शनिवार, २५ जानेवारी, २०२०

का रे दुरावा काव्य

का रे दुरावा

लावूनिया प्रीत वेडी
दाविलीस रे माया
 सोडून मज एकटीला
गेला कुठे माझा  राया

किती वाट पाहू तुझी
कशी साहू  रे दुरावा
येना जवळी माझ्या
 देना  मनाचा विसावा

वाटे मनी  तूची सदा
मज समीप असावा
नको धरुस अबोला
  कर दूर  हा दुरावा

रात्र  वैरीण सदाची
येत नाही  माझी कीव
आंत नको पाहू आता
 तळमळे सदा जीव


वैशाली वर्तक


चित्र काव्य आठव ती भेट आपुली

आजचा उपक्रम
चित्र  काव्य , चारोळी


आठव ती भेट आपुली
चंद्राच्या साक्षीत घडलेली
हात तुझा माझ्या  हाती
 एकमेका वचन बध्द केलेली.

स्मरतो तो गंध सुमनांचा
मंद हवेतला गारवा
धुंद रात्री  दोन जीवांनी
गोड गायला मारवा


 उमलेली गंधीत फूले ती
हसली पाहूनी अबोल प्रीत
कुजबुजली एकमेकात
 अशी असते प्रेमाची रीत

आज आलो पुन्हा  तेथेच
तोच चंद्र  पहा  हसला
आठवता  ती मुग्ध रात्र
वृक्ष फुले उधळीत बहरला

  .....वैशाली वर्तक

बुधवार, २२ जानेवारी, २०२०

परिवर्तन सृष्टी चा नियम

परिवर्तन हा नियम सृष्टीचा
       
एका नंतर एक ऋतु येती
परिवर्तन  हा नियम सृष्टीचा
काळा गत आपणही बदलावा
पहाण्याचा कोन दृष्टीचा

पहाण्याचा  दृष्टीचा कोन
असावा नेहमी विशाल
त्रास होत नाही जीवनात
जीवन सदा खुश खुशाल

जीवन सदा खुश खुशाल
जे उगाळत राहू नये कदा
तुलना करत गत काळाची
न विसरता   सदा सर्वदा

न विसरता  सदा सर्वदा
करावे  देवाचे नामस्मरण
मिळे  आपल्या मनास शांती
येऊन विश्वेश्वरास शरण

वैशाली वर्तक


थंडी. बालकविता



थंडी (बालगीत)

आई मला आई मला
अजून झोपू देsना

       थंडी किती वाजते
        नाही अजून उजाडले
        सर्वत्र च आहे अंधार
        डोळे च नाही उघडले
             आई मला अजून झोपू दे sना
 
         पाणी किती गारगार
         अंघोळीचा वाटे त्रास
           हात पायच धूवुयाना
            करु आंघोळीचा अभास
              आई मला अजून झोपू देsना

           रजईत राहतो पडून
            कशी काय तू उठतेस
             झटपट कामाला लागते
            अंघोळीस मज पाठवितेस
                   आई मला अजून झोपू देना

          थंडी म्हणत घरीच राहू
           गरम काही खाऊया
          रात्रीला  शेकोटी पेटवू
           स्वेटर घालू ऊन्हात बसूया
                      आई मला अजून झोपू दे sना


            वैशाली वर्तक

मंगळवार, १४ जानेवारी, २०२०

तो राजहंस एक

तो एक राजहंस

  जगी विहरती बरीच पाखरे
 काही असती रूपाली मोहक
  करी तयांचे सदाच कौतुक
  तर काही साधी, न चित्त वेधक
        पण प्रत्येकात असते एक
         काही तरी  विशेष चमक
         करुन जगा  दाखविण्याची
        सदैव   वसते अंगी धमक
असेच चालते जगी या
 न बाळगता कधी निराशा
पुढे आक्रमिता मार्ग
दिसे वेगळी यशाची दिशा
          असाच तो होता राजहांस
          न कळलेच त्याचे कुणाला
           घेता उंच  भरारी जीवनी
           यशाच्या शिखरी बसविले तयाला

वैशाली वर्तक

   
     

जगाचा विचार कशाला

जगाचा विचार कशाला
1
    देवाने बहाल केला मेंदू
    विचार शक्ती करायाला
     जगावे आपल्या  मताने
    जगाचा विचार  कशाला

2
         केले जे मनी रुचले
        विचारले  स्व मनाला
       विचार  स्वातंत्र्याने जगले
        जगाचा विचार  कशाला

3      जगावे आनंदाने सप्त सुरांत
        असावे जीवन  संगीत
        जगाचा विचार  कशाला
        मस्त  बनवा जीवन रंगीत

4
        व्यथा असो आनंद
        प्रकाश  असो तिमीर
        जगाचा विचार कशाला
        बिनधास्त जगावे बेफिकीर

      वैशाली वर्तक   7/1/2020
        

माती व (ओवी ) घर

माती  ( ओवी)
तूची देते माय माती
अन्न पाणी जगताला
तव कृपेने पोषिते
सर्व ची प्राणीमात्राला

तुज करितो नमन
पद स्पर्शण्या तुजला
अनंत ऋण हे तुझे
कर क्षमा तू मजला

माती नसे सदा काळी
असे ती विविध रंगात
परि गुण हा मायेचा
वसे तो अंतरंगात

  जन्मतो वाढतो आम्ही
  सदा  तुझ्याच कुशीत
   तुची भरवीशी प्रेमे
   घास कवेत खुशीत

जरी स्पर्शतो तिजला
नेमाने आपण नित्य
 असे अंत  या मातीत
हेच जीवनाचे सत्य

वैशाली वर्तक

आजचा उपक्रम
ओवी

घर सुखाचे आगर
वाहे आनंदी  घागर
भासे  सुखाचा सागर
माझे घरकुल ते

सदा दारी कौतुकाने
सर्वांना ते आदराने
करी प्रेमे स्वागताने
जन पाहुणचार

दारी मंगल रांगोळी
लावियल्या दीप ओळी
रेखियल्या शुभ ओळी
मुलांच्या भविष्याच्या

वैशाली वर्तक





गीत...... माझ्या भारत देशाचा.

देशभक्ती गीत  माझ्या भारत देशाचा, मला  सदा अभिमान प्राणाहून असे  प्रिय, तयाच्या  गौरवात शान भाव वसे समतेचा ,धर्म नांदती अनेक नसे भेद- भाव जन...