घराचा कोपरा
माझ्या घराचा प्रत्येक कोपरा न कोपरा मला आवडतो. प्रत्येक जागी काही विशेषता आहे. घराला
पुढे छान लॉन आहे. बरीच फुले झाडे आहेत. वर ,खाली ,साईडच्या अंगणात झोपाळा पण आहे.
झोपाळ्यावर झुलत बसणे फार आवडते. किती वेळ फोनवर गप्पा मारायला ..तर कधी आवडती गाणी ऐकत बसायची मनमुराद हौस पुरी होते.
हे सारे असून लॉनच्या उजव्या बाजूच्या कोपऱ्यात खूर्ची ठेवून, रोपांकडे पहात , रोपांचे निरीक्षण
करणे, कुठल्या रोपास वाढीसाठी काय हवे नको पहाणे ... त्यांच्यावर प्रेमाने हात फिरविणे,
हा छंद झालाय. कुठल्या रोपास कळी बसलीय. उद्या फुल उमलेल त्याची वाट पहाणे,
आणि सकाळी कळ्यांची फुले पाहून मन आनंदाने ने पुलकित होते. या निसर्गात मी तासन् तास
रमते. आधी सर्व लाॅन झाडून एकही पिवळे पान दिसणार नाही, सर्व अंगण निव्वळ हिरवेगार. जणु
हिरवे कार्पेट टाकलंय असे दिसायला हवे हा माझा अट्टाहास असतो. त्यासाठी मी खूप मेहनत घेते.
आणि त्या कोपऱ्याची खास काळजी घेते कारण ती खुर्ची तो कोपरा माझ्या साहित्याचे स्फूर्ती स्थान
आहे.
थंड वा-याची येई झुळुक
करी मनाला प्रफुल्लित
येती विचार मनात माझ्या
जे करीती लिखाणास उत्तेजित
सकाळीची मंद झुळूक ... त्या झुळुके सरशी डौलणारी रोपे पाहून वाटते की पाने जणु
आनंदाने टाळ्या वाजवीत आहेत. व त्यासरशी मलाही नवनव विचार कल्पना सुचतात.
याच खूर्ची तर बसून मी अनेक काव्य रचना केल्या आहेत. किती गद्य लेखन .. ललित
लेखन ..कथा लिहिल्या आहेत. .
एवढंच काय आजवर येथेच रचलेल्या कविता मी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात
सादरीकरण पण केल्या आहेत. बडोदा, यवतमाळ गेल्या वर्षी चे साहित्य संमेलन वर्धा ....
सा-या सा-या कविता जन्मल्या त्या याच कोपऱ्यात. माझ्या अंतर्मन काव्य स़ंग्रहाच्या
अधिकाधिक रचनांची हा कोपराच जन्मभूमी आहे. तेव्हा ह्या कोपऱ्याचे विशेष कौतुक असणार च ना?
आणखीन सांगायचे की, मधेच मी कोप-यात बसली असता खारुताई चपळता दाखवून जाते. दोन सेकंद थांबते न थांबते तोवर.. गवतातून काही शोधून खाते व लगेच चपळतेने पळून जाते. सतत तेथे मी बसते त्यामुळे ती पण आता निर्ढावली आहे. तिचा माझा रोजचा जणु परिचय झाल्याने मध्यंतरी तिच्या वर पण मी बाल कविता लिहिली होती. जी बाल विभाग मधे बाल मासिकात प्रकाशित झाली.
तसेच या कोपऱ्यात मी पक्ष्यांसाठी पाण्याचे दगडी भांडे ठेवले आहे. सकाळी त-हे त-हेचे पक्षी
पाणी पिण्यासाठी येतात. तेव्हा तर फारच मजा येते . मोठे पक्षी येतात ते लहान पक्ष्यांना गणकारत नाही .. लगेच लहान पक्षी त्यांना जागा करून बाजूला होतात.. मधेच बुलबुल तर ...साळुक्या तर मधेच
लहान चिमण्या... असे पाणी पिण्यासाठी येतात . पक्षी त्यांचे तन पाण्यात बुडवून मस्त पाणी उडवत स्नान करतात..मधेच धिटुकली खारूताई पण पाण्यासाठी सरसावते
असा सकाळी बर्ड शो चालू असतो. अशा मस्त वातावरणात कोणी ही सहजची रमेल अशी जागा माझी
खुर्ची.. कोपरा आहे. सकाळचे ऊन खात व्हिटॅमिन डी घेत माझी लेखणी सरसावत असते.
मधेच बाजूच्या झाडाचे पिकलेल पान ऐटीत गिरक्या घेत खाली येते .ते पाहून सहजची पिवळे पान
वा निसर्ग नियम... पिवळी पाने कशी हिरव्या पानांना जागा करून देतात. याची सहजतेने कल्पना
येते. व पानगळ नंतर वसंत येणार. निष्पर्ण झाड पुन्हा बहरेल यांची जाण होते.
असा हसत खेळत सृष्टीचा खेळ पहात...सहज निसर्गाची जाणीव करणारा.... माझा कोपरा आहे.
त्या कोपऱ्यात कधी साथीदार डास पण असतो हं. बारीक चिलटे. पण रक्त शोषून जातात
मग मला सुचते
अशा निर्मळ वातावरणी
गुणगुणे हळुच डांस कानी
भुणभुण त्याची असता चालू
दुर्लक्षित करते मोठ्या मनानी
तेव्हा असा हा कोपरा खरच स्फूर्ती दायी आहे. म्हणून मला तो अतिशय आवडतो. तुम्ही पण या
एकदा सहजच ,तुम्हाला पण आवडेल खचितच. मी एवढेच म्हणेन की
आवडीचा कोपरा असे
लाॅनच्या अंगणातील खूर्ची
जिथे बसता मजला मिळे
विचारांची सदा स्फूर्ती .
वैशाली वर्तक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा