विषयः-पावसाळी वातावरण
12 वर्णी
रिमझिम पावसाच्या वर्षावानी
अंकुरली धरणी तृणांकुरांनी
बीजांकुरे पण वाढली जोमानी
बदलला रंग च वसुंधरेनी.
पावसाने केलीय जादू ही तर
उधळूनी अवघा एकची रंग
झाली हिरवी राने वने शिवार
दश दिशा झाल्या आनंदानं दंग.
मेघराज्यांच्या प्रेमळ कृपेनेच
चोहीकडे झाले पाण्याचे शिंपण
दवबिंदू चमकती पानातून
मातीतून झाले पाण्याचे सिंचन.
जिथे पहावे तिथे हिरवळच
सारी सृष्टीच भरली चैतन्यान
नेत्र सुख भरूया वर्षभराच
केली कृपा ही सारी पर्जन्यान.
जलाशय तुडुंब भरली सारी
दिसे टेकड्या न् डोंगर नितळ
दुग्ध रुपी पडे हा जल प्रपात
तर कुठे शुभ्र जलाचे ओहळ.
गाई गुरांना मिळे हिरवे रान
मुले हर्षूनी दंग बागडण्यात
घर कौलारु शोभे हिरवाईत
वाटे अल्हाददायी मना मनात.
वैशाली वर्तक.(अहमदाबाद)
वसुंधरा चे प्रेम
प्रीतीत पावसाच्या
तप्त ऊन्हाच्या झळा साहूनी
कोमेजली धरेची काया
दिसे मरगळलेली सृष्टी
वृक्षाची कमी भासे छाया
ओती आग रवीराज
होई लाही लाही अंगाची
कृष्ण मेघांची नभी गर्दी
धरा वाट पाहे मृग जलाची
आल्या आल्या मृग धारा
भिजूनीया तृप्त वसुंधरा
ओली चिंब चिंब जाहली
चिंब प्रीतीच्या पावसात धरा
देता आलिंगन धरेस
कण कण जाहले तृप्त
मृद गंध दरवळे आसमंती
जल पिऊन वसुधा संतृप्त
बरसता जलधारा भुवरी
भासे हिरवाईने नटली
जणु प्रीतीच्या पावसात
नव वधू सजली धजली
*प्रीत पावसाने* अंकुरली
बीजांकुरे फुटे अलवार
नेसविला हिरवा शालू
लाजून मुरडली हळुवार
वैशाली वर्तक
माझी लेखणी अष्टाक्षरी मंच
उपक्रम
विषय -- आला आला पावसाळा
*वर्षा ऋतू*
कृष्ण मेघांना पाहूनी
वाटे हायसे मनाला
*आला आला पावसाळा*
हर्ष दाटतो बळीला. 1
उडे पाचोळा सर्वत्र
वाहे सोसायट्याचा वारा
मेघ गर्जती अंबरी
सुरु झाल्या वर्षाधारा 2
कधी पडे रिमझिम
पहा झिम्माड पाऊस
नद्या वाहे खळखळ
भिजण्याची संपे हौस 3
कड्यातून वाही झरे
भासे शुभ्र दुग्ध धारा
हास्य लोभस निसर्ग
गीत गाई मंद वारा 4
येता श्रावण बरसे
रिमझिम जलधारा
सरी वर सरी येती
थंड गार झोंबे वारा 5
रुप पहा वसुधेचे
कसे दिसे मनोहर
जणू हिरवे गालिचे
भासे सर्वत्र सुंदर 6
वैशाली वर्तक
अहमदाबाद
: :
उपक्रम
*गोंधळ पावसाचा**
आला आला श्रावण
सरीवर सरी पडतात
चला जाऊया झेलण्या
मस्त भिजू पावसात
पहिल्याच मंगळवारी
पावसाने केला गोंधळ
चिंब केले सारे अंगण
मुलींनी काढला पळ
असा कसा तू पावसा
तुला वाटते तेव्हा येतो
वारा वाहूनी जोरात
छप्पर उडवून नेतो
बरसतो मुसळधार
सारी कडे पाणी पाणी
गाड्या बंद जागोजागी
आणतोस आणिबाणी
सारे नदी ओढे नाले
तुडुंब जलाने भरलेले
रस्त्यावर पाणी वाहे
लोक घरी जाण्या खोळंबले
एकदम तू बरसून
जन जीवन विस्कळित
कसे जावे कामाला
चेहरे सारे प्रश्नांकित
वैशाली वर्तक
अ भा म सा प धुळे जिल्हा
।चित्र काव्य
*बळीची विनवणी*
उन्हाच्या झळांनी
धरा भेगाळली
कधी बरसेल
अती आसुसली
बळी पाही वाट
मेघांना पाहूनी
क्षीण नजरेने
विनंती करूनी
करूनिया कष्ट
मातीला कसीन
नांगरुन माय
घाम मी गाळीन
जल बरसावे
अंकुरे फुटावी
कोंब डोकवेल
आनंदे भरावी
मिळेल तो चारा
येई अंगी बळ
दारी धान्य रास
मिळे कष्ट फळ
पड रे पावसा
मागतो मागणे
नको होऊ ऐसा
ऐक ते सांगणे
वैशाली वर्तक
अहमदाबाद
सरीवर सरी
येता पावसाची
पहिलीच सर
येते जना मनी
आनंदी लहर
आतुर झेलण्या
अतृप्त अवनी
पावसाच्या सरी
झिरपल्या क्षणी
मृग नक्षत्राच्या
बरसल्या सरी
धरा ओली चिंब
झाली पहा खरी
सरीवर सरी
येता धरेवर
मृद्गंध पसरे
सारा क्षणभर
सरीवर सरी
कोसळत राही
बळीराजा मात्र
हर्षमने पाही
सुसाटला वारा
सुटला नाठाळ
झोंबे गार अंगा
भारीच खट्याळ
रिमझिम पाऊस
मास आषाढ सरला
सुरु झाल्या श्रावण धारा
रिमझिम पडे पाऊस
थंड झोबतो अंगा वारा
ऊन आले म्हणताच
सरी वर सरी बरसती
लपंडाव ऊन पावसाचा
पक्षी मजेत विहरती
वाहती खळखळ नद्या
उंच कड्यावरुनी प्रपात
किती मोहक सृष्टी सजली
वारा गाणे गाई जोरात
वृक्ष लता बहरल्या
जल थेंबाची मोहक माळ
तृणपाती हिरवी गार
रोज वाटे प्रसन्न सकाळ
रिमझिम पडे वर्षाधारा
हिरवी राने सारी मोहक
रूपच बदलले सृष्टी चे
रानफुले चित्ता वेधक
वैशाली वर्तक
.विषय - पावसाची सर.
..................................
कृष्ण मेघांचे आभाळ
वारा वाहतो जोरात
उडे पाने चोहीकडे
मेघ गर्जती नभात
मोर नृत्य मनोहर
पक्षी झेलती थेंबांना
धारा पडता अंगणी
हर्ष होई बालकांना
सर पावसाची येता
मृदगंध पसरला
तृप्त जाहली अवनी
मोद भरूनी उरला
लता वृक्ष तरारल्या
दारी पागोळ्या पडती
मुले ओंजळ भरुनी
मोदे पाण्यात खेळती
जो तो जाई भारावूनी
मजा पावसाची वेगळी
मन होई उल्हासित
चव भज्यांची आगळी.
राहे स्मरणी पाऊस
आठवांना येई पूर
घडो जरी गतकाळी
येतो भरुनिया ऊर
वैशाली वर्तक
अहमदाबाद
विषय - **भिजली पाने भिजली राने**
बरसत आल्या वर्षाधारा
तप्त अवनी तृप्त जाहली
ओला सुगंध पसरे आसमंती
वृक्ष वल्लरी रानी फोफावली
वाहताती झरे खळखळ
भासती शुभ्र दुग्धची धारा
लोभस हास्य ते निसर्गाचे"
गीत गात वाहे थंड वारा
वाहता जल कडे कपारीतूनी
झाला धरेचा पहा रंग हिरवा
रानमाळ डोंगर सारे सजले
दिसे मीहक ऋतू तो बरवा
पावसाने केली जादु खरी
उधळून अवघा एकची रंग
भिजली पाने भिजली राने
दशदिशा जणुआनंदात दंग
तृप्त जाहले कणकण मातीचे
हिरवळ पसरली चोहीकडे
लाल पिवळी इवली रान फुले
जणु बुट्टे रेखाटले कुणी गडे
वैशाली वर्तक
अहमदाबाद
आतुरता पावसाची
नको भासे उन्हाळा
नाही सहन होतेय
आता गर्मी नि उन्हाळा
वाट पहाती लोचने
येवो आता पावसाळा
झळा उन्हाच्या साहूनी
धरा पहा भेगाळली
वाट पहाते मृगाची
पाण्यासाठी आसुसली
वाट पाही बळीराजा
काळ्या मेघांना पाहूनी
नजरेत दिसे प्रतिक्षा
वरुणाला विनवूनी
जन सारे कंटाळले
वाट पाही पावसाची
कधी येतील जल धारा
होण्या तृप्तता मनाची
गुरे शोधती निवारा
चारा सारा वाळलेला
ठेवा पक्षांना पाणी
उन्हाने जीव कासावलेला
नको वाटे जाणे बाहेर
अंगाची होई लाही लाही
एकच उद्गार सर्व मुखी
पावसा शिवाय गारवा नाही.
वैशाली वर्तक
अहमदाबाद
भा सा व सां मंच लातूर
आयोजित
उपक्रम
अवेळीचा पाऊस
कसा आला अचानक
अवेळीचा हा पाऊस
झाली वेळ परतीची
आता नाही कोणा हौस
नको तेव्हा बरसतो
जीवाची होते धावपळ
कसे करावे आता
लोकांचे नुरे बळ
पीक डौलते शिवारी
बळी मना आनंद वाटे
पण असा पाऊस येता
खंत मनी त्याच्या दाटे
बस कर आता पावसा
नको दावू अवेळी रूप
झाली वेळ परतीची
वाजव आता इथले सूप
वैशाली वर्तक
अहमदाबाद
साहित्य दर्पण कला मंच नागपूर
आयोजित उपक्रम क्रमांक ६५
विषय..चाहूल पावसाची
कृष्ण मेघांना पाहूनी
वाटे हायसे मनाला
आला आला पावसाळा
हर्ष दाटतो बळीला. 1
उडे पाचोळा सर्वत्र
वाहे सोसायट्याचा वारा
मेघ गर्जती अंबरी
बरसू दे वर्षाधारा 2
आले मेघ दाटुनिया
झाली गर्दी अंबरात
उडे पाचाळो वा-याने
बरतील ते क्षणात
किती पहावी रे वाट
ये रे घना ये रे घना*
व्याकुळली सारी सृष्टी
देना हर्ष तना मना
लागे चाहुल पक्षांना
बघ उडती नभात
पंख पसरी मजेत
घाव घेती घरट्यात
थंड झुळुक वा-याची
करी मना प्रफुल्लित
मोर दावी नृत्य त्याचे
आसमंत आनंदित
ये रे घना ये रे घना
न्हाऊ घाल वसुधेला
तप्त भेगाळली काया
कर शांत तू धरेला
वैशाली वर्तक
अहमदाबाद
साहित्य दर्पण कला मंच आयोजित
उपक्रम क्रमांक ७३
विषय.. रिमझिम पाऊस
*ऋतू मन भावन*
सुरु झाला ऋतु वर्षा
सृष्टीचा रंग हिरवा
जेथे तेथे जल बिंदू
आसमंत भासे बरवा
तप्त किरणे शमली
नभ आक्रमिले मेघांनी
चमकून दामिनी रुप
दावी सोनेरी रेघांनी
रिमझिम जलधारा
आनंद देती मनाला
मयुर करी नर्तन
सुंदर भासे जीवाला
कधी झिंमाड तर रेशमी
कोसळती जलधारा
तयात वाहे खट्याळ
झोंबणारा थंड वारा
तृप्त जाहले कणकण मातीचे
हिरवळ पसरली चोहीकडे
लाल पिवळी इवली रान फुले
जणु बुट्टे रेखाटले कुणी गडे
मृग जलधारांनी नटलीय
पहा नववधु सम धरा
नेसलीय नवा शालू हिरवा
पहा तिचा थाट अन् नखरा
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा