शनिवार, १८ मे, २०१९

अवजार

अवजार
  आला मनीं सहज  विचार
  कृपा असूनी अवजारांची अपार
  न मिळता वेळेवर  अवजार
  होई खोळंबा कामाचा फार
 
दिसण्यास  असे साधी  हातोडी
पण   ती न मिळता   हातासरशी
उडे तारांबळ  सर्व  जनांची
साधा खिळा , ठोकण्या मन तरसी

जर पुकारला संप अवजारांनी
नाही आज  हजर , आम्ही  कामावरी
त्रेधा तिरपीट  उडेल मानवाची
कसे, काय,  करु  आता कुठवरी

पक्षी, पशु ,  प्राणी , कीटक
नाही अवलंबीत अवजारावर
सुगरण पक्षी विणे तिचे घरटे
तर सुतारपक्षी  , चोचीच्या बळावर

आदि काळी बनविली मानवाने
अवजारे कापण्या तोडण्या दगडातूनी
आता ती  अवजारे पडली  मागे
शोध घेता नव्याचा ,..जुन्यातूनी

करवत , प्रहार,  कुदळ , नांगर
कारागीर  संभाळी तयांना जपून
  करे तयांचे  जतन सदाकाळ
अमावस्येला   विश्रांती देऊन


अवजारात नसे  लहान वा मोठे कोणी
वैशिष्ठयानुसार ती येती कामी
 रहीम वदती दोह्यात , ऐक वैशाली
जेथे हवी सुई , तलवार ठरे निकामी .

       वैशाली वर्तक

चित्र कविता चपला रांगेत




चित्र  कविता          13/5/2019
ठिपक्या ठिपक्यांच्या रांगोळी साठी 
काढतात रांगेत                             
समान अंतरावर  ठिपके               
अगदी व्यवस्थित
एका खाली एक
जराही न होऊ देता
तयांना इकडे तिकडे

पण, हे पहावे तर नवलच
ही तर  सारी पादत्राणे
ठेवली इतकी व्यवस्थित
जणू कवायतीला बसलेली शाळकरी मुले

तयात अजून आश्चर्य
सारीच पादत्राणे दिसती समान
कशी ओळखणार
कोणती आपली तयात?

पहा उतरल्या दोन महिला
अनवाणी पायांनी
शोधती तयांची  पादत्राणे
सर्वत्र नजर फिरवूनी

कशा  शोधू माझ्या  चप्पला
हा प्रश्न त्यांना ही पडे
क्षणभर वाटे कुठलीही अडकवावी
आणि व्हावे पुढे

हळूच ऐकू आला आवाज
असे विचार  असता मनात
लक्ष देऊन ऐकू लागता
 समजले , पादत्राणे वदले क्षणात


याsssया  लवकर तुम्ही
बसलो आहोत ताटकळत  उन्हात
आम्हास  नाही ना प्रवेश
आत देवालयात

आम्ही बसतो इथेच  पायरीशी
बसून   करितो मनात  मंथन
 वाट पहाण्यात दंग होऊनी
देवाचे मग्नतेने   चिंतन

तुमच्या  देव दर्शनाचे चरण
जेसे आम्हास स्पर्शता
मिळे आम्हा सदा
 देवदर्शनाची धन्यता

ऐकूनी विचार  पादत्राणांचे
माझे मन मलाच विचारी
काय काय विचार  केलेस मनात
मुक ,  त्या पादत्राणा विषयी

किती उदात्त  विचार  तयांचे
कळले , उमजले  माझे मजला
तोकडी वाटे माझी च लेखणी
क्षणात  ध्यानात आले मला.

शुक्रवार, १७ मे, २०१९

दाम करी काम



दाम करी काम ( १२ वर्णीय) 

पैशासाठी धडपड सारी जगी
कधी न पाहती मागे वा पुढती
कसे ही करूनी पैसा मिळवती
दाम तर करी काम या जगती

जात्याच माणूस पैशाचा गुलाम
पैशामागे धावे सारी ही दुनिया
दाम तर मिळवी लाख सलाम
पहा ही सर्वत्र पैशाची किमया

असुनही जरी गुणवत्ता कमी
दाम देताच येई कामास गती
होतकरू सदाच मागे रहाती
काय करणार हुशारांची मती.

दाम असते सदा काम करत
नियम सारेच बाजूस सारून
कामे होती सहजतेने सरळ
देऊन पैका टेबलाच्या खालून

संस्कृतीची खर तर शिकवण
जरा आठवावी वचने -संतांची
पैशापायी विसरले सारे जण
दामानेच फिरते बुध्दी जनांची.

वैशाली वर्तक 8/5/2019

सोमवार, १३ मे, २०१९

लेख...भय/भिती. कविता. भय कुकर्माचे


           भिती/भय
      लहान ३/४ वर्षाची तनु उगीचच कटकट करत होती . व रडत बसली होती . समोर ठेवलेले दुध पीत नव्हती. तिची आई तिला समजवत होती. बरेचदा समजवून झाले. गुण्या गोविंदाने , प्रेमाने, लाडाने, पण ती काही रडणे थांबवित नव्हती. शेवटी कंटाळून दमदाटी देण्यास सुरुवात केली. व मग शेवटी रागावून म्हणाली,आता पोलीसांना बोलवेन हं !कोण उगीचच रडतय. केव्हाचे! "पोलिस" शब्द ऐकून छोटी तनु म्हणाली ,"नको नको .पोलीस नको म्हणत तिने पुढ्यातील दुध हळूहळू संपविले. व रडणे पण बंद केले . एकूण काय तनूच्या आईला तिचा हट्ट ,रडण संपविण्यास पोलीसांची भिती वा भय दाखवावे लागले. भय तयार करावे लागले. भिती ही माणसाच्या मनाची एक संवेदना आहे. मनुष्य लहान म्हणजे अगदी तान्हा असतो तेव्हा त्यास कसलीच भिती नसते. ना अग्नी ,ना कुठला प्राणी . जस जसा त्याच्या मेंदूचा विकास होतो. तस तसे त्याच्या मानसिक भावनांचा संवेदनांचा विकास होतो. त्याच्या राग लोभ मोह भय भिती वगैरे भावना जागृत होतात. त्यातील भिती या भावनेचे पण अनेक प्रकार असतात. भय जात्याच असते भिती ही तयार केलेली वा तयार झालेली असते भय ब-याच गोष्टींचे असते .जसे अंधाराचे भय . अंधारातून जावयास बालवयात भिती वाटते.अंधारात असुरक्षितता भासते. त्यामुळे असुरक्षिततेचे भय असते. मुलींंना वा स्त्री जातीला वा सर्वाना अंधारातून जातांना असुरक्षितता भासते. व त्यामुळे अंधाराचे भय वाटते. असुरक्षिततेचे भय स्त्रीयांच्यात नेहमी असते. वेळ प्रसंगी तोंडावर न दिसू देता वरून शूरपणाचा, धारिष्टतेचा आव आणून प्रसंगावधानाने वेळ निभावून नेतात. पण मनात असुरक्षिततेची भिती असतेच. तशीच असुरक्षितता वस्तूंच्या बाबतीत असते . त्यामुळे चोरीचे भय तर सर्वाना असतेच.किंमती वस्तू ,दाग दागिने महत्वाचे पेपरस् वगैरे हरवू नयेत .त्यांना जपण्याचे, गहाण तर होणार नाहीत ना असे भयाचे दडपण मनात असतेच. त्याच प्रमाणे भिती अपयशाची वाटत असते. आपण नक्की केल्या प्रमाणे मार्कस् मिळतील ना? पुढे मना सारखे जॉब वा सर्वीस मिळेल ना? मनासारखे यश प्राप्त होईला ना? अशा प्रकारच्या मानसिक दडपणाची भिती मनात असतेच. पण काही भिती अशा असतात ज्या मनात ठाम मांडून असतात .काही अशा गोष्टींचे भय मनात सतत असतेज्याला फोबिआ (अकारण भिती)म्हणतात .अति उंची चे भय ,अति उंचावरून खाली पहाणे भितीदायक वाटते. वा लिफ्टमधे बसण्याचे भय , ईलेक्ट्रीसीटीचे भय ,पाण्याचे भय, वगैरे. तसेच काही भय वाढत्या वयानुसार कमी पण होतात. काही भय वा भिती अशा असतात की भिती वाटत असून मनोरंजन म्हणून भिती वाटत असून त्या भयाचा अनुभव घेण्यास आवडतात. जसे मेरी गो राउंड वा रोलर कोसटर ची राईड वा झुरासिक पार्क मधील राईड . Bounty jumping या राईड मधे मनोरंजन म्हणून बसतात मोठ्याने ओरडून भय दूर करतात . व मजा व साहस अनुभवतात. तसेच प्राण्यांचे भय असते. अगदी कुत्रा सारख्या प्राण्याचे वा बायकांना तर पाल झुरण सारख्याचे भिती /भय असते . कुठे गेले की आधी भिंती कडे नजर टाकून पाल नाही ना ?ची खात्री करुन घेतात. आणि त्यांना कुठून तरी दिसतातच .म्हणतात ना "भित्या पाठी ब्रह्मराक्षस" सभाधारिष्टतेचे भय पण असते. वक्ते होण्या अगोदर चार लोकांच्यात बोलणे सभेला उद्देशून बोलणे.नटांना वा कलाकारांना अगोदर भिती असते पण मग सरावाने त्यांना अंगवळी पडून भिती रहात नाही. पुढे सहजतेने सभा धारिष्ट्यता येउन भिती दूर होते. अशी अनेक प्रकारची भिती माणसास असते. पण ह्या सर्वाहून भय असते,ते आपल्या हातून कधीच वाईट गोष्टी ,कर्म घडू नये. खोटे बोलणे ,चोरी ,लबाडी ह्या पासून दूर रहाणे. व हे भय सकारात्मक भय आहे. त्या भयाने आपले मन सदा पापभीरू रहाते. व मन वाईट कृत्यापासून परावृत्त ठेवते. एवढेच नव्हे तर आपले मनोबळ वाढविते. सकारत्मकता अंगी आणते. तेव्हा प्रत्येक कर्म करतांना चांगलेच काम करण्याची वृत्ती बाळगण्याचे भय सतत बाळगावे, म्हणजे ख-या अर्थाने "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे." असा देवाचा संदेश कानात घुमत रहातो. व आपण भय मुक्त होतो.


सायबर क्राईम मधे...........










कमल विश्व राज्यस्तर स्पर्धा साहित्य समूह
आयोजित, मार्च २०२३ ,मासिक भव्य राज्यस्तरीय काव्य लेखन स्पर्धा
*स्पर्धेसाठी*
 विषय ...भय

   शीर्षक..*भय कुकर्माचे*


भय ही मानसिक भावना
करी मनास विचलित 
वाढे चिंता, काळजी मनाची
मन होई भयभीत.

भयाचे असती प्रकार अनेक 
अपयशाचे , चोरी  वा अपघाताचे
 सुरक्षितेचे भय,नारी जगताला
मनी सदैव लज्जा रक्षणाचे.

पाणी, वीज ,अग्नीचे पण भय
भासते जनांना जीवनी.
आयुष्य सुख दुःखाचा खेळ
भय बाळगू नये क्षणोक्षणी .


नैसर्गिक आपत्तीचे भय ,सर्वांनाच
तया समोर न चाले कोणाचे काही 
नामस्मरण, धावा देवाचा हाच उपाय 
तोची कर्ता करविता सदा राही.

पण असावे सदा मनी *भय*
पापकर्मे टाळण्याचे जीवनी
*'भिऊ नको मी  आहे पाठीशी*
 स्वामींचा संदेश मिळतो मनी.

  वैशाली वर्तक
 अहमदाबाद




गुरुवार, ९ मे, २०१९

जल हेच जीवन

जल हेच जीवन           
                                                         9/5/2019
पंच तत्वातील तत्व
"जल " एक तत्व असे
पाच  तत्वांची गरज
मानवास  सदा भासे

अन्न  वस्त्र न् निवारा
जरी मूलभूत गरजा  
जला  शिवाय जीवन
शक्य  नसेच समजा

विसंबून  जलावरी  
जल चर  सारी सृष्टी
कसे पिकविन  धान्य   
पोशिंद्याचा  जीव कष्टी  

जलामुळे मिळे वीज
घडे औद्योगिक क्रांती
जला शिवाय जीवन
ख-या अर्थाने विश्रांती

थेंबे  थेंबे तळे साचे
मोल जाणावे जलाचे
वसुंधरा भेगाळली
कसे होईल जगाचे

पाणी हे निसर्ग दत्त
तरी जाणा त्याचे मोल
जल   जिरवा  मातीत
राखू     निसर्गाचा   तोल

निसर्गाचा  नसे कोप
मानवाचा अती लोभ
प्रगतीच्या नावाखाली
थांबवुया आता क्षोभ.

     ......वैशाली वर्तक.( अहमदाबाद )

रविवार, २८ एप्रिल, २०१९

भेट ठरली अखेरची


भेट अखेरची
वाढदिवसाचा दिवस . खर पहाता तर , आता काही जन्म दिवस साजरा करण्याचे वय नाही . आणि तसे ही आपल्याकाळीं कुठे लहानपणी आजच्या सारखे वाढदिवस साजरे करायचे.कित्येक घरी तर आज वाढदिवस माहीत पण नसायचे. पण , सध्या तर वाढदिवस साजरे करण्याचे फँडच झाले आहे. अगदी सकाळपासून आपण फोन जवळ अथवा फोन हाताशी घेऊन बसावे लागते . आणि whatsapp वर तर वाढदिनाच्या शुभेच्छा दुथडी भरुन वहात असतात....मग 2/4 तासांनी..... धन्यवाद देणाचे काम करावे लागते . .... त्याशिवाय हल्ली तर आदल्या दिवशीच रात्री 12 वाजता, दिवस सुरु म्हणून बारापर्यत जागून केक कापणे ..शुभेच्छा देणे चालते. अर्थात तिच्या कडे रात्री ला केक कापणे झाले ही नव्हते व होत पण नव्हते. पण सकाळ पासून फोन ची वर्दळ सुरु झाली होती. त्यामुळे ती पण येणारे फोन रिसीव्ह करत होती.
     तसे पहाता... तिचे फारसे लक्ष नव्हते.....येणा-या फोनकडे. पण काय करणार?
 फोन तर घ्यावे लागत होते. आणि मग  ओघाने .....बोलणेही  आलेच. 
फोन आला की डोळ्यात पाणी तरारायचे, थोडा   दाटलेला आवाज व  लगेच समोरुन  सांत्वनाचे संभाषण. खरच आहे .दिवसच  तिच्या साठी तसाच होता. 
     सकाळी तिने चहा घेतल्यावर कपाटातून चार गुलाब डायरीत ठेवून वाळवून  (वाळलेले आपल्यासाठी बर का !  पण तिच्या साठी ते  गुलाब अजून तितकेच टवटवीत आहेत .) त्या वाळविलेल्या फूलांची तयार केलेली फ्रेम हातात घेऊन , क्षणभर पहात  असता नकळतच  अश्रूंचा वर्षाव  त्या फोटो फ्रेमवर  होत होता.... हो ...तशीच आहेत ती फूले. तिला वाढदिनाच्या दिवशी, तिच्या मिस्टरांनी दिलेली फूले होती ती.. तिने ती फूले प्राणापलीकडे जपलीत .अगदी  शेवटची आठवण नात्याने तिने त्या फूलांची फ्रेम करुन घेतली व ती फ्रेम तिला जवळ असली की मिस्टर अजून सोबत आहेत असे वाटते. त्यांच्या सहवासाचे मानसिक  सुख तिला मिळते . त्या फ्रेमशी  ती  बोलते. व सहवास सुख अनुभवते. 
        खरच  4/5 वर्षापूर्वी जन्मदिवस  निमित्तानं दोघे   जण  एकत्र मssस्त  बाहेर जेवावयास गेले . आल्यावर एकत्र  बसून निवांत  नेहमी प्रमाणे गप्पा केल्यात....तसेही त्यांच्यात वाद फारच कमी व्हायचे. ... फारच कमी जोडपी अशी असतील.....  हल्लीच्या  काळात , कीं  वाद नाही होत. नक्कीच  दोघे एकमेकास पूरक होते. वरूनच जोडी देवाने करून पाठविली होती म्हणायचे.  एकदुजेके लिए  म्हणतात ना तसे  जोडपे होते.    गप्पा झाल्यावर दुपारचा चहा घेऊन  तिचे मिस्टर तिच्या  संमतीने  कल्ब मधे  ब्रीज खेळावयास तिला येतो म्हणत  निघाले. 
          येथे घरी संध्याकाळी  दीर व वहीनी शुभेच्छा  देण्यास व, संध्याकाळी  एकत्र  जेवण करुयात असे आमंत्रण देण्यास आले होते. दीर म्हणाला,  वहिनी असेही ,....तुम्ही , मियाबिबी  सकाळी एकत्र  जाऊन आलाच आहात .आता रात्री  आपण एकत्र  जेवुयात .असे ही  मुलगा परदेशात व मुलगी तिच्या  सासरी   तिच्या संसारात रममाण.  त्यामुळे तुम्ही  दोघे  आम्हीही  दो.चला य मग आमच्याच कडे तेथेच एकत्र  जेवु
     हो ,चालेल की  असे म्हणत तिने  संमती पण दिली. थोड्या गप्पा झाल्या ...सकाळी कुठे जेवलो  त्याचे वर्णन झाले.
     तेवढ्यात फोन आला. भावजींनी फोन जवळ असल्याने त्यांनी   फोन घेतला .  आणि.     !... ऐकावे ते नवलच.! धक्का  देणारे ,आकाश कोसळल्या गत... तिचा दीर अस्वस्थ  दिसला. फोन ठेवत ,तो म्हणाला ,"" दादाला  हॉस्पिटल मधे नेले आहे. आपल्याला तिकडेच निघावे लागेल .लगेच तीघे जण हॉस्पिटल  मधे जावयास निघाले.   असे काय झाले असेल ह्या विचारात  पोहचले. पण,... दुर्दैव
  आड आले.  तिच्या मिस्टरांची  प्राण ज्योत आधीच मालवली होती.... सर्वच अचानक. .....नाही त्रास.... नाही दुःख...  सर्वच अघटित.....दिवसभर  दोघांनी... दिवस छान मजेत   घालविलेला.  काय .... आणि संध्याकाळ,.. एकदम जोडीतील  एक जीव होताचा नव्हता झाला . काय झाले असेल? कसा विश्वास ठेवायचा? .
  आत्ता  जातांना माझ्या सोबत स्वतःच्या हाताने  बागेतील गुलाब फूले खुडून आणलीत काय !...आणि म्हणाले
     "हं     हा एक   गुलाब  माझ्या लाडक्या   हो हो माझ्या  लाडक्या मुली कडून तुला.
    हा एक तुझ्या लाडक्या मुलाकडून.तुला. आणि 
     हे एक  ...नातंडांकडून ...
   आणि हे माझे  स्वतःचे माझ्या  प्रिय  बायकोस
अशी  ही  फूले देत ,पुन्हा  वाढदिनाच्या शुभेच्छा देत.हसत मुखाने निरोप घेत ,"येतो" म्हणत  निघालेला, सदा active  तिचा जोडीदार तिला कायमचा सोडून गेला होता. सहाजिकच ती  शेवटची  फुलांची वाढदिनाची  भेट  ठरली होती. तिने पण अगदी प्राणापलीकडे जपली आहेत.,
आज पण ती फूले तिला , "मी तुझ्या  जवळच आहे "ची  सदा जाणीव देत असतात.

........वैशाली वर्तक 





रविवार, २१ एप्रिल, २०१९

गोष्ट साध्या गाऊनची

   

        गोष्ट साध्या गाउनची
  
     झाले मी  आता 65 ची .   आज पर्यत घरात वा बाहेर कुठेच , साडी शिवाय 
वावरले नाही.  पण आता मात्र  वाटते ...कधी कधी घरात  गाऊन  घालावा.  खर काय  हरकत  आहे ना?  साडी पेक्षा सुटसुटीत राहिल.   असेही ऊन्हाळ्यात फारच उकडत .आणि   आपल्याकडे  गुजराथ  मधे तर  गर्मी  सदाच   "मी"  म्हणत असते.  थंडी चे दोन महिने सोडता ,सदा सर्व काळ एकच ऋतु आणि तो म्हणजे ऊन्हाळा.  आss णि   रात्रीचे  च   घरात घालायला काय हरकत आहे.  ? ...आता ..  आहे  मी तशी थो sडी   जाडी   वा  जाड्यापैकी.....पण त्यात काय  माझ्या  सारख्या लठ्ठ बायका नाही का घालत  गाऊन ?  आणि मला कुठे बाहेर जायचय .? घरातच  तर  घालाचाय.!  
     शेवटी , मी विचार मनी  पक्का केला. म्हटले दर मंगळवारी दारावर च गाऊन आणि  इतर होजीयर मटेरियल घेऊन येतोच तो विक्रेता . अगदी मंगळवार ठरलेला 
असतो त्याचा. 
     जसा मंगळवार उजाडला मी त्याच्या  येण्याची वाट पहातच होते.   तेवढ्यात  विक्रेत्याची
    " नाना  मोटा बाळको माटे  कपडा ,  तेमज काॕटनना गाऊन   " अशी आरोळी ऐकली व  मी  बाहेर ओट्यावर येऊन बसले. म्हटले दाराशी आला की थांबवूया त्याला.  
         तो दाराशी आला .मी त्याला माझ्या  मापाचा गाऊन मागितला. त्याने लगेच  5/6  वेगवेगळ्या रंगात  गाऊन माझ्या  हातात दिले.    बर , दारातच असल्याने त्याने तुम्ही  "द्या  व घालून पहा ."  माप व्यवस्थित  होतोय  ना पाहून घ्या. . मी लगेच रंग  पसंत करुन दोन गाऊन घरात घेऊन गेले व घालून पाहिले.... ठीक वाटले .मग मनाची तयारी करुन एक नक्की  केला. व दुसरा परत दिला. 
    सहजच  समोर  ओट्यावर  भाजी निवडत बसलेल्या  सुनेला पण  विचारले,
"ठीक  वाटतोय ना ग गाऊन ?"
  तर  ती  म्हणाली . , "हो हो"
तिला म्हटले , "अग पैसे दे ना. "
तर  ती चक्क  नाही उत्तरली. असा राग आला मला.
मी विचारले , " का ग?"
तर म्हणे आमच्या जवळ कुठे पैसे आहेत ?
सासरे तुम्हाला  पैसे देतात दर महिन्यात .आम्हाला कोण देत ? "
"नवरा (तुमचा मुलगा) आम्हाला  दुध भाजी इतरचे  पैसे देतो , ते सगळे रोजच्या खर्चात  संपतात. "
   मी उठले... तडक फोन लावला  मुलाला.    मुलगा  व  मीस्टर दोघेही , जवळच आमचे सोन्याचे दुकान आहे . तेथे दुकानात  सकाळी जातात .मुलगा दुपारी जेवण झाल्यावर मार्केट मधे जाऊन पाॕलीश वा रिपेरिंग ला दिलेले दागिने  द्यायला - घ्यायला जातो.  , बsssर झाल  तो  तेव्हा दुकानातच होता. 
       फोनवर  मुलाला  झालेला प्रकार सांगून सूनेची तक्रार  केली. 
मुलगा तावातावाने आला. गाऊन वाला नेहमीचा च   व नेहमी येऊन -येऊन ओळखीचा झालेला. पुढच्या बोळाशी गि-हाईकांच्या घेराव्यात उभा होता . मुलाने आधी  त्याचे गाऊनचे  पैसे देऊन त्यास  मोकळे केले  . आणि .नसते जरी दिले तरी त्याने उधारी ठेवली असती . ....कारण नेहमीचाच असल्याने.
मग घरात येऊन आई शी व आधी बायकोशी बोलला. 
"काय ग तुला पैसे द्यायला काय झाले होते.   ती-न-शे  रु नव्हते  तुझ्या जवळ.?
बायको  म्हणाली , "तुमचे वडील तुमच्या आईला पैसे देतात.  तर , द्यावे ना त्यांनी त्यातूनच. .करावा स्वतःचा खर्च .
  मुलगा बायकोला म्हणाला ," असे  काय करता तुम्ही दोघीजणी  ?
तर बायको रागाने  बोलली  तुम्ही आम्हाला देतात  का वापरावयास पैसे ? 
आम्ही ठरलो गृहीणी. कमवत नाही .नोकरी  तर   करु च दिली नाही. तुम्ही जे पैसे देतात ते रोजच्या दुध भाजीपाला   किरकोळ खर्चात वापरतो. तेव्हा अशा खर्चा साठी  तुम्हीच पैसे दिले पाहिजेत ना.?
    अग, पण तुझ्या  जवळचे   पैसे आता दिले असते तर काय बिघडले असते..?
त्यावर   लगेच सासू  बोलली. हो  ना  आजकाल दोघी सुना कपडे रिपेअरींग
ची  कामे  घरात मशीन वर करतात .तर चार पैसे मिळवितात  तर त्यातून हीने द्यावेत ना ..
  पण    ना ssssही. चक्क  नाही आहेत म्हणतेय .
     मुलाने पण आईच्या वाक्यास दुजारा दिला. व  बायकोला म्हणाला , "अग आता दिले असते तर काय बिघडले असते. .प ss ण  छे.! जरा ही समजून घेण्यास तयार 
नाहीस तू. 
      आणि सासू म्हणाली   
तुम्ही म्हणता पण ,  आमच्या वेळी  कोण  देत होते हातात पैसे .? काय हवे तेवढे सांगायचो.  वस्तू  पुरूष मंडळी  घरात आणून टाकायचे. 
  तसेच मी केले तुमच्या शी फार काही वेगळे नाही केले .
         तर सुन म्हणाली , तुम्हाला तुमच्या सोयी नुसार साडीतून गाऊन मधे बदल  करावासा वाटला. व   मी  तर म्हणेन ,... तो योग्य  पण आहे. .पण  .....तसाच काळानुसार  विचारांचा  पण बदल करा की .   
      हं....  
  .खर काय  झाल .दोघींचा अहं जागा झाला. आज पर्यंत सासूने सुनांना पैसे वापरण्यास दिले नाहीत . नव-याकडून मात्र मागून घेऊन स्वतः साठी खर्चत राहिली . आता सुना दोन पैसे कमवू लागल्या तर त्यांनी वाचविलेले व कमविलेले पैसे सहाजिकच आहे ना, ... त्या स्वतः साठीच ठेवणार. 
    प्रत्येक बाईने सुनांना पण मुली प्रमाणे वागविले पाहिजे. त्या आपल्या घरच्या  लक्ष्मी आहेत .त्यांना घरात नुसते कामासाठी  नव्हे ,  तर घरची आदरणीय व्यक्ती  नात्याने मान दिला पाहिजे. तर ती घरातल्या माणसांना आपले मानते व   घराला घरपण देते. 
   पहिल्या पासून अशी वागणूक  न दिल्याने  त्या सूनांनी  त्यांच्या  सासू मधे " आई" कधीच पाहिली  नाही .त्यांना सासूत  आई कधीच दिसली नाही. असे sssही   सासू आई सारखी होउ शकते, ..,, 
पण आईची जागा घेउच शकत नाही.  आणि अशी वागणूक  दिल्यास.,. .. तर कधीच  शक्य नाही.
      तेव्हा साध्या गाऊन  विकत  घेण्यावरुन  उद्भवलेला हा  प्रसंग.  पण सासूला शिकवण रुप आहे. सासूने  समजून  उमजून आता  तरी स्वभावात बदल करणे  वा 
बदलत्या काळा प्रमाणे   वागली    स्वतःला बदलले   तर  सुना, ...एक गाऊन  काय त्या  सासूसाठी तिच्या  सुना ,जशा आपल्या आईची गरज भागवितात तशा सासूच्या गरजा  पण  स्व खुशीने  भागवतील.
     प ss ण   हे  सारे शेजारच्या  सासूस कसे  व कोण सांगणार .....?
 पण  होईल ... होईल  सासूला  पण  भूतकाळात केलेल्या चूकांची उपरती , असेच   छोटे मोठे  प्रसंग  तिला आपोआप  स्वतः  मधे  बदल करायला लावतील. अनुभवाने ती   पण सावरेल शिकेल. ....

        
 ........  वैशाली वर्तक








.

 


गीत...... माझ्या भारत देशाचा.

देशभक्ती गीत  माझ्या भारत देशाचा, मला  सदा अभिमान प्राणाहून असे  प्रिय, तयाच्या  गौरवात शान भाव वसे समतेचा ,धर्म नांदती अनेक नसे भेद- भाव जन...