केली पुन्हा माखण चोरी
पडला घट लोण्याचा
मागे फिरुनी पाही कृष्णा
येईल आळ फोडण्याचा
मान मागे वळूनी पहाता
मोरपीस डोईचे झुले
गळ्यातील माळ मोत्याची
पुढे-मागे सहज डुले
काळे कुरळे कुंतल
कानी कुंडले सुंदर
भाळी चांदनाचा टिळा
रूप शोभे मनोहर
साद देण्या सवंगड्यांना
डोळे मोठे मोठे करुनी
हाताने सावरे बासरी
मनी विचार पळ काढू इथूनी
येतील सारे सवंगडी
दुध लोणी खावया
कुठे राहिला सख्या पैद्या
वाट पाहतो कन्हैया
वैशाली वर्तक
अहमदाबाद
मोरपीस पावा चक्र
पाहताच तुझे नाव
येते ओठी योगेश्वरा
सहजची लागे ठाव
मोरपीस शोभे शीरी
नीलवर्णी तव कांती
रुप तव वसे चित्ती
मग नुरतेच भ्रांती
सूर तव बासरीचे
वेड लावी गोकुळाला
हरपती त्या गोपिका
तयांसाठी तू गोपाला
मुरलीच्या नादे राधा
होई ती सदा बावरी
वेड लावी तीज जीवा
देवकीचा तू मुरारी
सुदर्शन चक्रधारी
केला दुष्टांचा संहार
योगेश्वर नाव तुझे
गळा वैजयंती हार
वैशाली वर्तक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा