सोमवार, २४ डिसेंबर, २०१८

देवी स्तुती

असशी तू स्त्री शक्ती
अनेक रुपे तू दाविशी
जननी तू सा-या जगाची
तुझ्या कृपेची आस मजशी
         विद्येची तू आहेस दायिनी
           तव करी वीणा शोभती
            मंगल , शांत सोज्वळ मूर्ती
           शारदा नांवे तुजला वदती
तू असशी धन संपदा
विष्णू पत्नी वंदन तुजला
प्रगटली तू समुद्र मंथना
आशिष तव दे मजला
              तूची आमुचे करी पोषण
               करूनी कृपेचे अमृत सिंचन
                 सदा चित्ती राहो तव चरण
                  अन्नपूर्णे तुझेच मनीं चिंतन
अंबा कालिका रेणुका
तूच वसशी विविध रुपात
ममता भरली तव हृदयात
जननी माता ललना स्वरूपात
               तूच दर्शवी तुझीच रूपे
               काळ वेळ पाहून प्रसंगाते
                क्रोध राग माया ममता
                वसती नवरस  तव   ह्दयाते

                                       वैशाली वर्तक

शुक्रवार, २१ डिसेंबर, २०१८

फूले निसर्ग किमया

किती फूले उमलली
सुगंधित चोहीकडे
पहा तयांचे सौंदर्य
वाटे पाहू कोणा कडे
       उमलला हा गुलाब
       दश दिशा झाल्या धुंद
       परिमल पसरला
       वायु संगे मंद मंद
कसा मोहक फूलला
बट मोगरा लाजूनी
कळ्या हळूच डोकावी
पाने पहाती हासूनी
        गर्द झेंडूच्या पाकळ्या
          पीत सोनेरी रंगात
         उजळणी  होई पाठ
          गंध पसरे क्षणात
फूले निसर्ग किमया
निसर्गाची कृपादृष्टी
किती पाहू , किती वर्णू
किती रम्य आहे सृष्टी

वैशाली वर्तक

बुधवार, १९ डिसेंबर, २०१८

चित्र काव्य जीवन बिगारीचे






चित्र   काव्यः--- जीवन बिगारीचे





होता रोज सकाळ , करावया येतो काम
दोघे मिळूनी राबतो ,  मानीतो  हे तीर्थ धाम

"परिश्रम " मानून देव , अतोनात करितो कष्ट
सौख्य येईलच दारी ,   ठेव  देवा सदा पुष्ट

करावया सुखी संसार , साथ तुझी मिळो सदा
सखे धरिला  हात तुझा , सोडू नकोस तो कदा

एका हाताने तान्हुला  दुजा सावरी मातीला
साथ राहूनी धनीच्या  बळ वाढवी  कामाला

तुझ्या  माझ्या  राबण्यास , देव  नक्की देई न्याय
 दृढ श्रध्दा तयावर ,  करी न कोणा अन्याय

दिन नक्की पालटेल , पु-या होतील उणीवा
खोली मालकीची बांधू , मनीं  ठेवल्या  जाणीवा

देवाजीने दिला जन्म , वाया न जावो निरर्थक
काम करूया कसूनी , करू  जीवनाचे सार्थक

मोठा होईल तान्हुला , तोचि आपुला आधार
 तया  करुया  साक्षर , ईच्छा  होईल साकार.

रविवार, ९ डिसेंबर, २०१८

आई विषयक(7).. 1तव महिमा 2आई माझा शिक्षक3 बाल कविता फक्त माझीच आई4तुझ्या कुशीत6 )वृत्त बध्द

,,(1)आई (लिनाक्षरी)                     7/12/2018
दोन्ही वर्णे आ व ई असती गुरू
प्रत्येकाची "आई" हीच आद्य गुरू

धरूनीया बोट पहिले पाऊल
सुखी जीवनाची उमजे चाहूल

मिळे स्वर्ग सुख तिच्याच कुशीत
बालपण जाई सर्वांचे खुशीत

जरी असता स्वामी , तिन्ही जगाचा
आई विना असे, तो कष्टी मनाचा

घटाकार देई , घटांना आकार
देई संस्कार बाळांना , ती अपार

होता जीवा कधी दुखापत कदा
येतो शब्द "आई " ओठावरी सदा

आई किती वर्णू , तव गुण गाथा
नमविते तुझ्या , थोरवीला माथा.
            ...........वैशाली वर्तक



उपक्रम- अष्टाक्षरी
2)विषय ...आई

शीर्षक- **तव महिमा**

उच्चारता शब्द आई
फुटे मायेचा पाझर
भरलेला सदा साठी
प्रेम दयेचा सागर

धरुनीया तीचे बोट
टाकी पहिले पाऊल
सुखी जीवनाची सदा
लागे जीवास चाहुल

होता जीव कष्टी कदा
आई शब्द येई मुखी
स्वामी तिन्हीही जगाचा
आई नसता तो दुखी

जसे घडविण्या घडा
देती मातीला आकार
करी संस्कारी बाळांना
घेउनीया कष्ट फार

किती वर्णू तव गुण
तव मायेची ती गाथा
तुझी थोरवी महान
नमवितो माझा माथा

वैशाली वर्तक








सावली प्रकाशन  समूह 
स्पर्धेसाठी 
अष्टाक्षरी काव्य लेखन
3)विषय -- माझ्या  आईची महती

उपक्रम- अष्टाक्षरी

2)**तव महिमा**

उच्चारता शब्द आई           
फुटे मायेचा पाझर
भरलेला  माझ्यासाठी
प्रेम दयेचा सागर

केले उत्तम संस्कार 
जगी टाकण्या पाऊल   
व्हावी  सुखी  पायवाट
याची घेतली  चाहुल

 होई जीव  कष्टी कदा
 येतो शब्द  आई मुखी
  जरी असता संपन्न 
  आई विण मन  दुःखी

जसे घडविण्या घडा
देती मातीला आकार
घडविले तिने मला
घेउनीया कष्ट फार       
  
 आई कशी किती वर्णू ,     
 तव गुणांच्या मी गाथा          
 नमविते प्रेमभावे         
 तुझ्या  थोरवीला माथा

वाटे वर्णावी   सदाची
माझ्या  आईची महती
  कमी पडे माझी मती
 तूची  महान जगती    

.......,..वैशाली वर्तक
अहमदाबाद 7/1/2021






3)"विषय -- आई माझा शिक्षक *
आई आद्य गुरु* 
 जीवनात जन्मता आई 
प्रत्येकाचा पहिला गुरु 
बोट धरुनी जग दावीते 
गुरु पदाची सुरुवात सुरु 

 धरुनी तिने माझे बोट 
 शिकविले टाकण्या पाऊल
 तिच्या शिकवणीने मला 
मिळाली जीवनी यशाची चाहुल 

 जरी पडता, येता निराशा
 दिली भरारी करण्या कर्तृत्व 
 जीवनी माझ्या महत्त्वाचे 
  आहे  तिच्या योगदानाचे प्रभुत्व 

 दिले आईने धडे संस्काराचे
 महत्त्वाची तिची ठेव 
लावली जीवनी शिस्तता 
मला सदा भासते ती देव

 होता चुका मायबाप 
घेतात पदरात पाडसाला 
कधी रागावून समजावून 
घडवीले आपुल्या बालकाला 

 कितीही मोठे झालो तरी 
आईला वाटे लहान 
अनुभवाचे बोल आईचे 
जीवनी असती महान 


 वैशाली वर्तक अहमदाबाद "



अ भा ठाणे जिल्हा समूह १
 आयोजित 
उपक्रम
बालगीत
   4) *आई माझी च फक्त*

माझी आई  फक्त माझी 
आवडे मजला ती भारी
एकच आहे जगी अशी
आई माझी  मला प्यारी

येता जाता करते लाड
घेते मजला कुशीत
कुरवाळून प्रेमे उठविते 
तेव्हाच मी येते खुशीत

फिरायला नेते  बागेत मज
घेते नवीन  नवीन खेळणी  
करता हट्ट   रागावते मला
तरी  मज   भासे तीच देखणी

सांगते गोष्टी झोपताना
गाते गोड गोड गाणी
नीजताना हवी तीच
ऐकत रहावी तिची वाणी

वैशाली वर्तक 
अहमदाबाद






5)आई म्हणते  (  बाल काव्य)
वर्ण 14 यति 7

आई म्हणते तूची, भासे  नभीचा तारा    
तुज वीण भासतो, मज बाकी  पसारा
     म्हणे  मजला सदा ,माझा गोड गोडुला
      सदा मज साठी तो, असे माझा सानुला  
     भरलास तूची या , जीवनी मोद  सारा  
      आई म्हणते  तूची , भासे नभीचा तारा           1
  
घेउनी जाते सदा ,  मैदानात खेळाया
देते मस्त मस्त ची, खाऊ सदा  खावया     
सोनुला माझा आहे , मला सदाची प्यारा
आई म्हणते तूची ,भासे  नभीचा तारा                  2

    सहज पुरविते, ती लाड सोनुल्याचे
    सदाची तिला वेड ,माझे पापे घेण्याचे
     मज होता तो बाऊ , घालतेसे ती वारा
     आई म्हणते तूची, भासे  नभीचा तारा                3


वैशाली वर्तक


  6)*आई तुझ्या कुशीत*

      

पाय टाकताच घरी
तुला भेटण्याची घाई 
आई मुख.दिसताच
मन आनंदून जाई

सारे मिळता जगती
मन  आनंदते खुशीत
सुख स्वर्गाचे लाभते
फक्त आईच्या कुशीत 

प्रातः काळी उठताच 
काय हवे नको पाही. 
घरातील प्रत्येकाला
असे  ते मिळण्याची ग्वाही

करून दुर्लक्षित स्वतःस
नेहमी विचार दुजांचा
परिपूर्णता करण्यात 
कुटुंबीय  हर जनांचा.

आहेच मी भाग्यवान 
तीर्थक्षेत्रे तव चरणाशी 
असता तू मजपाशी 
वाटे नको जाणे काशी




  7).  वृत्तबध्द कविता उपक्रम १४\४\२६

वृत्त अनलज्वाला 
मात्रा  ८-८-८
आई 

येता जन्मा आई असते  ही प्रथम गुरू. 
गुरू पदाची बोट धरूनी सुरुवात सुरू.   

  घेत आधार  टाकी बाळे.  पहिल पाऊल
सुखी आयुची सदैव लागे जीवा चाहुल   

 निराश होता अपयश येता देत उभारी    
पाठी असते सदैव आई  मने करारी

संस्काराचे  धडे शिकवता मना शिस्तता
भासे आई   खरोखर मनी जशी देवता. 

चुकताच कधी  घेते पदरी ती  बाळाला 
रागाने, प्रेमाने सांगे मग .     पाल्याला

झालो मोठे  पण तिजसाठी लहान असतो
अनुभवलेले  बोल तियेचे  महान वदतो













प्रिय ती. आईस

   सानविवि

            खरच ग आई  . आज मध्य प्रदेश  मराठी अकादमी इंदौर ऊव महाराष्ट्र साहित्य सभा इंदोर यांनी *पत्र  लेखन* विषय दिल्याने तुझ्या शी संवाद साधण्याची छानच  संधी मिळाली . खरच तुझ्या शी खूप  सारे बोलायचे सांगायचे आहे. किती काळ लोटला. खूप  सा-या घडामोडी घडल्या . कुठून सुरुवात करु .
मलाच समजत नाहीआहे. 

         मोठ्या नातवाच्या लग्नात तर तू  होतीस . किती ७ दिवस लग्न चालले होते.  अगदी वाजत गाजत पार पडले. आमच्या कडच्या सर्व  नातेवाईकांना फारच लग्न  सोहळा आवडला होता. पुढे   पणतु दर्शन पण तू केलेस .तुझ्या  पहिल्या लाडक्या नातवाच्या   मुलाचे (पणतुचे)मुख दर्शन होते.  
आणि कौतुकाचा भाग  की,  तेव्हा चार ही पणज्या तुम्ही  रांगेत बसल्या होत्या . चौघींचे औक्षण करुन मी बकूळ फूले तुमच्या शिरावर उधळली होती. काय अपूर्व  सोहळा होता ना !
   पण पुढे  दुस-या नातवाचे लग्न ठरले त्या सूनेला पण तू पाहिलेस ... तुला भेटायला आणली तू तिला अजून साखर पुडा पण  न होता. साडी देऊन आशीर्वाद पण दिलेस. पण,माझे दुर्भाग्य तुझी तब्बेत खालावत गेली. व त्याच्या पुण्यातील लग्नाला तू नव्हती.  फार वाईट वाटले. 
    मोठ्या नातवाच्या लग्ना  प्रमाणे त्याचे पण लग्न थाटात  पार पडले. पुढे मुलीचे ,शेंडेफळ तिचे  पण लग्न तिचे तीने शोधले,पण जावई छान आहे हं.तिचे लग्न पण थाटात पार पडले. तू फक्त पहिल्या नातवाचे लग्न व पणतु पाहिलास.
      अग तुला खास सांगायचे तू हाडाची शिक्षीका.. दोन्हीही  नातू  तुझ्या च कडे शिकायची. त्यात पहिल्या नातवावर  तुझा जास्त लळा... काय कौतुक सांगू त्याचे ! तू असतांनाच तो नोकरीस तर लागला होताच. BE तर होताच पुढे mtech झाला  आता काय सांगू phd पण केले .....नातू कोणाचा?
  .एवढेच नव्हे तर नाटकातून काम करतो. आपल्या महाराष्ट्र  समाजाचा नाट्य सेक्रेटरी आहे .बृहन महाराष्ट्रातून नाटकातून बरीच पारितोषिक  मिळवतो. स्वतः नाटक लिहून नाटक बसवतो.  गेल्या वर्षी तर
समाजाचा १०० वाट वाढदिवस होता.खूप हिरीरीने मेहेनत घेऊन शताब्दी महोत्सव साजरा केला. व एक गंमत सांगते. आधी तुझी नातंवड म्हणून लोक त्याला ओळखायची ,आता सारे शहर आम्हाला  त्याचे आईवडील म्हणून ओळखतात.. किती छान वाटत ना! असो, अजून एक यंदा अहिल्याबाई लोकमाता ह्यांचे ३०० वे वर्षं,तर  त्याने अहिल्यादेवींच्या जीवनावरचे  नाटक स्वतः निर्देशक करून त्याचा आता शो सुरतला पण करणार आहे.  कौतुक वाटतं ना !
      असो दुसरा नातु पण कमी नाही हं  ..तो पण परदेशात छान काॕम्पुटर eng असून मोठ्या कंपनीत  मोठ्या पगाराची नोकरीत  बस्तान मांडून आहे. तसेंच तो पण हार्मोनियमची साथ संगत करत असतो.मोठ्या कलाकारां बरोबर साथ करण्याची सुवर्ण संधी त्यास मिळत असते.
    आणि मुलीचे कौतुक  काय सांगु? ती पण आपल्याच शहरात  रहाते त्यामुळे  सतत भेटते. जशी मी तुला  एकाच गावात असल्याने  भेटायची  तशीच. तुझ्याच सारखे मी पण तिला माहेरचे झाड लावून दिले आहे.  विशेष म्हणजे नणदा भावजया अगदी दृष्ट लागेल अशा मैत्रीणी आहेत. रहायला पण जवळच आहे .ती पण मोठ्या कंपनीत सर्वीसला आहे. मुलीचे पण सुख उपभोगत आहे .ती म्हणजे तिसरा मुलगाच आहे.  अगदी  सतत काय हवे नको पहात असते.
     आणि हो तिन्हीही मुलांनी संगीत आवड छान जोपासली आहे एक तबला विषारद तर दुसरा हार्मोनियम निष्णात आहे. तू असताना  पण मुलगी विषारी  व दोन्ही मुले तबला व पेटी वादक त्यांचे  १०\१२   कार्यक्रम झालेच होतेच .
     आणि तुझी लेक पण कमी नाही हं. मुलगी कोणाची? पूर्वी  मी पोहण्यात  च्यपियन शीप ., शाळा काॕलेज मधे मिळविली होती.   पण विशेष म्हणजे मी ६५ नंतर पुन्हा  पोहण्यात वरिष्ठ  नागरिकात भाग घेउ लागले  आहे. व आता पण मी राज्य स्तरीय पारितोषिक  मिळवलीत. .ऐवढेच नव्हेतर  कॕनडाला fina   ला पण भाग घेण्यास जाउन आले .तेथे काही नंबर आला नाही पण utub वर नाव झळकले .  असो . तेथे नंबर नाही आला पण भाग घेऊन त्यांच्या ठराविक टाईमीग दिल्याने utube  वर नाव  झळकले. असो.
   हे सगळे प्रसंग जात असता मला तुझी बाबांची फार आठवण होई .. बाबांना तर माझे कौतुक फारच होते. बाबा तर गावभर माझे कौतुक  करत फिरले असते .. असो.
    .फार वर्षांच्या गप्पा केल्या .आणि खरतर मध्य प्रदेश  मराठी अकादमी चे  आभार मानते . हे सर्व  एका दमात मला   तुला सांगायला मिळाले.  आणि सर्वात यांचे श्रेय पण तितकेच महत्त्वाचे. त्यांची वेळोवेळी मला साथ.
  अजून एक गोष्ट पुढच्या पत्रात कळवीन.सध्या लेखणी माझी सखी झाली आहे.मी कवयित्री झाली आहे. पुढच्या पत्री त्यावर सविस्तर लिहीन.
 पत्र तुझ्या  फोटो फ्रेम मधे ठेवत आहे . वाकून नमस्कार 
तुझी लाडकी लेक 
बेबी विनोदिनी



 


३८७




सावली

सावली                              7/12/2018
कधी न देते अंतर
साथ देते ती सदैव
ध्यानी , नसे आपणास
तीच साथी एकमेव
            छत्रछाया देती पालक
            अपार माया असे मनात
            तरी न कोणी तीज सम
            सोबती ,अंतकाळी जगात
जशी पडता सावली
अवनीची चंद्रावरी
जन म्हणती तया ग्रहण
खेळ चाले हा घटकाभरी.
        व्यक्ती, वस्तू असो तीच
        तिचे बदले सतत आकार
        कधी मोठी , कधी छोटी
        दिसती तिच्या रुपाचे प्रकार
दोन्ही हाताच्या मदतीने
सावली दावी आकार
धरता हात प्रकाशात
प्रसंग , पण होई साकार
          मेघ खेळती खेळ सूर्याशी
          नभी चाले तयांचा खेळ
          कधी ऊन कधी सावली
          घडे अवनीवर तिचा मेळ.
पडता सावली वृक्षांची
मिळे विसावा पथिकास
घेती सुखानंद सावलीत
किंमत कळे तिची जनास.
                   .....  वैशाली वर्तक

दुष्काळ

                  दुष्काळ              5/12/2018
पडले मृगाचे पाणी
अंकुरले बीज फोफावूनी
मनीं आनंदिला राजा-बळी
रंगविली स्वन्पे मनातूनी
       वा-यावर डौलती चहूकडे
        शिवारे हिरवी आखीव
        पाहता वाढली जोमाने
         सुंदर दिसती रेखीव
पण वरुणराजा कोपला
पाणी नाहीच बरसल
सारे पीक कोमेजल
हाती काहीच न गवसल
       सुकले ओढे, सा-या नद्या
       गुरांना पण न मिळे चारा
       काळी भूभी भेगाळली
        जीवाला कसा मिळेल थारा
बियाणाचे चढे कर्ज माथी
बळीराजा कसा होईल सुखी
कणभर दाणा नसे घरी
तयाचे जीवन झाले दुखी
          रब्बीची कराया पेरणी
          पाणी आता येई डोळा
          कसे होणार आता चिंतेने
          दुष्काळ दिसे सर्त्रव काळा
असे ह्या मेघराजाने
न देता दिन सुकाळाचे
करूनीया कोप मातीवर
दाविले दिन दुष्काळाचे ..
..... वैशाली वर्तक

मृदगंध

विश्व लेखकांचे साहित्य मंच आयोजित  अष्टाक्षरी काव्यलेखन  विषय    मृदगंध किती  वसुने साहिल्या तप्त  उन्हाच्या झळा   काया तिची भेगाळली  भासे ज...