव+उद्धव
मी व्रते नाहीच केली, ना नवस बोलले तुजला
तू पालक असशी अमुचा, दृढ ऐसी श्रद्धा मजला
ना तीर्थ क्षेत्रास गेले, ना कधीच केली वारी
तू विश्व धारका असता, मी सुकर्म करते सारी
तो नित्य उगवता दिनकर,बघ दर्शन क्षणात घडते .
मी वंदन तयास करता, तव स्वरूप मनात भरते.
कर्मात देव जर वसतो, मी सत्कर्मातच रमते
मन परोपकारी व्हावे, हा विचार सदैव *स्मरते*
फूल फुलता गंध पसरे सय तुझीच येते देवा
तव निर्मित नभात तारे ,हा तुझ्या कृपेचा ठेवा
वैशाली
ओढ जीवा
उद्धव वृत्त
मात्रा २-८-४
ओढजीवा
ती भेट आपुली पहिली
मन माझे अगतिक पळभर
विचलित मी झाल्या वरती
मी सावरले मज क्षणभर
तव स्पर्श तो प्रथम भेटी
वाटे आश्वासक अचला
जाहला आनंद हृदयी
मम रुधिरात असा रुजला
छंदची लागला आता
अन कसे आवरू मजला
तव सहवासाची गोडी
त्या वेडात जीव फसला
तव प्रितीचा गंध दरवळ
अंतरी माझिया राहे
बघ वसंत फुलला आता
आमोदरव नित्य वाहे
ऐक ना तू अता सखया
देशील ना सदा सोबत
मन तुझ्यात माझे रमले
मी मागते तुझी संगत
वैशाली
