मोहरली लेखणी
घन निळ्या श्रावणात ( अष्टाक्षरी)**
सरताच मृग सरी
कृष्ण मेघ अंबरात
होई दाटी ती मेघांची
सरी येती श्रावणात
खेळ ऊन पावसाचा
चाले सदा दिनभर
शोभिवंत इंद्रधनु
मधे दिसे मनोहर
चिंब भिजली अवनी
हिरवळ चोहीकडे
मोह न आवरे मना
वाटे पाहु कुणी कडे
सणवार श्रावणात
आनंदाची उधळण
लेकी बाळी घरी येता
उत्साहाने भरे मन
शिवारात डोले पिक
वाढण्याची तयां घाई
बळीराजा खुश मनीं
आनंदाने गीत गाई
......................................
लपंडाव खेळ पावसाचा
येता श्रावण महिना
हिरवळ दिसे चोहीकडे
क्षणात चमके ऊन
दुस-या क्षणी सर पडे
हिरवी झाडे हिरव्या वेली
हरित रंगच दिसे सर्वत्र
पांधरुन शाल हिरवी
अवघ्या धरेचा रंग एकमात्र
आभाळात ढगांचा गडगडाट
दामिनी चमके काळ्या ढगात
सर पडूनी जाता पुन्हा
सूर्य ढगातून डोकवे नभात
लंपडाव ऊन पावसाचा
पडे सरीवर सरी तालात
धरेला चिंब भिजवूनी
उन्ह कोवळे पडे क्षणात
झाकोळते आकाश मेघांनी
भासे भर दिवसा सांज
जल बरसूनी जाता पुन्हा
दर्शन देतात रवी राज
लपंडावाच्या या खेळातून
मधेच दिसे इंद्रधनु शानदार
लोभस रुप पहा निसर्गाचे
श्रावण मास असे बहारदार
वैशाली वर्तक.
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा