सोमवार, २० जून, २०११

लेख. सहजीवन \वाट चाल प्रेमाची(कविता)

                                                              सहजीवन
                डिसेंबर महिना होता. मी शेवटची उरली सुरलेली आकस्मित रजा casual leave  घेण्याच्या मूड मध्ये होते. सुट्टी घेतली तरी रजेचा मूड न येऊ देता सर्व कामे ऑफिसच्या   वेळेवर  आटपून  बरेच दिवसानंतर वा महिन्यानंतर सकाळचा " कामगार सभेचा" कार्यक्रम लावून मी जवळच  पडलेले   मासिक     चाळत होते. ध्वनिमुद्रीकांचा कार्यक्रम चालला होता.ध्वनिमुद्रिका चालू होती ,
                     दिसते मजला सुख चित्र नवे
                    मी संसार माझा रेखिते .
                मी गाणे ऐकता ऐकता २५  वर्षापूर्वीच्या
काळात ओढले गेले दोरीचे रीळ उलगडावे
त्याप्रमाणे काळाचे रीळ विचारांच्या तंद्रीत उलगडले गेलेव ८ जुलै साखरपुड्याचा दिवस
आठवला .त्या अगोदरएकमेकांनी "जीवनसाथी" म्हणून पसंत करण्यासाठीची पहिली भेट आठविली . लगेच
साखरपुड्याच्या दिवशी सासूबाई आणि नणंद यांचे
साखरपुड्याला जमलेल्या त्यांच्या  (आता माझ्या) नातेवाईकांसमोर कौतुकाने सांगत असलेले "
 आमच्या घरातअगदी शोभणारी आहे हो !दोघांची जोडी अगदी साजेशी आहे . आणि हो ! खेळाडू आहे. इंडिया रीप्रेझेंट केले आहे बर कां ! सुवर्णपदके मिळवली आहेत हो ! "असे शब्द
 कानांत घुमले. मग साखरपुडा ते लग्न अवधी म्हणजे जवाबदारी नाही. नुसते तयार होणे ,खरेदी करणे,
हिंडणे ,फिरणे, हॉटेलिंग करणे .नोकरीला जाणे व तासान तास उद्याची स्वप्ने रंगवित कधी बागेत बसून
गवत खुरडत ,तर कधी रेतीत उगीचच रेघोट्या मारीत बसणे. साखरपुडा ते लग्न म्हणजे सुवर्णकाळ ,
तो पण डोळ्या समोर  सरलेला आठवला.
            नंतर ठरल्याप्रमाणे सुमुहुर्तावर दोन कुळांचे मिलन झाले. एका घरची लेक दुस-या घराची मोठी
 स्नुषा म्हणून मी घरात प्रवेशकेला.  नोकरी निमित्याने आमचा संसार वेगळ्या गांवी करावा
 लागला त्यामुळे घरात राजाराणीचेच राज्य होते. स्वत:च्या मनासारखा संसार लावतांना लहानपणीचा भातुकलीचा संसार आठविला व मग प्रत्यक्ष
 संसार लावतांना आलेल्या अडचणी आठवल्या . एक-
 एक करत पूर्ण संसार सुख वस्तूंनी भरला गेला.तो संसार लावतांना दोघांनी एकमेकांना दिलेली साथ, कधी कधी केलेली काटकसर, कधी उगीचच धरलेले स्त्री हट्ट
( आता ते  हट्ट उगीचच धरले वाटतात  पण तेव्हाचे जिद्दीचे हट्टीपणाचे दिवस) मग  त्या हट्टापायी झालेला रुसवा, फुगवा  कधी कधी वाद- विवादआणि
 मग रडणे.पण त्यावेळी सुखी संसाराची भटजींनी
 लग्नमंडपात सांगितलेली व  रुखवतात  तयार   करून
 मांडलेली खसप्तपदितली संयम, सहनशीलता,
 तडजोड वगैरे पावले कधी कधी माझ्याकडून तर कधी यांच्याकडून अपोआपच अनुसरली गेलेली पावले आठविली ..
                अशी सप्तपदी नंतर  , पुढे संसाराची  वाटचाल करतांना संसार वेलीवर पहिले पुष्प उमलले .मग त्या प्रथम पुष्पास गोंजारण्यात, त्याचे कोडकौतुक लाड करण्यात दोघांचे जीवन कसे रसमय झाले .त्याचे लाड करण्यात व त्याच बरोबर त्यास उत्तम संस्कार देण्यात दोन्ही कडील आजी आजोबा मागे पडत नव्हते.कारण सर्वांचे ते मन रिझवणारे पहिले वहिले खेळणे होते. असे असतांना सहजीवनाच्या वेलीवर दुसरे  पुष्प पण उमलले . मग त्या दोघांकडे लक्ष देण्यात नोकरी करून,घर सांभाळून,आले गेल्याचे पहाण्यात, पाहुणचार  संभाळण्यात तर कधी सामाजिक तसेच कौटुंबिक प्रसंगात भाग घेवून संसार करतांना परस्परांकडे जाणता अजाणता लक्ष देवू न शकल्याने (हो  सध्याचे धावपळीचे  जीवन ना!) एकमेकांत  झालेली शाब्दिक वाद चर्चा मग
एकमेकांचे  चढते आवाज, व शेवटी कधी कधी अं sssह,  कधी कधी कसले ? नेहमी " पदरी पडलं  पवित्र झालं " असे म्हणत देखील पूर्ण केलेली भांडणे
आठविली .हो खरच,आहे .मला नाही वाटत भांड्याला
भांड न लागता संसार होत असेल कारण कोठेही
 दोन व्यक्ति एकत्र  आल्या की विचारांचे मतभेद होणारच .तेव्हा  कधी कधी "अगदी कंटाळले या संसाराला ! कुठून लग्न केले व या व्यापात गुरफुटले. त्यापेक्षा आधीचे आयुष्य किती स्वच्छंदाचे होते ! कोणासही   मला काय त्रास पडतोय त्याकडे लक्ष देण्यास वेळच नाहीय. साधे दोन गोड कौतुकाचे
 शब्द जाऊ  द्या.त्याची तर  अपेक्षाच  करु  नये .
फक्त  नुसते  दोष  दाखविणे." असे म्हणत अश्रू काढीत झोपी गेलेल्या रात्री आठविल्या .पण सकाळी पहावे तर यांनी स्वतः  उठून चहाचे आधण ठेवून दिलेली प्रेमाची हांक ऐकली कीं, रात्रीचे सर्व  विसरून पुन्हा पूर्ववत सकाळच्या  कामात व्यस्त  होऊन,  दोघांनी  ऑफिसला जातांना हंसतमुखाने निरोप घेतलेली ती सकाळ
पण डोळ्या समोरून सरली .    
               संसारात स्त्रिला तिची मुलगी काही  नंतर  मैत्रिणी समान वाटते .स्त्री स्वतःचे  बालपण त्या मुलीच्या बालपणात पहात असते .तिचे लाड ,तिची हौसमौज   करण्यात ,  तिला  तयार  करण्यात,  नटविण्यात  सजविण्यात, स्त्री स्वत:ला पहात असते. आपली उरली सुरलेली हौस, तिची हौस  पुरविण्यात स्त्रिला  समाधान  लाभत  असते .व  शेवटी कन्यादानाचे  पुण्य मिळते  ते वेगळेच .  तेव्हां  मला  पण   कन्या रत्न लाभले असल्याने ते पुण्य पण  माझ्या पदरी आहे  अशा विचाराने मी हर्षित झाले.      
             आता हा संसार पूर्ण वटलेला आहे . पण खर पाहिले तर, आता नव्या नात्याची पदवी मिळण्याचे दिवस जवळ आले आहेत . कालची बागडणारी मुले आज सुजाण झाली आहेत . त्यांना देखिल त्यांचे विचार ,मत प्राप्त झाली आहेत. तेव्हा त्यांचे पण विचार मत ऐकून पुढे तर येणा-या गृहलक्ष्मी ला घर सोपवून
 त्यांचे कौतुक करण्यात,मोठ्या मनाची तयारी करायला   हवी.  आत्तापर्यत संसारात   गुरफटल्याने    समाज ,समाजसंस्था ,समाजकार्य यांच्याशी  समरस व्हावयाला  जमले नाही तर आता   त्यात  समरस  व्हावयाला हवे .तसेच कधी आर्थिक  तर कधी कौटुंबिक जवाबदारीने हे सुंदर जग निहाळता
आले नाही  तर आता पर्यटन करावयास हवीत .
                 असे विचार डोक्यात असतांना विचाराच्या तंद्रीत असताना  दरवाज्यावर  बेल दोनदा-तीनदा  दाबल्याचा आवाज कानीं आला . व तंद्रीतून जागे झाले धावत जाऊन दार उघडले.  दारात  "हे "  उभे होते . हे म्हणाले ,"अग करतेयस तरी काय ? मी कधीचा बेल  वाजवितोय  झोपलेली  तर  दिसत  नाहीस.  मग काय दिवा  स्वप्न पहात होतीस की काय?  मी हंसत  म्हटले  मी ,ना !  आपल्या  झालेल्या  सहजीवनाचाआढावा घेत होते. इतक्यात ध्वनि-मुद्रिकेच्या  कार्यक्रमात आता  शेवटचे  गाणे ऐका  म्हणून ध्वनिमुद्रिका  वाजू लागली,    
               देवा दया तुझी ही की शुद्ध दैव लीला
              लागो न  दृष्ट माझी माझ्याच वैभवाला .
     खरच मला वाटले, माझ्याच संसाराला. .

                                      वैशाली वर्तक

                                   
    
 

रचियता समुह 
उपक्रम

विषय- वाटचचाल प्रेमाची

एकमेकास  घ्यावे समजून
वाटचाल करावी प्रेमाची
मने जुळता ,तडजोड करता
सदासाठी  ती असते आनंदाची

साधे शब्द, नको उद्वेग
नकोत कधी गैरसमज
त्वरित करावा उकेल
नसते वाद विवादाची गरज

समज मनी विचारांची 
जुळवून  घेणे काळाशी
या सा-याच गोष्टींची 
सांगड घालावी मनाशी

मग पहा कशी प्रेमळ 
जादुई  वाटे वाटचाल
सदा निर्मळ आनंदे
करा सर्वत्र  हालचाल 


वैशाली वर्तक 

सहज सुचच गेले  ते लिहीले








  







शनिवार, ११ जून, २०११

लेख.. V. अलिप्तता


                                                  अलिप्तता 
     मनुष्याच्या स्वभावाचे अथवा वृत्तीचे अनेक पैलू असतात .हसतमुख वा
  उदासीन  मुखदुर्लभ अबोल वा बडबड्या ,समाधानी वा असंतुष्ट ,धीर गंभीर वा 
खेळकर ,एककल्ली वा मोकळ्या स्वभावाचा तर कधी अलूफ अलिप्त प्रकृतीचा   
अशी माणसे आढळतात .मनुष्याच्या स्वभावाची जडण घडण ही  तो लहानाचा मोठा   होतो 
त्यावर व ज्या माणसात वावरतो त्यावर पण थोडी फार अवलंबित असते .अथवा 
काही वृत्ती जन्मताच स्वभावात असतात .तर काही वृत्ती परिस्थितीने अंगीकारल्या 
जातात . आता अलिप्त वृत्तीवर बोलावयाचे म्हणजे ही वृत्ती थोडी फार अंगी असते अथवा 
वर म्हटल्या प्रमाणे परिस्थितीने स्वीकारावी लागते, अंगिकारली जाते .  
    परदेशात अगदी लहानपणापासून स्वतंत्र खोल्या असल्याने स्वतंत्र खोलीत 
रहाणे झोपणे याची मुलांना सवय होते .त्यामुळे पुढे पण  त्यांना आपल्या आपल्यातच  
रमणे रहाणे याची सवय लागते .भारतीय लोक परदेशात जातात, तेव्हा  त्यांना ही
अलिप्तता वृत्ती अंगीकारावी लागते .जवळ शेजारी कोण- कोण रहात आहे ? त्याच्याशी
 दोन-चार मिनिटे आपल्या अंगणातून दारातून वा बाल्कनीमधून गप्पा मारीत उभे आहेत 
असे आढळत नाही . अपार्टमेंट मध्ये सकाळी लिफ्ट मध्ये कोणी भेटले वा सामोरे
आले तर गुड मोर्न्निग ,थांक्यू स्वॉरी , हाव अ नाईस डे   या तीन चार शब्दांच्या पुढे काही 
नाही .एकत्र गाडीत सहप्रवासी एकमेकात सहप्रवाशान बरोबर गप्पा मारत आहेत असे आढळत 
नाही .आपापली पुस्तके ,वर्तमान पत्रे घेवून त्यात डोके खुपसून वाचणे .बस .त्या विरुद्ध परिस्थिती 
 आपल्या देशात दिसते . वर्तमान पत्र दुसर्याच्या  हातात असताना त्यातच डोके घालून वाचणे वा
पेपरातीलबातमी वरून चर्चा करणे ,एवढेच काय चहा अथवा नास्तापण शेअर करणे असा प्रकार
 सहजतेने  आढळतो. 
         परदेशात गेल्यावर भारतीय स्वत: वृतीने अलिप्त नसल्याने चार-पांच कुटुंबे एकत्र येऊन वीक
एंड एन्जोय करत असतात .कारण तेथील सुख वस्तूंनी भरलेले ,सर्वत्र हिरवळ असलेले
पण स्वतः:चे कुटुंब  सोडून दुसरे कोणीच नसल्याने  आठवड्यानी वा  पंधरादिवसांनी एकत्र कार्यक्रम करून जी अलिप्तता भासत असते ती दूर करण्याचा प्रयत्न करतात .    
       मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे .त्याला माणसे ,समाज लागतोच .वर्षानु वर्ष एकाच गांवात राहून 
" आम्ही कधी मंडळात,  समाजात   आलोच  नाहीत , आम्ही   मंडळाचे  सभासद नाही " असे म्हणणाऱ्या    लोकांबद्दल  आश्चर्य वाटते. कसे काय राहू शकत असतील ?  पण तसे नसते अशी मंडळी दुसरी कंपनी ,मित्र जमवून वा
,जोडून रहात असतात .तर  एकूणकाय अलिप्तपणाने रहाणे कोणासच आवडत नाही         
     सध्याच्या  धावपळीच्या युगात थोडे  फार अलिप्त रहाणे अंगीकारावे लागत आहे . वेळेचा अभाव  त्यामुळे 
आपल्या आपल्यातच  रहाणे स्विकारावे लागत आहे.काही व्यक्ती आपली मने लिखाण द्वारे  जरी चार माणसात
मिसळली नाहीत बोलली नाहीत तरी वर्तमान पत्र वा इतर लिखाण द्वारे इतरांशी संवाद साधतात.तसेच   आपल्या
 आवडी निवडी प्रमाणे पेन फ्रेंड्स बनविणे ही पण अलिप्तता दूर करण्याचा  एक प्रकारच   आहे   आपल्या  आवडी प्रमाणे मित्र शोधून थोडया  वेळा साठी  कां होईना  अलिप्तता  दूर करतात.      
      प्रौढत्वाकडे झुकल्यावर वाचनालये ,सोसायटीचे ,कॉमन प्लॉट  मधील बाकांवर ,बागेत जावून  वरिष्ठ
नागरिक त्यांची मंडळे काढून  अलिप्तपणा दूर करत असतात .कारण संसारात  मुले मोठी होवून    
 त्यांच्या त्यांच्या  संसारात रममाण असतात अशा  वेळी  वरिष्ठ नागरिक आपली समवयस्क 
मंडळी गोळा करून आपला अलिप्तपणा घालवीत असतात . अलिप्तपणा दूर करण्यासाठी सध्या  
दूरदर्शन ,कोम्पुटर  वा मोबाईल वर whatsapp वरून संभाषण ही माध्यमे तर फारच उप्यागी ठरत आहेत. ज्याच्या
साह्याने  माणूस दिवसाचा काही वेळ तरी एकाकी पणा दूर करू शकतो .
        संतांनी जरी सांगितले की,जीवन चिकूच्या बी सारखे असावे .अलिप्त .तरी सर्व सामान्य माणसाचे 
आयुष्य  आंब्याच्या कोयी  सारखे असते .कोय जशी आमरसात लडबडलेली असते ना! तसेच मनुष्याचे
 जीवन  संसारात लडबडलेले असते. संतांनाच तो अलिप्तपणा जमतो .पण सर्व सामान्य 
माणसांना नाही. तेव्हा  लेखन ,वाचन ,चित्रपट  पाहणे दूरदर्शन चे कार्यक्रम पहाणे ,कोम्पुटर च्या माध्यमाने
  अथवा आपल्या  हॉबिज जपून,,कला क्रीडा वगैरे च्या  साह्याने काही काळ तरी अलिप्तता 
दूर करू शकतो . बाकी  अलित्पपणा कोणासच पसंत नसतो .     

रविवार, २२ मे, २०११

killi

                                                                    
                                                                          किल्ली 
             काय वैताग आणलाय या किल्लीने ! सळो की पळो करुन सोडले.  एवढी छोटीशी वस्तू पण ,जर व्यवस्थित जागी ठेवली नाही की झाले.  खरच म्हणतात ना, गरजेच्या वेळी वस्तू व नोकर मिळाले तर स्वर्ग लाभल्याचा आनंद मिळतो.  पण छे कुठले काय ? इतके कुठले आपले भाग्य ? कुठे ठेवली गेली काय माहित नाही. सकाळी बँकेत जाताना कायनेटिकची किल्लीमिळालीनाही,त्यावेळीस डूप्लीकेट किल्लीचा वापर करुन बँकेत उशीर होत असल्याने वेळ  तरी निभावली.  बरे झाले ,ती  डूप्लीकेट किल्ली तरी  मिळाली.नंतर बँकेत पोहोचल्यावर टेबलाची किल्ली पर्स मध्ये असून दिसत नव्हती.  त्यामुळे तेथे  पण किल्लीने त्रास दिला.  संध्याकाळी घरी आल्यावर मंडळाच्या मिटींगला जावयाचे होते, पण मागच्या मिटिंगचे, मिनीट्स लिहावयाची डायरी ज्या कपाटात ठेवली होती,  त्या कपाटाची किल्ली मुलाने कोठे ठेवली, ती  न मिळाल्याने शेवटी मिनिट्स पुन्हा लिहून काढण्याचा खटाटोप करावा लागला. अशा रीतीने आज मीराची किल्ली या वस्तूने मानसिक स्थिती पार बिघडवली होती.आज जरा वैतागून च मीरा झोपली .
              मीराला झोप लागली.  थोड्याच वेळात काय गंमत ! दिवस भरात न मिळालेल्या किल्ल्या मीराला वाकुल्या दाखवित होत्या. व नाचत होत्या .त्यातील कपाटाची किल्ली तर म्हणत होती, काय ग , का वैतागता आमच्या  सारख्या निर्जीव वस्तूंवर ? आम्ही तर तुमच्या सुखसोयीसाठी आहोत.तुमच्या वस्तू,  तुमची घरे, वहाने यांच्या सुरक्षिते साठी आम्ही आहोत. स्वत: नीटव्यवस्थित तुम्हीच नियत केलेल्याजागी
आम्हांस  ठेवा बस. रहा  की मग  निर्धास्त होवून . आमच्यावर भरवसा ठेवून जगभर ,देशभर ,गांवभर हिंडता .कुलूप नीट  लावून दोन दोनदा ओढून खेचून बंद केले ना याची खात्री करता . पण मग निर्धास्त होवून आम्हास  पर्स मध्ये कपाटात वा इतर नियत जागी जपून ठेवा ना ! म्हणजे वैतागावे  लागणार नाही .
               आमची ऐटच आहे तशी.घराशी आल्या आल्या प्रवेशकरताना आमची प्रथमआठवण होते.घरात
शिरताच डाव्या अथवा उजव्या हाताला आमच्यासाठी आकर्षक घरे बनवून आमची जागा केलीअसते. बाहेर जाता तेव्हा   पर्स मध्ये वा खिशात अगदी हृदयाशी जपून ठेवता .आमची रूपे
अनेक पण काम मात्र एकच मानव जातीची सेवा करणे .तुमच्या वस्तूंचीनीट काळजी घेणे .त्यांची
सुरक्षितता राखणे .आम्ही  तुमच्या सेवेला विविध ठिकाणी हजर असतो .तुमच्या वहानांची सुरक्षितता जपतो .त्यामुळे तुम्ही धावपळीच्या जीवनात वेळेवर पोहचता .एवढेच काय घरातील कपाटे, बँकेच्या लोकरच्या किल्ल्या ,बाहेरगांवी जाताना सुटकेस ची  किल्ली,ऑफिसेसच्या किल्ल्या ,अश्या अनेक ठिकाणी आम्ही  तुमच्या सेवेला हजर असतो .
              नवीन लग्न झालेल्या मुल्लींना कपाटाच्या
किल्ल्या सासूबाईंनी सांभाळण्यास दिल्या आहेत हो! म्हणत चांदीच्या छल्ल्यात आम्हाला अडकवून, कंबरेस लावून मिरवतांना मनात आनंद वाटतो ,पण
जवाबदारी  पेलणे जमावे लागते .
           लहान मुलांना आनंद देण्याच्या ठिकाणी पण आम्ही आहोतच .किल्ली दिली की चालणारी खेळणी तेथेपण आमच्याच किल्ली बिरादरीतील
किल्लीच असते. जिच्या सहाय्याने खेळणी चालतात. गाड्या  धावतात, बाहुल्या नाचतात ,कुत्रे उड्या मारतात अश्या अनेक खेळण्यात आम्ही असतो पण त्या खेळण्याच्या किल्ल्या म्हणजेच आमचीच  बदलती रूपे आहेत  . हीं बदलती रूपे  तुम्ही  जपली नाहीत तर  ती  खेळणी निरुपयोगी होतात .आमचे काम एकच तुम्हाला आनंद देणे, तुमची सेवा करणे.
           हाशsहुश करत ऑफिस मध्ये जाऊन टेबलाजवळ येता व प्रथम आठवण होते ती आमचीच समोर आवासून पडलेले काम पाहून पर्समध्ये भिरकवलेली किल्ली नाही मिळाली की जीवाची तडफड करता .पण आधीच योग्य जागी ठेवाना !.
           आम्हीजाणतो सध्या धावपळीच्या युगात तुम्हा मानवावर कामाचा ,तसेच  जवाबदारीचा खूप ताण पडत आहे. दिवस भराच्या दगदगीत जीव थकतोय पण आम्ही  निर्जीव वस्तू करणार तरी काय?आम्हाला वाच्या नाही .वाचा असती तर ओरडून आम्ही कोठे आहोत.हे तुम्हास सांगितले असते. पणआम्हास तुम्ही  मानवांनी या विज्ञान युगात वाचा दिली आहे . त्यामुळे कधी कधी आम्ही  चमकून, प्रकाशित होऊन वा आवाजाने  आमचे वास्तव्य कोठे आहे ते दर्शवितो .
              आम्हासअडकविण्यासाठी कंपन्या ,बँका,
मेडीकॅल कंपन्या सर्व जण त्याच्या जाहिरातीसाठी
कीचेन काढतात त्यात आम्हास विराजमान करतात.
कुलूमहाशयांचे बरे असते एका जागी बसून
लटकून  रहातात. त्यांना आम्ही बंद करून स्थगित करून ठेवतो.त्यामुळे त्यांना शोधण्याचा फार त्रास नसतो.
            अरे हो ! कुलूप वरून आठवण झाली.  पुर्वी  रामराज्यात  म्हणे  चोऱ्या  होत  नव्हत्या.   त्यामुळे आमचे महत्व कमी होते. आज पण शानि शिंगणापूर  म्हणून गांव आहे. तेथे  म्हणे कोणीच  घरादारांना वाहनांना,  दुकानांना कुलुपे लावत नाहीत. तेथे   आमची उपस्थिती कमी जाणवते.
   फार  पुर्वी पासून भारतात  अलीगडला   आम्हांस  बनविण्याचे अनेक कारखाने  आहेत. तेथील कुलूप-किल्ल्या  जगभर प्रसिद्ध  आहेत. तसेच कित्येकांना कुलूप- किल्ल्यांचा संग्रह करण्याची पण आवड असते बरे का !  पुण्याला   केळकर  म्युझियम  मध्ये  तसेच  हैद्राबादच्या  सालारजंग म्युझियम  मध्ये आमचे विविध आकार,विविध रूपे अगदी जुन्या काळापासूनच्या
कुलूप - किल्ल्या  दिसतील.
                  आमच्यात  एक ताई किल्ली असते . जिला  मास्टर किल्ली  म्हणतात.आमच्यातील  कोणी  एक  उपस्थित नसेल तर ती सर्वांचे काम करते.  असो.  अर्थात आम्ही  निष्ठेने सेवा करतो पण आम्ही सज्जन माणसांसाठी आहोत. दुर्जन ज्यांची वृतीच खराब त्याच्या समोर आमचे काय चालणार ?  तेव्हां
 तशा वृत्तीची माणसे कुलुपावर अत्याचार करून आमच्या शिवाय तुमच्या सुरक्षितेत बाधा आणतात. त्याला आमचा नाईलाज असतो.
          कॉम्पुटर  युगात पण आमची भौतिक नाही पण सांकेतिक चिन्हांनी आमचे अस्तित्व आम्ही  ठेवले आहे. तेथे आमची आकार विरहित  शाब्दिक रूपे आहेत. साहित्यात पण आम्हाला सुविचारात
वापर करतातच की,"परिश्रम हीच यशाची गुरु किल्ली"आहे.
         आणि हो !एवढेच काय ! जीवनात सकारात्मक भावना अथवा विचार ठेवले की जीवनाकडे पाहण्याची वृत्ती बदलते .व यशस्वी आयुष्य जगता येते तेव्हा आयुष्याच्या  यशाची गुरु किल्ली कळली की सर्व कसे निर्मल ,आनंददायी वाटते .ही किल्ली ज्याला मिळाली तो सुखी होतो.तेव्हा आमच्या सर्व सामान्य नामी किल्ली या  शब्दात पण किती गूढ रहस्य आहे ना!
      तेव्हा मीरा उठ. उगाचच वैतागून झोपलीस.वेंधळ्यासारखी वागल्याने उगाच त्रागा केलास. नीट पहा मी जागच्या जागी व्यवस्थित आहे .

                                                                                                वैशाली वर्तक.(अहमदाबाद)









        

मृदगंध

विश्व लेखकांचे साहित्य मंच आयोजित  अष्टाक्षरी काव्यलेखन  विषय    मृदगंध किती  वसुने साहिल्या तप्त  उन्हाच्या झळा   काया तिची भेगाळली  भासे ज...