सोमवार, २४ डिसेंबर, २०१८

देवी स्तुती

असशी तू स्त्री शक्ती
अनेक रुपे तू दाविशी
जननी तू सा-या जगाची
तुझ्या कृपेची आस मजशी
         विद्येची तू आहेस दायिनी
           तव करी वीणा शोभती
            मंगल , शांत सोज्वळ मूर्ती
           शारदा नांवे तुजला वदती
तू असशी धन संपदा
विष्णू पत्नी वंदन तुजला
प्रगटली तू समुद्र मंथना
आशिष तव दे मजला
              तूची आमुचे करी पोषण
               करूनी कृपेचे अमृत सिंचन
                 सदा चित्ती राहो तव चरण
                  अन्नपूर्णे तुझेच मनीं चिंतन
अंबा कालिका रेणुका
तूच वसशी विविध रुपात
ममता भरली तव हृदयात
जननी माता ललना स्वरूपात
               तूच दर्शवी तुझीच रूपे
               काळ वेळ पाहून प्रसंगाते
                क्रोध राग माया ममता
                वसती नवरस  तव   ह्दयाते

                                       वैशाली वर्तक

शुक्रवार, २१ डिसेंबर, २०१८

फूले निसर्ग किमया

किती फूले उमलली
सुगंधित चोहीकडे
पहा तयांचे सौंदर्य
वाटे पाहू कोणा कडे
       उमलला हा गुलाब
       दश दिशा झाल्या धुंद
       परिमल पसरला
       वायु संगे मंद मंद
कसा मोहक फूलला
बट मोगरा लाजूनी
कळ्या हळूच डोकावी
पाने पहाती हासूनी
        गर्द झेंडूच्या पाकळ्या
          पीत सोनेरी रंगात
         उजळणी  होई पाठ
          गंध पसरे क्षणात
फूले निसर्ग किमया
निसर्गाची कृपादृष्टी
किती पाहू , किती वर्णू
किती रम्य आहे सृष्टी

वैशाली वर्तक

बुधवार, १९ डिसेंबर, २०१८

चित्र काव्य जीवन बिगारीचे






चित्र   काव्यः--- जीवन बिगारीचे





होता रोज सकाळ , करावया येतो काम
दोघे मिळूनी राबतो ,  मानीतो  हे तीर्थ धाम

"परिश्रम " मानून देव , अतोनात करितो कष्ट
सौख्य येईलच दारी ,   ठेव  देवा सदा पुष्ट

करावया सुखी संसार , साथ तुझी मिळो सदा
सखे धरिला  हात तुझा , सोडू नकोस तो कदा

एका हाताने तान्हुला  दुजा सावरी मातीला
साथ राहूनी धनीच्या  बळ वाढवी  कामाला

तुझ्या  माझ्या  राबण्यास , देव  नक्की देई न्याय
 दृढ श्रध्दा तयावर ,  करी न कोणा अन्याय

दिन नक्की पालटेल , पु-या होतील उणीवा
खोली मालकीची बांधू , मनीं  ठेवल्या  जाणीवा

देवाजीने दिला जन्म , वाया न जावो निरर्थक
काम करूया कसूनी , करू  जीवनाचे सार्थक

मोठा होईल तान्हुला , तोचि आपुला आधार
 तया  करुया  साक्षर , ईच्छा  होईल साकार.

रविवार, ९ डिसेंबर, २०१८

आई/ तव महिमा आई माझा शिक्षक बाल कविता फक्त माझीच

आई (लिनाक्षरी)                     7/12/2018
दोन्ही वर्णे आ व ई असती गुरू
प्रत्येकाची "आई" हीच आद्य गुरू

धरूनीया बोट पहिले पाऊल
सुखी जीवनाची उमजे चाहूल

मिळे स्वर्ग सुख तिच्याच कुशीत
बालपण जाई सर्वांचे खुशीत

जरी असता स्वामी , तिन्ही जगाचा
आई विना असे, तो कष्टी मनाचा

घटाकार देई , घटांना आकार
देई संस्कार बाळांना , ती अपार

होता जीवा कधी दुखापत कदा
येतो शब्द "आई " ओठावरी सदा

आई किती वर्णू , तव गुण गाथा
नमविते तुझ्या , थोरवीला माथा.
            ...........वैशाली वर्तक



उपक्रम- अष्टाक्षरी
विषय ...आई

शीर्षक- **तव महिमा**

उच्चारता शब्द आई
फुटे मायेचा पाझर
भरलेला सदा साठी
प्रेम दयेचा सागर

धरुनीया तीचे बोट
टाकी पहिले पाऊल
सुखी जीवनाची सदा
लागे जीवास चाहुल

होता जीव कष्टी कदा
आई शब्द येई मुखी
स्वामी तिन्हीही जगाचा
आई नसता तो दुखी

जसे घडविण्या घडा
देती मातीला आकार
करी संस्कारी बाळांना
घेउनीया कष्ट फार

किती वर्णू तव गुण
तव मायेची ती गाथा
तुझी थोरवी महान
नमवितो माझा माथा

वैशाली वर्तक








सावली प्रकाशन  समूह 
स्पर्धेसाठी 
अष्टाक्षरी काव्य लेखन
विषय -- माझ्या  आईची महती

उपक्रम- अष्टाक्षरी

**तव महिमा**

उच्चारता शब्द आई           
फुटे मायेचा पाझर
भरलेला  माझ्यासाठी
प्रेम दयेचा सागर

केले उत्तम संस्कार 
जगी टाकण्या पाऊल   
व्हावी  सुखी  पायवाट
याची घेतली  चाहुल

 होई जीव  कष्टी कदा
 येतो शब्द  आई मुखी
  जरी असता संपन्न 
  आई विण मन  दुःखी

जसे घडविण्या घडा
देती मातीला आकार
घडविले तिने मला
घेउनीया कष्ट फार       
  
 आई कशी किती वर्णू ,     
 तव गुणांच्या मी गाथा          
 नमविते प्रेमभावे         
 तुझ्या  थोरवीला माथा

वाटे वर्णावी   सदाची
माझ्या  आईची महती
  कमी पडे माझी मती
 तूची  महान जगती    

.......,..वैशाली वर्तक
अहमदाबाद 7/1/2021






"विषय -- आई माझा शिक्षक *
आई आद्य गुरु* 
 जीवनात जन्मता आई 
प्रत्येकाचा पहिला गुरु 
बोट धरुनी जग दावीते 
गुरु पदाची सुरुवात सुरु 

 धरुनी तिने माझे बोट 
 शिकविले टाकण्या पाऊल
 तिच्या शिकवणीने मला 
मिळाली जीवनी यशाची चाहुल 

 जरी पडता, येता निराशा
 दिली भरारी करण्या कर्तृत्व 
 जीवनी माझ्या महत्त्वाचे 
  आहे  तिच्या योगदानाचे प्रभुत्व 

 दिले आईने धडे संस्काराचे
 महत्त्वाची तिची ठेव 
लावली जीवनी शिस्तता 
मला सदा भासते ती देव

 होता चुका मायबाप 
घेतात पदरात पाडसाला 
कधी रागावून समजावून 
घडवीले आपुल्या बालकाला 

 कितीही मोठे झालो तरी 
आईला वाटे लहान 
अनुभवाचे बोल आईचे 
जीवनी असती महान 


 वैशाली वर्तक अहमदाबाद "



अ भा ठाणे जिल्हा समूह १
 आयोजित 
उपक्रम
बालगीत
     *आई माझी च फक्त*

माझी आई  फक्त माझी 
आवडे मजला ती भारी
एकच आहे जगी अशी
आई माझी  मला प्यारी

येता जाता करते लाड
घेते मजला कुशीत
कुरवाळून प्रेमे उठविते 
तेव्हाच मी येते खुशीत

फिरायला नेते  बागेत मज
घेते नवीन  नवीन खेळणी  
करता हट्ट   रागावते मला
तरी  मज   भासे तीच देखणी

सांगते गोष्टी झोपताना
गाते गोड गोड गाणी
नीजताना हवी तीच
ऐकत रहावी तिची वाणी

वैशाली वर्तक 
अहमदाबाद






आई म्हणते  (  बाल काव्य)
वर्ण 14 यति 7

आई म्हणते तूची, भासे  नभीचा तारा    
तुज वीण भासतो, मज बाकी  पसारा
     म्हणे  मजला सदा ,माझा गोड गोडुला
      सदा मज साठी तो, असे माझा सानुला  
     भरलास तूची या , जीवनी मोद  सारा  
      आई म्हणते  तूची , भासे नभीचा तारा           1
  
घेउनी जाते सदा ,  मैदानात खेळाया
देते मस्त मस्त ची, खाऊ सदा  खावया     
सोनुला माझा आहे , मला सदाची प्यारा
आई म्हणते तूची ,भासे  नभीचा तारा                  2

    सहज पुरविते, ती लाड सोनुल्याचे
    सदाची तिला वेड ,माझे पापे घेण्याचे
     मज होता तो बाऊ , घालतेसे ती वारा
     आई म्हणते तूची, भासे  नभीचा तारा                3


वैशाली वर्तक





सावली

सावली                              7/12/2018
कधी न देते अंतर
साथ देते ती सदैव
ध्यानी , नसे आपणास
तीच साथी एकमेव
            छत्रछाया देती पालक
            अपार माया असे मनात
            तरी न कोणी तीज सम
            सोबती ,अंतकाळी जगात
जशी पडता सावली
अवनीची चंद्रावरी
जन म्हणती तया ग्रहण
खेळ चाले हा घटकाभरी.
        व्यक्ती, वस्तू असो तीच
        तिचे बदले सतत आकार
        कधी मोठी , कधी छोटी
        दिसती तिच्या रुपाचे प्रकार
दोन्ही हाताच्या मदतीने
सावली दावी आकार
धरता हात प्रकाशात
प्रसंग , पण होई साकार
          मेघ खेळती खेळ सूर्याशी
          नभी चाले तयांचा खेळ
          कधी ऊन कधी सावली
          घडे अवनीवर तिचा मेळ.
पडता सावली वृक्षांची
मिळे विसावा पथिकास
घेती सुखानंद सावलीत
किंमत कळे तिची जनास.
                   .....  वैशाली वर्तक

दुष्काळ

                  दुष्काळ              5/12/2018
पडले मृगाचे पाणी
अंकुरले बीज फोफावूनी
मनीं आनंदिला राजा-बळी
रंगविली स्वन्पे मनातूनी
       वा-यावर डौलती चहूकडे
        शिवारे हिरवी आखीव
        पाहता वाढली जोमाने
         सुंदर दिसती रेखीव
पण वरुणराजा कोपला
पाणी नाहीच बरसल
सारे पीक कोमेजल
हाती काहीच न गवसल
       सुकले ओढे, सा-या नद्या
       गुरांना पण न मिळे चारा
       काळी भूभी भेगाळली
        जीवाला कसा मिळेल थारा
बियाणाचे चढे कर्ज माथी
बळीराजा कसा होईल सुखी
कणभर दाणा नसे घरी
तयाचे जीवन झाले दुखी
          रब्बीची कराया पेरणी
          पाणी आता येई डोळा
          कसे होणार आता चिंतेने
          दुष्काळ दिसे सर्त्रव काळा
असे ह्या मेघराजाने
न देता दिन सुकाळाचे
करूनीया कोप मातीवर
दाविले दिन दुष्काळाचे ..
..... वैशाली वर्तक

शनिवार, १ डिसेंबर, २०१८

काव्यांजली गणेश विसर्जन

काव्यांजलीः ..
. गणेशाचे विसर्जन

 पहाता पहाता
 आला दिन विसर्जनचा
 निरोप घेण्याचा
 गणेशाचा.

 विसर्जनाचा दिन
 जीवा लागे हूरहूर
 दाटले काहूर
 मनोमनी

. संपता आरती
 पाणावली जनांची लोचने ,
 गणेशाचे परतणे
 सहवेना.

 गणपती बाप्पा
 निघाले आपुल्या सदनी
 नयनात पाणी
 प्रत्येकाच्या

 मोरयाचा गजरात
 भक्ती भाव एकवटून
 सांगती परतून
 यावेपुन्हा

 मृत्तिकाची मूर्ती
 सहज विसर्जली पाण्यात
 पर्यावरण जपत
 सहजपणे .

 तुझी कृपा
  मजवरी राहो सदा
 मागणे आता
 तुजपायी


       वैशाली वर्तक (अहमदाबाद ) ,







माझी  लेखणी भक्तीसागर मंच
विषय - *क्षण विरहाचे सारे*
        

*विसर्जन*

आला आला म्हणतात 
झाली वेळ परतीची
नको वाटे त्याचे जाणे
 वेळ आली विसर्जनाची

दहा दिवस मोदात
येणे जाणे स्व जनांचे
किती गप्पागोष्टी खेळ
दिन होते आनंदाचे

सजावट वाटे फिकी
धूप दीप मंदावले
  घर झाले सुने सुने
बाप्पा गृही परतले


 बाप्पा बाप्पा म्हणताना
डोळे पाणावले क्षणी
जड मनाने निघालो
विरहाचे दुःख  मनी

वैशाली वर्तक 
अहमदाबाद





बुधवार, २८ नोव्हेंबर, २०१८

वचन


- वचन
देतो वचन जवान मनस्वी
देश रक्षणा राहीन तत्पर
येवोत कितीही संकटे मजवरी
वचनबध्द सैनिक आहे सत्वर

           सप्तपदी विधी लग्नातला
           असे सात वचनांचे पालन
           अनुसरता त्या पावलांना
          होते सुखी जीवनाचे कारण

कैकयीने मागता वर
दशरथ पडला विचारात
धाडावे लागले वनीं रामास
दिलेले वचन पाळण्यात

           घेतात देवाला स्मरुनी
           डाॕक्टर , वचन स्व-पेशाची
           सुश्रृषा करिती लोकांची
           निस्वार्थ बुद्धीने ऋग्णाची
.
नागरिक सारे आपण बांधव
केवळ न करिता प्रतिज्ञा वाचन
वचन घेऊन  प्रत्येकाने
वर्तले , तरच होते वचनांचे पालन ...

       .... ........ वैशाली वर्तक

दिवाळी (अष्टाक्षरी)


विषय ः-दिवाळी

         दिपावली असे सण   
         माझ्या  सदा आवडीचा
         आनंदाची उधळण
         दावी  रूप  संस्कृतीचा 
                    आला सण दिवाळीचा 
                     स्नेह ज्योती उजळिल्या
                      सजलीत घरदारे
                     दीपमाळा सजविल्या
आनंदाच्या प्रकाशात
होई दिवाळी साजरी
मुले बाळे नटलेली
गोड दिसती गोजरी
             लाडू ,चिवडा, चकली
             अनारसे जाळीदार
              झाल्या दंग गृहिणी
              बनविण्या चवदार
सुवासिक उटण्याचा
गंध सारा फैलावत
स्नाने अभ्यंग चालती
फटाक्याच्या आवाजात
           लक्ष्मी पूजन सोहळा
          दारी सजल्या रांगोळ्या
          लाह्या बत्तासे प्रसाद
          शोभिवंत भुईनळ्या
प्रतिपदा दिन असे
साडेतीन मुहुर्ताचा
शेवटचा भाऊबीज
बंधु प्रेमाच्या नात्याचा
                अशी असे दिपावली
                सर्व सणांची ही राणी
               " शुभ दिवाळी "सर्वांना
                  हीच प्रभो  विनवणी.
                                                   

सोमवार, २६ नोव्हेंबर, २०१८

बालपण

                                              बालपण
बालपण काल नातीच्या शाळेत कॉन्सर्ट होता .त्यामुळे त्या कॉन्सर्ट प्रोग्रामा ला गेले होते. लहान मुले छानच परफॉरम करत होती. मुलांपेक्षा त्यांचे पालकच फार उत्साहात होते ..मुले पालकांकडे पहात परफॉर्म करत होती तर मधेच इकडे तिकडे पहात हाताने एॕकशन आणि नजर कुठे तरी भिर भिरती होती . कोरिओग्राफर बिचारी मनापासून मुलांच्या कडे तोंड करून, त्यांना कसे करावयाचे ते दाखवीत होती . फार मजा वाटत होती तो सर्व प्रकार पाहून. छाया चित्रणे घेण्यात पालक दंग होते . केवढे ते फोटो , किती वेळा ,..so sweet ,.. so cute वगैरे शब्द कानावर येत होते . मी त्या निरागस बालकांकडे पाहता पाहता मला माझी बालपणातील मुले दिसू लागली . योगायोग असा की ज्या बालमंदिरात मी जात होते त्याच बालमंदिरात माझी मुले पण शिकली होती . त्यामुळे विचारांच्या तंद्रीत मी गुंतत गेले . दोरीचे रीळ उलगडावे तसे काळाचे रीळ उलगडत गेले . मी मुलांच्या काळातून ,आपल्या स्वतःच्या काळात मी मला विचारांच्या तंद्रीत पाहू लागले. त्यावेळचा, त्या काळातला वार्षिक उत्सव अंधुकसा आठवणीत आला. हो ! बरे आठविले. बालमंदिरावरून .... .त्या बालमंदिरात जाताना, मी जेवढा त्रास दिला होता ना त्या काळात आई बाबांना ! तेवढा माझ्या मुलांनी पण ,मला ...त्रास दिला नव्हता . मी एकतर फार आजी वेडी होते . आणि आजी पण नेमकी जून महिन्यात तिच्या भावाकडे गेल्याने सुरुवातीस मी बालमंदिरात जाण्यास फार कटकट केली होती. अजूनही मला ती स्मरते , आठवते ... आणि आई पण सर्विसला शाळेत जावयाची ..तर मी बस स्टॅन्ड पर्यंत तिच्या मागे पळत जायची . मला पकडून पकडून आणावयाचे . पण आजी आली व मग माझी गाडी रुळावर आली . नाहीतर नुसता खाऊचा डबा खाऊन घरी जायचे म्हणायची . पुढे शाळेतील तिसरी वा चौथीतील गोष्ट असावी . माझी शाळा घराच्या अगदी जवळ होती. जसे बालमंदिर जवळ होते . त्यामुळे सोडायला व घ्यायला येणे भानगड नव्हती . शाळा प्रायमरी म्युनिसिपाल्टीची व हायस्कूल फक्त महाराष्ट्र शिक्षण मंडळ चे . सर्व मराठी लोकांसाठी एकमेव एकच होते .. प्रायमरी शाळा मावळंकरांच्या जुन्या वाड्यात भरायची . एक ते सातवी पर्यंतचे वर्ग चालायचे . मुनिसिपाल्टीच्या प्रायमरी शाळा बऱ्याच आहेत . बऱ्याच एरिया प्रमाणे , आमच्या शाळे च्या बाजूला छोटी दुकाने जेथे गोळ्या , पेपरमिंट , बोरे , विलायती चिंचा घेऊन बाई बसायची . मुली तिच्या कडून विकत घ्यायच्या . माझ्या बाल मनास पण विकत घेण्याचे मन झाले . आई बाबा आमच्या घरी पैसे कधीच कडी कुलूपात ठेवत नव्हते . स्वयंपाक खोलीत एक भिंतींतले कपाट होते .त्यात एका पातेल्यात पैसे ठेवले असायचे . एकतर आजी घरात असायची व घरात दुसरे कोणी येणारे जाणारे नसायचेच. . तेव्हा मी सहज त्या पातेलीतून आजीला न सांगता २ पैसे तर कधी ३ पैसे घेत गेले. व कधी गोळी तर कधी काही विकत घेतले . एक दोनदा तर आजीला पण आणून दिले . तिने विचारले ,"अग तुझ्या जवळ कुठून आली गोळी तर चक्क मैत्रिणींनी दिली असे खोटे सांगितले. असे ३/४ वेळा केले असावे .. तरी आजी म्हणायची अग शाळा सुरु होताच तुझ्या मैत्रिणी बरे विकत घेतात, तर मी चक्क म्हणाली , " हो ना . ,कारण त्या लांबून येतात ना .... ".. . पण एकदा वर्गात ,मराठी विषयात गुरुजी म्हणी शिकवत होते . त्यात एक म्हण शिकवण्यात आली ".झाकली मूठ सव्वालाखाची " गुरुजींनी त्यावेळी काय अर्थ शिकविला तितका लक्षात नाही . पण, माझ्या मनाने मला समजविला शिकविलेला ,अथवा मनाने घेतलेला अर्थ असा की जो पर्यंत चोरी उघडकीस येत नाही तोवर ठीक आहे . आपण पैसे न विचारता घेतले आता अशी चूक करता कामा नाही . आणि त्या दिवसा नंतर मी कधीच न सांगता पैसे घेतले नाहीत. खरच शिकवण , शिक्षण कसे माणसास घडवते हे त्या म्हणींचे ज्वलंत उदाहरण आहे. पुढे प्रायमरीत असतांना ची गोष्ट . दूरच्या मैत्रीणी शाळा सुरु होण्या अगोदर त्यांच्या बस च्या सवलतीने availability प्रमाणे यावयाच्या . माझे तर घर शाळे जवळ , त्यामुळे अगदी शाळा सुरु होण्याच्या वेळेवर मी जावयाची. दूरच्या मुली शाळेच्या आवारात ,वाड्याच्या बाहेर बसल्या असायच्या . त्यातील एका मैत्रिणीचे वडील शाळेच्या जवळ असलेल्या बँकेत सर्विस ला होते , ती नेहमी रिसेस मध्ये पाणी पिण्यास त्यांच्या बँकेत जावयाची. व ती कशी जाते ,तेव्हा दारांत शिपाई ( त्या काळात माहीत नव्हते त्याला सिक्युरीटी गार्ड म्हणतात ) कसा उभा असतो , बँकेत कसा थंडावा असतो ,मी बाबांकडे गेल्यावर कसे चपराशी पाणी आणून देतो. वगैरे खूप खूप वर्णन करून सांगायची . व मला विचारायची यावयाचे आहे का बँकेत पाणी पिण्यास.? पण त्या पाणी पिण्याच्या मोबदल्यात तुला माझा गृहकाम बाकी असेल तर करून द्यावा लागेल. मी किती तरी वेळा त्या बँकेत पाणी पिण्याच्या लालसेने तिचा गृहकाम करून दिला होता . तेव्हा कोठे माहित होते. पुढे ३१ वर्ष त्याच बँकेत पाणी पिणार होते पण तो केलेला गृहकाम मात्र छानच फळला म्हणायचा . असे बालपण कधी अभ्यासासाठी बोलणी खाण्यात ... .कारण swimming ने अभ्यास कमी व्हायचा तर आई बाबांवर चिडून बोलायची . काय पोहण्यात पारितोषिके मिळविते तर तिला डोक्यावर चढवली आहे . अभ्यासाकडे ती लक्ष देत नाही.... आणि असेही मुली बाबांच्या लाडक्या असतातच. ना ! माझ्या बाबतीत तेच व्हायचे. असे "बालपण " आंबट गोड आठवणीत कधी सरले कळलेच नाही . उगाचच का म्हणतात, "बालपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा". ....... ..... वैशाली वर्तक (अहमदाबाद)

दिवाळी कालची व आजची

दिवाळी कालची व आजची

दिवाळी तीच आहे अजुनी
येते जी कार्तिक मासात
पण बदलय रूप तियेचे
सध्याच्या गतिशील जीवनात

लागता दिपावलीची चाहूल
घरदारे निघती उजळून
आता मात्र ,घर असते सदाच
जणू , हाॕटेल सम सजवून.

विचार येता दिवाळीचा
फराळ बनवण्याची गडबड
आजच्या दिवाळीत मात्र
आऊटींगला जाण्याचे आयोजन

पूर्वी दिवाळीतच होई खरेदी
आता आॕन लाईन सदाच चाले
असता घरात रास वस्तू कपड्यांची
दिवाळीला खरेदीचे महत्व नुरले

आधी फटाके असायचे कमी
व्हायची भावंडात तयांची वाटणी
आता फटाके असती भरपूर
तर फटाक्याला बंदी , अन् वेळच कमी.
.............वैशाली वर्तक.

गणेश स्तुती

गणेश स्तुती  
                                8/9/2018
गजानना गणराया
तुला प्रथम मोरया
मान तुझाच सर्वदा
आधी तुलाच वंदुया
            शुभंकर तू सर्वांचा
            बाप्पा वाटे आपुला
            तूचीअसे सुखकर्ता
            किती नांवे रे तुजला
तूच असे दुःखहर्ता
ठेव कृपा दृष्टी सदा
हीच विनंती तुजला
नको करु कष्टी कदा
             सर्व व्यापी असे तूची
             तूची असे लंबोदर
              महाकाय बुध्दीमान
              जन वदती ओंकार
चौदा विद्या अवगत
तव महिमा अपार
अधिपती स्वामी तूच
कुणी म्हणती मंदार
                 अल्प मती आम्ही जन
                 काय वर्णू तव गुण
                 श्रध्दा ठेवूनी मनांत
                 आले तुजला शरण.
                             वैशाली वर्तक ......8/9/2018

कधी कधी वाटे !

कधी कधी
कधी कधी वाटे l फुकाचा पसारा l
जन्म मरणाच्या l येरझारा ll 1
नको पुनरपि l जनन मरण l
व्हावे तत्व जल l कधीकधी ll 2
नदी देते जल l धावत वाहत l
जीवन देण्यास l प्राणीमात्रा ll 3
करिते संपन्न l धरेला समृद्ध l
पूजती म्हणून l मातेसम. ll 4
कधी वाहे संथ l कधी खळाळत l
मार्ग आक्रमित l अविरत ll 5
श्रम मोबदला l देई कृषीवला l
अर्पीते जीवना l सागराला ll 6
रवी किरणांनी l मेघांच्या रूपानी l
प्रवेशिते नभी l बरसण्या ll 7
कधी कधी वाटे lअसावा फुगारा l
सदा येरझारा l सर्वकाळ ll 8
........... वैशाली वर्तक

शुक्रवार, ९ नोव्हेंबर, २०१८

घर जुनी / नवी अष्टाक्षरी


घर
  सांजवेळ येता जवळी
आठव होते स्वगृहाची
  जिथे मानव   मिळवी
   मनःशांती  सदा तयाची      
          दिसण्या असती भिंती खंबीर
          जिव्हाळा ओलाव्याच्या चार
          प्रवेश व्दारी  बहरली बोगन
          वसे "अतिथीदेवो" भाव  .
  ओढ लावी घराची जीवा
  देऊन घराला घरपण सदा
  वाट पाही गृहलक्ष्मी  दारी   
  घरात नांदे सदैव, प्रसन्नता.
         पाऊले घराकडे चालती
        अंगणी  बागडती पाखरे
        बळ पंखात भरुनी उद्या "ती"
        भरारी घेतील यशाकडे.
  कितीही  असो आरामदायी
  पंचतारिक निवास गृहे
  फिरुनी येता  स्व  गृही
  स्वर्गीय आनंद घरीच मिळे
        सायंकाळी तेवते  देव्हा-यात
       भाव भक्तीची सांज वात
       पहाट समयी सदा गुंजते
      ज्ञानेश्वरीची सुरेल साथ
  काडी काडी गोळा करुनी
  बांधती पक्षी घरटी जशी
  प्रेमाने, स्नेहाने घट्ट विणली
  नाती घरांत परस्परांशी
              ........वैशाली वर्तक.





स्पर्धेसाठी
घर (अष्टाक्षरी)    24/10/2019
 
सांजवेळ येता क्षणी
सय येते स्वगृहाची
जिथे मानव मिळवी
मनःशांती ती जीवाची
           भिंती असती खंबीर
           जिव्हाळ्याच्या घेती ठाव
           द्वारी बोगन फूलली
            सदा वसे प्रेम भाव
ओढ लावूनी जीवास
गृहलक्ष्मी पाही वाट
देई घरा घरपण
वाढवून त्याचा थाट
             दिसे लोभस पाखरे
             खेळतांना अंगणात
             उद्या  घेतील भरारी
              स्वबळाने जीवनात
असो ती आरामदायी
तारांकित असे जरी  
परतूनी येता गृही
स्वर्ग सुख मिळे घरी
               सायंकाळी देवा-ह्यात
               भक्ती पूर्ण  सांजवात
                प्रातंकाळी ऐकू येते
                ज्ञानेश्वरी ती घरात
काडी काडी मिळवूनी
पक्षी घरटी बांधती
नाती विणीली प्रेमाने
सारे प्रेमाने नांदती.

वैशाली वर्तक   24/10/2019  
अहमदाबाद 





शुक्रवार, १२ ऑक्टोबर, २०१८

माझी आवड लिनाक्षरी

लिनाक्षरी   काव्य स्पर्धा
    विषय ..  माझी  आवड

    लिहीण्याची असे आवड मजला,
    पण कशी करु मी , साध्य  तिजला.

    आधी शोधली लेखणी लिहीण्यास ,
     गेला किती  वेळ, तिला शोधण्यास .

    प्रश्न  पडला आता तो विषयाचा
    कशावरी लिखाण , करू तयाचा.

    विचारांती  ठरले लिहू चारोळी,
    मग  विचारात घेऊया  आठोळी.

    "मांदियाळी  साहित्य " आला धावूनी,
     लिहीण्यास   छान  , विषय  देवूनी.

     साकारली 'लिनाक्षरी'ने  आवड,
     जुळवित गेले शब्दांची सांगड.

       वैशाली वर्तक  (अहमदाबाद)

बुधवार, २६ सप्टेंबर, २०१८

उदार.....सुधाकरी

           सुधाकरी
   
 
                   उदार
       सृष्टी  पहा कशी   l  सतत उदार   ll
       सहुनीया भार       l   उदात्तेने       ll

        लता  वेली  वृक्ष   l   सदा बहरुन. l
         करिती संपन्न      l   जगतास      ll       

         अर्पूनिया दान    l  प्रकाशती सारे l
          चंद्र सूर्य तारे     l   गगनात       ll       

         माय बाप  सदा  l  करिती वर्षाव l
         जाणिजे स्वभाव  l  लेकरांचा      ll       

          देवाने दिधले      l आपणास रास l.
           द्यावे  दुस-यास  l हाची धर्म        ll           
   
              असावे उदार l  सदा सर्वजण  l
            हीच शिकवण  l निसर्गाची       ll             

             उदार म्हणोनी  l   जगती महान  l
             दानवीर कर्ण l दानशूर.         ll             
   
              वैशाली वर्तक
              

कष्टाचे चीज

कष्टाचे चीज      खरच त्यावेळी कापड गिरण्या जोरात चालायच्या.व नोक-या पण  मिळत होत्या.. जे कष्ट करण्यास तयार होते.त्यांना कष्ट करुन खरच शुन्या...