शुक्रवार, २१ जुलै, २०२३

पावसाच्या कविता बरसला घननिळा! हिरवळ दाटे चोहीकडे !लपंडाव हाहाकार खेळपावसाचा त पाव. साचा


 अ भा म सा परिषद शब्दभाव

आयोजित

काव्यलेखन

विषय..बरसला घननिळा

शीर्षक...ऋतू हिरवा*


झाली मृगाची बरसात

तप्त  अवनी तृप्त जाहली

दरवळला मृद्गंध आसमंती

वृक्ष  लता फोफावली


गरजत बरसत या मेघांनो

नको नुसती गर्दी गगनात

गडगड करित बरसा रे

पेरणीची झाली वेळ शिवारात


वाहतील झरे खळखळ

भासतील शुभ्र दुग्ध धारा

हास्य लोभस ते निसर्गाचे

गीत गाईल थंड मंद वारा


 बळीराजा खुश होईल

 काम करेल  शिवारी

 स्वप्न रंगवेल मनी

 गोड लागेल भाकरी


वाहता जल कडे कपारीतून

होईल रंग धरेचा हिरवा

रानमाळ डोंगर सजतील

करु साजरा ऋतू बरवा

झाकोळते आकाश मेघांनी
 भासे  भर दिवसा  सांज
जल बरसूनी जाता पुन्हा 
दर्शन देतात रवी राज

बरसला घन निळा 

 वाटे समाधान मना

दूर केली मरगळ सृष्टीची

सृजनता दिसे क्षणा


वैशाली वर्तक 

अहमदाबाद


हिरवळ चोहीकडे 

===============

रुक्ष धरा येता वर्षा

पहा कशी बहरली

ओली चिंब झाली धरा

तृणांकुरे अंकुरित


रूप पहा वसुधेचे

किती भासे मनोहर

जणु हिरवे गालिचे

भासे सर्वत्र सुंदर


चिंब भिजली अवनी

हिरवळ चहुकडे

मोह न आवरे मनी

वाटे पाहू कुणीकडे


 रानमाळ हिरवट

वृक्ष वेली बहरल्या

रंग एकच धरेच्या

भासे पाचू पसरला


झरे वाही खळखळ

भासे शुभ्र दुग्ध धारा

हास्य लोभस निसर्ग

गीत गाई थंड वारा


वाटे पहात रहावे

किती पाहू कुठवर

दृश्य पहाण्या मोहक

जन उभी  क्षणभर




लपंडाव खेळत पावसाचा




येता श्रावण महिना
हिरवळ दिसे चोहीकडे
क्षणात चमके  ऊन
दुस-या क्षणी सर पडे

हिरवी झाडे हिरव्या वेली
हरित रंगच दिसे सर्वत्र 
पांधरुन शाल हिरवी
अवघ्या धरेचा रंग एकमात्र

आभाळात ढगांचा गडगडाट
दामिनी चमके काळ्या ढगात
सर पडूनी जाता पुन्हा 
सूर्य   ढगातून डोकवे नभात

लंपडाव ऊन पावसाचा
पडे सरीवर सरी तालात
धरेला चिंब भिजवूनी
उन्ह कोवळे पडे क्षणात

झाकोळते आकाश मेघांनी
 भासे  भर दिवसा  सांज
जल बरसूनी जाता पुन्हा 
दर्शन देतात रवी राज

लपंडावाच्या या खेळातून
मधेच दिसे इंद्रधनु शानदार      
लोभस रुप  पहा निसर्गाचे       
श्रावण मास असे बहारदार       


वैशाली वर्तक.
अहमदाबाद 

कल्याण डोंबिवली महानगर 1
आयोजित उपक्रम
विषय ..येरे येरे पावसा
शीर्षक.. आर्त विनवणी 

येणार तू नक्की 
केली बी पेरणी
 बरस ना आता
 किती विनवणी           1

कष्ट करुनिया
घाम तो गाळून
केली मेहनत 
शिवारी कसून             2

ऐनवेळी आता
का रे तू रूसला
कुठे गेले मेघ   
 लपून   बसला           3


मृगाच्या पाण्याने
जीवा लागे आस
फुटतील बीजे
धरिला तो ध्यास         4

बरस रे मेघा
नको पाहू अंत
बळीची वाढवू
नकोस तू खंत             5

नेहमीच तुझे
दाखवितो खेळ
वेळेत न येणे
जमव तू मेळ                6

वैशाली वर्तक
अहमदाबाद






ओला दुष्काळ 

हाहाःकार पावसाचा
***************
असूनही आवडता
जलचर ह्या सृष्टी चा
किती रे तू माजविला
हाहाःकार पावसाचा

असा कसा तू पर्जन्या
गरजेला  नसतोस
आली आता दिपावली
परतणे टाळतोस

सहवेना तुझा त्रास 
किती अंत पहायाचा
कसे म्हणू तुला त्राता
हाहाःकार पावसाचा

बस कर तुझा खेळ
परतीची झाली वेळ
तुझ्या  अशा वागण्याने
कधी होई सुखी मेळ

उभे पीक शिवारात
आहे पहा डौलदार 
नको आता बरसणे
ओल्या दुष्काळाचा भार

गेला संसार वाहूनी
मेहनत गेली वाया     
मूर्ती पण न राहिली
कसे पडू देवा पाया

ऐक विनवणी आता
हेच एकची मागणे
संयमाने वाग जरा
करा सुखाचे जगणे

वैशाली वर्तक 
अहमदाबाद


ओला दुष्काळ 

हाहाःकार पावसाचा

असूनही आवडता
जलचर ह्या सृष्टी चा
किती रे तू माजविला
हाहाःकार पावसाचा

असा कसा तू पर्जन्या
गरजेला  नसतोस
आली आता दिपावली
परतणे टाळतोस

सहवेना तुझा त्रास 
किती अंत पहायाचा
कसे म्हणू तुला त्राता
हाहाःकार पावसाचा

बस कर तुझा खेळ
परतीची झाली वेळ
तुझ्या  अशा वागण्याने
कधी होई सुखी मेळ

उभे पीक शिवारात
आहे पहा डौलदार 
नको आता बरसणे
ओल्या दुष्काळाचा भार

गेला संसार वाहूनी
मेहनत गेली वाया     
मूर्ती पण न राहिली
कसे पडू देवा पाया

ऐक विनवणी आता
हेच एकची मागणे
संयमाने वाग जरा
करा सुखाचे जगणे

वैशाली वर्तक 
अहमदाबाद




मोहरली लेखणी साहित्य समूह आयोजित उपक्रम क्रमांक १०२०
हायकू काव्य प्रकार 
विषय.  श्रावण सरी 

रेशीम धारा 
पडती रिमझिम
 झोंबतो वारा

खळाळणारे
 कड्यावरुनी प्रपात
 वारा जोरात

 सरी पडता 
भिजण्याची ती हौस
  भावे   पाऊस

मधेच ऊन
सूर्य मेघांचा खेळ 
मजेचा वेळ 

धरा सजली
नटूनिया बैसली 
  तृप्त जाहली 

शालू हिरवा
नेसलेली वसुधा 
दिसे बरवा

श्रावण सरी
गाऊ पाऊस गाणी.                                                                      
सर्वत्र पाणी 


वैशाली वर्तक 
अहमदाबाद






विषय - पर्जन्यवृष्टी

     सजली सृष्टी 

होता आगमन पर्जन्याचे
 तप्त धरणी न्हाली जलाने
भरले सारे खाच खळगे
पांघरिला हिरवा शालु  वसुधाने

तृप्त  झाले कण-कण मातीचे
हिरवळ पसरली चोहीकडे
एकच रंग झाला धरेचा
वाटे कितीदा पाहू  रूप गडे

लता वृक्ष वेली बहरल्या
सजली धरा नव वधू परि
पानोपानी दव बिंदु चमकून
आभुषणांचा भास  करि

उजाड रानमाळ झाले हिरवे
मयूर मनोहर नृत्य करी
आनंदे डोलती तरु लता
लाजूनी  वसुंधरा पाही तरी

डोंगर कपारी तून वाही
शुभ्रजल धारा ओढ्यांच्या
भासती जणू   ल्याला भर-जरी
 हिरव्या गार  शालू  काठाच्या 


वैशाली वर्तक
अहमदाबाद




DBAसाहित्यिक नाशिक 
क्रमांक 229
विषय ..   डोंगर द-याखो-या फुलले निसर्ग सौंदर्य 



बरसत आल्या वर्षाधारा
तप्त अवनी तृप्त जाहली
ओला सुगंध पसरे आसमंती
 वृक्ष वल्लरी   रानी फोफावली



वाहताती झरे खळखळ
भासती शुभ्र दुग्धची  धारा
 लोभस हास्य ते निसर्गाचे" 
गीत गात वाहे थंड वारा



वाहता जल कडे कपारीतूनी
झाला धरेचा  पहा रंग हिरवा
रानमाळ डोंगर सारे सजले
दिसे मीहक ऋतू  तो बरवा



पावसाने केली जादु खरी
उधळून अवघा एकची रंग
भिजली पाने भिजली राने
दशदिशा जणुआनंदात  दंग



तृप्त जाहले कणकण मातीचे
हिरवळ पसरली चोहीकडे
लाल पिवळी इवली रान फुले
जणु बुट्टे रेखाटले कुणी गडे    



वैशाली वर्तक 
अहमदाबाद

अष्टपैलू कला आकादमी मुंबई
विषय - खट्याळ पावसा

शीर्षक -  *खट्याळा कधी रे कळेल तुला*
अष्टाक्षरी रचना

 तुजवरी च पावसा
आधारित सारी सृष्टी
तरी का तू न ठेविशी
तीजवरी कृपादृष्टी            1

सुधा भ्रमण करिते
नित्य नेहमी नेमाने
म्हणूनच येती जगी
ऋतू चक्र हे क्रमाने

पण पावसा तूझाच
दिसे तो चुकारपणा
राही अडूनी वेळेला
दावी सदाची मी पणा

 येता कधी न वेळेत
करी कधी तो उशीर
पाण्या विना भुकेलेली
पहा दिसती शिवार


विना पाणी जीव सृष्टी
कशी  सांग बहरेल
प्राणी मात्र  तुजविण
कसे काय वाचतील

कधी येशी अवचित
कष्टी होई बळी मनी
जाते वाहूनी हातचे
दुःखी होई क्षणोक्षणी

अती वृष्टी करुनीया
नेतो वाहूनी शिवार
बळी होतसे हताश
सर्व परीने बेजार

उभे पीक मोत्यासम
पाहुनिया सुख वाटे
नको तेव्हा बरसणे
मनातूनी दुःख दाटे.

वैशाली वर्तक 
अहमदाबाद (गुजरात)
मो नं 8141427430


सिद्ध साहित्यिक समूह 
आयोजित उपक्रम क्रमांक 567
29/8/24
विषय... पाऊसधारा
आठोळी रचना

  *बळीची मनीच्या*

गर्जत बरसत या मेघांनो
नको नुसती गर्दी *गगनात*
गडगड करित बरसा रे
पेरणीची झाली वेळ *शिवारात*
 वर्षा धारा झरझर बरसता 
खूष होईल बळी *मनामनात*
 काळी माय पहा अंकुरेल 
सुगीचे दिन पाहील तो *स्वप्नात*

वैशाली वर्तक 
अहमदाबाद
कोकण म सा की  गडचिरोली जिल्हा 

विषय.  आले आभाळ भरून 
*धुवादार पाऊस* 


सुरु झाला ऋतु वर्षा
नभ  दाटले मेघांनी  
दाहकता कमी भासे
आदित्याची नभांगणी


*आले आभाळ भरून* 
गर्जताती कृष्ण मेघ
झाली घाई बरसण्या
मधे चमके वीज रेघ


ढोल ताशांच्या गर्जना
 बरसणे  धुवादार
भासे फाटले आभाळ
मेघ   गातात मल्हार 

घन आले ओथंबूनी 
  लपंडाव चाले खेळ
सरसर सरी येती
जमे पावसाचा मेळ

कड्यातून वाहे  झरे
जणू शुभ्र दुग्ध धारा
खाच खळगे भरले
शीळ घाली मंद वारा

जणु सरी मोतीयांच्या
 भासताती जल धारा
वाहे ओहोळ सर्वत्र 
ओली चिंब झाली धरा

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...