सोमवार, ३० ऑक्टोबर, २०१७

नातवाकडून अप्रतिम भेट. माझा वाढदिवस

नातवाकडून अप्रतिम भेट
            सकाळी उठले तर गेल्या वर्षीच्याच  या दिवसाची आठवण झाली. सकाळ पासूनच मी पूर्णतः  गेल्या वर्षात कसे रमले  गेले कळलेच नाही.गेल्या वर्षी   याच दिवशी मी मैत्रिणीं सह  कल्ला करत, केकचे घास सर्वांनी  मला व मी सर्वांना भरवतांना हसत खेळत केलेली मजा मस्ती व   घेतलेले सहभोजन व त्यात दुपारचे 2/3 तास कसे  मस्त गप्पात रंगले त्याची आठवण येऊन मन उल्हासित झाले. सकाळी सकाळीच मुलीने मला माहित नसता , हो ! सध्याचे सरप्राईज देण्याचे फॕड फारच वाढल आहे ना . तर सकाळीच  फेशियल व  मसाज साठी पार्लर ची बाई दारात येउन उभी होती .व माझ्या सौंदर्यात भर करण्यास मुलीने तिची appointment घेतल्याने ती पण माझ्या तैनातीला हजर होती. स्वयंपाक घरात रवा शेकण्याचा खमंग वास दरवळला होता .सूनेने केशर घालून शिरा केला होता व न्याहरीला  मस्त माझा  आवडता ईडली चटणी चा बेत तिने ठेवला होता. नातवंडांनी पण त्यांना गीफ्ट मधे मिळालेली विविध चाॕकलेटस् सकाळी सकाळी देउन सकाळ अजूनच गोड केली होती. वाह s वाह  किती सुखाचा  आनंदाचा माझ्या वर वर्षाव केला होता सर्वांनी . व यांनी आणलेली त्यांच्या आवडीच्या साडीची मी घडी मोडणार होते. सर्व सर्व काही क्षणात डोळ्यासमोर उभे झाले.
             आणि सरळ सरळ मी मागील  वर्षात मनाने रमले. मग हळूहळू
नव्हेंबर महिना पुढे आला व दिवाळी चे आनंदी दिवस आठविले .दिवाळी म्हणजे उत्साहाचे आनंदाचे पर्व. दिवाळी च्या दिवसात नातवंडांकडून काढून घेतलेल्या रांगोळ्या, रांगोळी काढताना त्यांची सोडविलेली  भांडणे , त्यांच्या बरोबर मातीत खेळत केलेला किल्ला, किल्ल्याची सजावट , शोभेची दारु फोडण्याचा कार्यक्रम ,सर्व दिवाळी डोळ्यासमोरून चित्रपटा सारखी सरकली. मग डीसेंबर महिना म्हणजे परदेशातील मुले भारतात येण्याचा .म्हणजे पुन्हा  दिवाळी .सध्या काय मुले बाहेरून आली की दिवाळी .तर डिसेंबर पण कसा चारी नातवंडात केव्हा आला व सरला कळलेच नाही. पुढे  फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी इथल्या नातवांची केंद्रीय शाळा , त्यामुळे परीक्षा लवकर आटपल्या  .मग काय इथल्या  दोन नातवंडांना घेऊन सिंगापूरला गेलो. पुन्हा चारी नातवंडांना एकत्र .पण तेथे  मात्र त्या नातवंडाच्या सहामही परीक्षा  .त्यामुळे त्यांचे अभ्यास करून घेऊन , मुलाला व सूनेला मदतरुप होण्यात  , संध्याकाळी नातवांडाना play ground वर घेऊन जाणे,घरात आजी आजोबा असण्याने मुलाला व सूनेला दोघांना एकटे पणाने फिरावयास मोकळीक देण्यात दिवस कसे मस्त  गेले व चारी नातवंडे आजीकडून पोहणे शिकली .आम्ही दोघांनी पण तेथील महाराष्ट्र मंडळात जाऊन मस्त मजेचे दिवस व्यतीत करत मानसिक आनंद मिळवित होतो. तसेच आपला मुलगा व सून यांची संगीतातील प्रगती तसेच त्यांच्या  गाण्याच्या  कार्यक्रमात आवर्जून उपस्थिती देत दिवस किती मजेत गेले याची आठवण झाली.
     मुलगा व सून दोघेही नव नवीन ठिकाणी फिरावयास नेण्यात मागे पडत नव्हते. दोघे जणही पुतण्यांना "जीवाचे सिंगापूर "करविण्यात जरा पण कसूर पडू देत नव्हते . व त्यांचे मे वेकेशन अविस्मरणीय केले होते. मग परत येता , जून महिना , तेव्हा पुन्हा शालेय जीवनाचा श्रीगणेशा सुरू झाला. मग आॕगस्ट
सप्टेंबर पावसाळा, यावर्षी पावसाने छान कृपा केली .पावसाळा ऋतू  छानच जाणविला. आणि आता पुन्हा  आला आॕक्टोबर.माझा वाढदिवसाचा महिना . हे सर्व चित्र एक वर्ष  मागे जाण्याचे, म्हणण्या पेक्षा  गत वर्षात मला पुन्हा जगण्याचे श्रेय  मिळाले .आणि ते कसे ? तर आज माझ्या  नातवाने मला सकाळी उठता सरप्राईज ,मला न सांगता वाढदिवसाचे कार्ड रात्री  त्याच्या आईलाच काय पण कोणाला कळणार नाही असे गुपचुप बनविले, व सकाळी माझ्या   हातात दिले .व त्यावर 67 वा वाढदिवस लिहून, मला एक वर्षाने लहान केले .आपण बरेचदा म्हणत असतो की पुन्हा  आपण लहान व्हावे. गेलेले दिवस परत यावेत. पण ते शक्य नसते,  तर आज नातवाने मला एक वर्ष  लहान करून ,पूर्ण  पणे गत वर्षातील सर्व  गोड आठवणीत पुन्हा  जगण्याचे भाग्य देऊन सर्व  आठवणी ताज्या केल्यात. तेव्हा याहून सुंदर  वाढदिवसाची भेट काय असू शकते ? नाही का?












माझा वाढदिवस 

काय योगायोग  पहा
याच मासात माझा वाढ दिन 
  सांगा कशी मी राहीन मागे
 काव्य रचण्यात कधीच न मी  क्षीण

 कधी न उच्चारते झालं वय
 असते सदा मी उत्साही 
वय काही फारसे हो नाही !
अवघं पाऊणशे च, फार नाही 

वाचन लेखन रेकॉर्डींगची आजही 
  केली  नित्याची अंध जनांना  मदत
समाज कार्यात   समाधान मिळाले
मनाला सात्विक  आनंद, हेच मनोगत

दिधले सर्व काही  विधात्याने
मस्त आनंदी जगले या जीवनी
ऋण आहेत माय पित्याचे
ठेवते जाण त्यांची  प्रत्येक क्षणी

अशीच ठेव सदा देवा 
होवो न तुझा कधी विसर
घडो मज करवी सत्कार्य 
हीच मागणी वाढदिवशी, देवाला निरंतर.

वैशाली वर्तक
अहमदाबाद



शुक्रवार, २७ ऑक्टोबर, २०१७

मन करा रे प्रसन्न

                 मन करा रे प्रसन्न.
     एकदा एका लग्नाची मिरवणूक  चालली होती. नवरा मुलगा ,त्याची बग्गी, डीजे , वेगवेगळी संगीत 
वाद्दे आणि पुढे नाचणारी व-हाड मंडळी,आणि या मुळे  रस्त्याच्या दोन्ही  बाजूला  गाड्यांची लांबलचक रांग लागली होती . सर्व  वहातुक  ठप्प झाली होती. रस्त्यावरचे लोक ताटकळत होते. उशीर होत असल्याने मनात अस्वस्थ होत होते. व उगाचच मनात चीड चीड करत होते.  त्याच वहातुकीत थांबलेली एक गाडी होती. गाडी चालक कुटुंबा बरोबर होता. तो पण ताटकळत गाडीत बसून मिरवणूक  पहात होता. थोड्याच  वेळात तो  गाडीतून उतरला,व त्या व-हाडी मंडळी त जाऊन  नाचू लागला. व-हाडी मंडळी हा कोण अगांतुक पाहुणा म्हणून पाहू लागले पण , तो मात्र मनसोक्त नाचला. शेवटी मिरवणूक जवळचअसलेल्या लग्न स्थळी पोहचताच, गाडी चालक गाडीत येऊन बसला. त्याच्या या कृतीवरुन साधारण मत दिले जाते. की या माणसास मानसोपचाराची गरज असावी ,पण  मी म्हणेल, माणसाच्या या कृतीत  जीवनाचे एक तत्त्वज्ञान  सामावले आहे. इतर व्यक्ती प्रमाणे सद्य परिस्थितीला दोष न देता त्यातून   त्या माणसाने  आनंद शोधला. आपण आपल्या आयुष्यातील मौलिक क्षण निराशेत घालवित असतो. पण जो क्षण समोर आला आहे ,त्यात आनंद  शोधून तो क्षण उपभोगण्यात खरा आनंद आहे. व तो क्षण  त्या  व्यक्ती  ने मिळविला. व आगंतूक पाहुणा जरी असला ,तरी सर्व  उपस्थित व-हाडी मंडळींना त्याने आनंद  दिला.आणि  स्वतःच्या मनास आनंदाने प्रसन्न केले. 
               "मन चंगा तो कठोतीमें गंगा " अशी हिंदी त म्हण आहे आणि अगदी ती खरी आहे. मनाने जर आपण सुदृढ  म्हणजे आनंदी असलो तर  संकटावर ,दुःखावर वा सर्व कठीण परिस्थितीवर मात करु शकतो. जो मनास ताब्यात ठेवू शकतो    म्हणजे , ज्यास राग, द्वेष  आपपर भाव वा कोणाशी हेवा देवा नाही.व  समाधानी असतो. तो खरा मनाने  श्रीमंत म्हणायचा.या जगात सर्वोतोपरी कोणीच सुखी नसतो,.रामदासांनी पण त्यांच्या मनाच्या श्लोकातून  सांगितले च आहे.   मनुष्य जर मनाने आनंदी असेल तर संकटाला  मनातून दूर करुन , प्रसन्न राहू शकतो. मनावर ताबा काबू असल्याने,  जसे निशे नंतर उषःकाल अथवा, सागरास   ओहोटी नंतर भरती हे जसे नैसर्गिक  चक्र चालू असते ना , तसे दुःखा नंतर सुख येणारच हे मनास, आहे त्या परिस्थितीत  समाधान , आनंद मानून ,मनास  प्रसन्नता  दिली की मन आनंदी रहाते . व तसे मनास  प्रसन्न  रहावयास शिकविले पाहिजे .
        माणसाचे मन हे माणसास अनेक   विचाराने  उद्दपित करतअसते. ते आपल्या कडून खूप काही सतत अपेक्षा करत असते. जीवनात यश , किर्ती , सुख , वैभव,आनंद, प्रेम सर्व  काही मिळविण्यासाठी माणसास सतत प्रयत्न करावे लागतात.आणि हे सारे मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यास माणसाचे मनच त्यास उद्दुक्त करत असते. आणि, यशस्वी होण्यासाठी यश प्राप्तीसाठी धैर्य लागते ,आत्मविश्वास लागतो .आणि हे सारे आपल्या मनातच  असते.आपणास  जे जे हवे, ते मनच आपणास देवू शकते. आणि हे मन 
समाधानी असेल  संतृप्त असेल तरच ते प्रसन्नता मिळवू शकते.म्हणूनच  "मन करा रे प्रसन्न सर्व  सिध्दीचे साधक " म्हणतात.
       मन प्रसन्न ठेवणे म्हणजे? जीवनात लहान लहान गोष्टी अगदी सकाळ पासून  ते  संध्याकाळ पर्यंत 
वा दिवासभरात आनंद देणा-या घडतच असतात .त्या छोट्या गोष्टीतून आनंद मिळविता आला  पाहिजे .
अगदी साधी गोष्ट, आपण लावलेल्या रोपाची होणारी वाढ .त्यास येणारी कोवळी  तांबूस पाने ,मग हळूच उगवणारी फूले  यातून पण आनंद मिळवता येतो. एखादा दिवशी मनासारखे योजलेले काम झाले तरी 
देखिल मानसिक सुख लाभते. सहज बागेत बसले असता अथवा अंगणात चिमण्यांचा चिवचिवाट ऐकला.
 हो! कारण आजकाल चिमण्या पण  फारशा दिसत नाहीत. तर त्या  दिसल्या तरी आनंद मिळतो .तसेच
संध्याकाळी पक्षी एकत्र होऊन थव्याने झाडाकडे येतात बसतात.  पुन्हा  थव्याने उडतात. हा त्यांचा  खेळ
पहाण्यात पण मजा येते, आनंद मिळतो.
      तसेच  सकाळी सकाळी आवडीचे गीत ऐकण्यात आले तर मन  प्रसन्न होऊन," वा ! आजची सकाळ मस्त  झाली.हं. " असे शब्द अपसुक तोंडातून  बाहेर पडतात .अशा रीतीने   आनंद  टीपून घेऊन उपभोगला पाहिजे .  ही मनाची  प्रसन्नता  हेच तर आनंदाने जीवन जगण्याचे गमक आहे. 
      आणि ही  मनाची  प्रसन्नता  अनेक रीतीने मिळविता   येते . कोणी संगीतातून, कलेतून , व्यायामातून
वा लिखाणातून , तर वाचनातून , चित्रकलेतून. एवढेच काय खळखळ वहाणा-या पाण्यातून , वा-याच्या
झुळकीवर डोलणा-या   हिरव्यागार शेतातून तर कधी  मनसोक्त  गप्पातून , हो गप्पा करणे , चार लोकांत
मिसळून ज्ञान मनोरंजन देणे तसेच  मिळविणे  .या सर्व  लहान वाटणा-या गोष्टीतून माणूस निर्भेळ आनंद 
मिळवित  असतो. व आपल्या  मनास प्रसन्न   करण्याचा प्रयत्न करीतच असतो..
             तेव्हा प्रत्येकाने येणारा प्रत्येक क्षण आनंदी मनाने जगला पाहिजे .जगायला शिकले पाहिजे."व्यथा
असो आनंद  असू दे,प्रकाश किंव्हा तिमीर असू दे". सतत आनंदी जगावे. असे कवी पण त्यांच्या   लेखणीतून सांगतात. तसा संदेश देतात. 
              नुसते आयुष्य ढकलत जगण्यात काय अर्थ  ?.आपण जगतांना उगाचच  वय ,   आपला परिवार , कुटुंबातील आपले स्थान , त्यात जर , जास्त शिकलेलो असेल तर, मी माझ्या शिक्षणाच्या , नौकरीच्या स्टेटसला  धरून , घाबरुन , मी असे कसे वागु?असे  म्हणत घाबरत जगत असतो.व स्वतःवर अनेक बंधने घालतो. व छोट्या गोष्टीतील  आनंदापासून  वंचित राहातो. तेव्हा वर्तमानातील  प्रत्येक क्षणात संपूर्ण पणे जगणे हे नेहमी मनास ऊर्जा देत असते.जी   ऊर्जा मनास आनंदी प्रसन्न ठेवते. कारण आनंदाला नेहमी ,सहल  स्थित्यांतर हवे  असते. .तर दुःखाला मात्र  घर हवे असते. जीवन जगण इतकही अवघड नाही.जीवनास 
आपल्याला संगीतमय करता येत.एखाद्या सुरेख मैफलीप्रमाणे सजवाताही येते. आपण असल्याने व नअसल्याने जग चालणारच आहे. जग आपल्या अगोदर पण  चालत होते . त्यामुळे जगाच्या  विचारात  
 आपला क्षण वाया घालवू नये. प्रत्येक  क्षणाला संपूर्ण  आनंद दिला तर जीवनाचा आनंदाचा सूर नक्कीच 
सांपडेल जो मनास सतत प्रसन्न करेल.
        तर सुख  व  दुःख मानण्यात असते .जितके आपण सुख  मिळविण्यासाठी प्रयत्न करतो , तितके ते दूर पळत असते .सुख मृगजळा सारखे असते.म्हणून  मनावर ताबा ठेवून सर्वत्र सुख मानले तर आपण सुखी आहोत असे वाटते .व हे ठरविण्याचे काम फक्त मनच करते. मनासच समजवावे लागते .जे आपल्यास मिळाले आहे  त्यात आपोआपच संतुष्ट पणा येतो.व मन प्रसन्न होते.


बुधवार, ६ सप्टेंबर, २०१७

गडबड

                   गडबड                            ४/९/२०१७
      करू नका जरा ही "गडबड"
      देती आदेश सतत वरचेवर
      पण सणवार वा कार्यात काय?
      गडबड होतेच ना ऐनवेळेवर ,
             न सांगता, न बोलता, होतेच गडबड

      बाहेर   गावीं    जाण्यास
      करुनी तयारी तपशील वार
      विचाराने संपविता , सर्व काम
      पण, विस्मृती करतेच  गडबड
             अन् ,शेवटक्षणी उडते तारांबळ.

      कार्यक्रमाचे करुनी आयोजन
      सगळे असता नीट सुसज्ज
      पण, अध्यक्ष महाशयच
      न आल्याने ,ठरल्या वेळेवर
           खोळंबा होऊन, शेवटी पुन्हा.... गडबडच
 
      अचानक येता पावसाची सर
      झाली गडबड ,माजला की गोंधळ
      छत्री असूनी दिसेना जागेवर
      ओले होणे ,आले जीवावर
             वस्तूची किंमत कळते त्या वेळेवर .
 
       गडबड ही कृतीच अशी
       जी केल्या नंतर , वाटे मनीं
       उगाचच केलीना,गडबड घाई
       जरा ,उसंत असता धरली
             झाले नसते का, काम  पटकनी?

        गडबड ही स्वतःच स्त्रीलिंगी
        तिचे वर्चस्व सदा दावी
       कितीही करूनी जय्यत तयारी
       धांधरट पणा हा  तिचाच  साथी
             ऐनवेळी चुकाच घडवी.
     
        गडबड ही कृतीच अशी
       जी केल्या नंतर वाटे
        उगाचच केली ना  गडबड घाई!

                       वैशाली वर्तक

रिकामा

                     रिकामा
   चिमण्या  पाखरे गेली परदेशात
   मिळविण्या उच्च शिक्षणास
   तेथेच रमली , डाॕलरच्या दुनियेत
   घरे  तयांची , येथे ओसाड
                  आजीआजोबांना सदैव  भेटीची आस.
   प्रसंगावत येतात पाखरे
   नंदनवना परि सजती घरे
   जेव्हां परातती   पाहुण्यापरी
   ओकी दिसती तयांची घरकुले
                  पाणावती नयने तयांच्या आठवांने
   आलो जरी या जगती
   आपण सारे रिक्त हस्ते
   कमविले  धन मुठी-मुठी भरुनी
   परतणे येथून  रिकाम्याच हाते
              स्थान मात्र मिळवावे अनेक हृदयांमधे
   चांगल्या विचारांची  वेसण
   हवी रिकाम टेकड्या मनास
   मग येत नाही  म्हणण्यात
   रिकामे मन , घर सैतानाचे खास
               बोलणे नुरते तुंबड्या लावी उगाच
   अर्धा भरलेला पाहूनी ग्लास
   भरावा हा पूर्ण , हीच आस
   पण असा विचार न येई मनीं
   तो पूर्ण  रिकामा तर नाही  ?
              समाधानी वृत्ती असावी सदा मनात
   खरेदीला जाता रिकामे पाकीट
   ठरते असून नसल्यागत
   पण आजकालच्या युगात
   प्लास्टिक मनी भरले तयात
              पाऊले  चालती काळाच्या ओघात
         
             .........  ..........  वैशाली वर्तक        

शुक्रवार, ४ ऑगस्ट, २०१७

श्रावणधारा

                         श्रावणधारा                                             
           गुजरातचा पाऊस फारच लहरी, मृग नक्षत्राची ७ जून तारीख सरून  गेली  तरी पावसाला त्याच्या येण्याची फिकीरच नसते. अहो ! 7 जून काय ? 7 जूलै झाली तरी कित्येकदा पत्ता च नसतो .तसा वळवाचा, गारांचा पाऊस पडून जातो म्हणा कधीतरी.   
         पण , साधारण पणे , श्रावण मासात सर्वत्रच सरीवर सरी पावसाच्या येऊ लागतात.  आषाढातील पावसाने सृष्टी हिरवळी जाते  . ग्रीष्माने, आलेले सुकेपण, रुक्ष पण ,निस्तेजता जाऊन  पावसाच्या आगमनाने सृष्टी कशी तरारलेली असते. हिरवागार शालू नेसल्यागत दिसते.आणि कुसुमाग्रजांच्या कविते प्रमाणे ,"हसरा नाचरा जरासा लाज-या " श्रावणात तर, निसर्गाचा एकच रंग दिसतो तो म्हणजे हिरवा आणि म्हणूनच तर ऋतू हिरवा म्हणून संबोधला जातो. झाडे स्वच्छ धुतली गेल्याने मस्त हिरवीगार दिसतात. आपण आपल्या घरच्या रोपांना ,झाडांना  कितीही पाणी घाला ,पण नैसर्गिक पावसाच्या पाण्याची त्याला सर येत नाही.    
         पण ,खर सांगू ? मला तर या श्रावण सरींचे वा पावसाळ्याचे जराही कौतुक नाही. तुम्ही म्हणाल काय अरसिक बाईआहे. अहो! पण आमच्या  सोसायटीत की नाही पाणी भरते .बाहेरचे रस्त्यावर चे पाणी आत येते. जरा 2/4 इंच पाऊस पडला की झाsssले. जरा कुठे पावसाचा आनंद लूटत असता बाहेरचे पाणी आत येऊ लागले  की पावसाची मजा  जाऊन टेंssशन मात्र वाढते . कवितेतून ,पुस्तकातून, साहित्यातून, कवी मनातून श्रावणसरींची किssती कौतुक वाचलीत  तरी प्रत्यक्षात पाऊस , पाऊसानंतर पाणी तुंबणे , घरात तर पाणी येणार नाही ना याची धास्ती.व घरात पावसाच्या पाण्याने येणारी  ओल या सर्व गोष्टीेंमुळे  पावसाचे येणे, म्हणजे दडपणच  वाढविते.   
        नुसते काळ्या ढगांनी भरून आलेले आभाळ, ढगांचा कडकडाट , थंडगार वारे , ओल्या मातीचा  सुगंध हे सारेssसारे काही सुखद वाटते. अशावेळी की नाही, घराबाहेर मागच्या  अंगणात  वा पुढे झोपाळ्यावर , ओट्याच्या कट्टयावर वा  बाल्कनीत  बसून, हातात मस्त  वाफाळलेला कॉफीचा कप तसेच जोडीला टॕब वा मोबाईल घेऊन   whatsapp चे msgs वाचीत बसावे व त्या वातावरणाचा उपभोग  वा मजा   लुटत बसावे अशी तीव्र ईच्छा होते.पण जर, मेघराज गर्जना करत बरसायला लागले व पाऊस वाढला व बाहेरचे पाणी सोसायाटीत घुसू लागले  तर या श्रावण सरी ज्यांचे आपण आता गुणगान करतोय ना ,त्यांचा  जोर वाढला तर , "देवा बस कर रे बाबा हा पाऊस, आवर घाल या श्रावण सरींना. नको हा पाऊस ." असे विचार  मनात येतात आणि त्या वाढत्या पावसाने पाणी घरात  येईल  तर ? या विचाराने जीवाची घालमेल सुरू होते.        
        तसे तर जून महिन्यातच घराच्या entance ला भिंत घातली जातेच.लहान रांगतीमुले घराबाहेर जाऊ नयेत म्हणून भिंत घालतात ना?तशी .बाहेरचे पाणी आत येऊ नये म्हणून सोय करण्यात येतेच .       
         बर हा  पाऊस दिवसा असेल तर ठीक. आणि जरी ही दिवासा पाऊस असला व वाढला की लगेच मुलाचा , सुनेचा  आॕफीस मधून फोन खण-खणणू लागतात, "आई, येथे पाऊस फार आहे .आपल्याकडे कसाकाय? पाणीतर भरू लागले  नाही ना? " एवढेच काय माझ्या इंजीनीअर मुलाने तर बाथरूमला खास दट्टे बनवून घेतले आहेत . त्या मुळे बाहेरचे पाणी वाढले तरी गटर बॕक मारीत नाहीत.तर सांगयचे की त्यांचे ,मुलांचे  विचारणे सुरू होते दट्टे घट्ट लावलेत का? तपासून पहा  म्हणून. आणि पाऊस रात्री  असेल तर मग काय ? मंगळागौर नसतांना पण जागरण करणे  आलेच. बाहेर व-हांड्यात वारंवार जाऊन, पाणी येऊ लागले का ? पाण्याची लेव्हल वाढत तर नाही ना? सतत पहाणे. चालूच रहाते. धड झोप पण  निवांत मिळत नाही.        
   अरे हो !पाणी भरणे यावरून आठविले . परवा भिशीत ,पुढची भिशी कोणाची  तर ही आपली अपर्णा लगेच म्हणाली, "ए मी आॕगस्ट च्या पुढे भिशी घेईन ह .कारण  माझ्या  flat खाली भरपूर गुडघा भर पाणी जमते , मग कशा येणार तुम्ही  ? या वैशालीचे ठीक आहे येईल दोन चार हात मारत ," त्यावर मी तिला म्हटले ,"तुझे ठीक  आहे ग ,तू वर रहाते.आमचा तळमजला. त्यामुळे  एकदा दोनदा तरी पावसाळ्यात, काश्मिरला न जाताच शिकारात रहाण्याचा अनुभव घेतो.आणि सरी थांबल्या व पाणीओसरले की मग काय ? तळमजला त्यामुळे सर्व जण कामास लागतो.त्या पावासाच्या पाण्याने अंगण , घरासमोर  , मागचे आंगण वगैरे सफाई काम करावे लागते ते वेगळेच. पण काय करणार ?श्रावण सरी तर  बरसल्याच पाहिजेत ना!  
      पण, मला काय वाटते ? इंद्राच्या दरबारात एक application च करावी. लिहावे अन् सांगावे की अरे बाबा रोजचा एकच इंच पाऊस पाड म्हणजे पाणी पण जमिनीत मुरेल,व ज्यामुळे बोअरच्या पाण्याचा प्रश्न रहाणार नाही.व महत्त्वाचे श्रावणसरींचा आनंद लुटता येईल आणि असाही गुजरातमधे सरासरी 30 ते 35 इंच पडतो. म्हणजे काय? लहान पणी आपण पत्त्यांचा पांच/ तीन/ दोन डाव खेळ खेळायचो ना? त्यात जेवढे आपल्यास डाव  करावायाचे असायचे तेवढे झाले की म्हणायचो ना? माझे झाले बाबा पोटापाण्या  पुरते डाव .तसे इंद्र सरकारला सांगावे  रोज एकच इंच पाऊस पाड.मग श्रावण सरींचा आनंद लुटता येईल मजा घेता येईल . पण  इंद्र दरबार वा सरकार  काय आपली स्टेटअकांउट आहे? ठराविक रक्कम प्रमाणे  रोजचा एक इंच पाऊस withdrawalकरता यायला . रोज 1"  पाऊस पाडायला.?

शनिवार, २९ जुलै, २०१७

मी अनुभवलेला सिंगापूर

    
       सन  2001  मी बँकेतून VRS घेण्या आधी आम्ही दोघांनी बँकोक, पटाया , शेवटी 7 दिवस सिंगापूर अशी सहल आयोजित केली होती. ते आमचे पहिले सिंगापूर दर्शन . पण तेव्हा फक्त हाॕटेल मधे राहून सिंगापूरची पहाणी झाली . तोंड ओळख झाली .कारण हाॕटेल मधे राहून तेथील लोकांची  रहाणी करणी जीवनशैली याची काहीच कल्पना येणे शक्य नसते. पण सचिन ची (मुलांची ) बदलीच सिंगापूरात झाल्याने सिंगापूरामधे वास्तव्य करावयास मिळाले. व आता तर दरवर्षी २महिने सिंगापूर मधे येतो. आणि दरवर्षी चला" मामाच्या गावाला जाऊया"म्हणतात तसे दरवर्षी चला "सचिनच्या सिंगापूरला जाऊया" म्हणत नित्य नियमित रहावयास येतो.
         खरच , सिंगापूर एक तर भारता पासून तसे जवळ .अहमदाबाद पासून पाच - साडेपाच तासांच्या अंतरावर. सिंगापूर सुरेख ,सुंदर , शिस्तीचे अन् सोपे.सोपे  एवढया  साठी की  आमच्या सारख्या कधी तरी रहायला येणा-यांना तसेच वरिष्ठ नागरिकांना जर पत्ता नीट माहित असेल तर हिंडण्यात, फिरण्यात कठीण पणा भासत नाही .तसेच transportation  सोय पण फारच छान. प्रत्येक cluster च्या वा रहात्या घराच्या जवळच शक्यतो MRT वा बस स्थानक असतात,  त्यामुळे कुठेही जाणे सहज सुलभ होते. .तसेच जीवन पण  रहायला सुरक्षित आहे.
        कुठे ही नजर टाका, 5/25 झाडे नजरेसमोर येतात. सर्वत्र हिरवळ
पसरलेली . Vertical plantation नजरेस येते.  मध्यंतरी मी सिंगापूरात असतांना आमच्या येथील  चारोळी ग्रुप वर " असेच काही तरी येते माझ्या मनीं" म्हणून चारोळीचा विषय होता .तर लगेच माझ्या मनांत येथील  हिरवळ पाहून विचार सुचला.
                  असेच काही तरी येते माझ्या मनीं
                  दिन सिंगापूर सोडण्याचे  येता जवळी
                  घ्यावी डोळा भरूनी येथील  हिरवळ
                  जीवास देत राहील गारवा वर्षे भर.
  असे सदा हरित सिंगापूर सर्वांना आर्कषित करणारे आहे.
             तसेच सिंगापूर मधे येथील सिंगापूरीयन लोकात,   आपल्या भारतीयां सारखी एकत्र कुटुंब पध्दती पहावयास मिळते. जेव्हा मी नातीला शाळेच्या  बससाठी सोडायला जाते. तेव्हा एखादी तरी आजी वा आजोबा नातवा बरोबर सोडायला आलेले दिसतात. एक मात्र गोष्ट जाणविली. कीं सिंगापूरीयन बायकांना आपल्या सारखे सबंध दिवस स्वयंपाक घरात रहावयास आवडत नसावे.  ठिक- ठिकाणी food court दिसतात. आॕफीस मधून परत येतांना ब-याच जणांच्या  हातात तयार फूड पार्सल दिसतात. त्यामुळे त्यांच्या  स्वयंपाक घरात उगाचच वर्दळ नसते. 
              इथे कपडे वाळत घालण्याची सोय  मात्र फारच भयानक आहे.अर्थात घरात पण स्टाँड अथवा दो-यां वर कपडे वाळत  घालता येतात . तरी पण काही HDB मधे ती बांबूवर  कपडे वाळत घालण्याची सोय धोकादायक वाटते.
            तसेच येथील लोकांच्यात स्त्रीदाक्षिण्य आहे, तसेच वरिष्ठ नागरिकांना मान देणे हे पण प्रामुख्याने दिसते. वरिष्ठांना Metro वा बस मधे जागा देणे . वगैरे शिष्टाचार ते छान  पाळतात. रस्त्यावर पण ,कोणास  जिथे जावयाची याची कल्पना नसेल, अजाण असतील व  विचारले तर योग्य  माहिती सांगण्यात मदत करतात.  आणि वस्तूंची उपलब्धता म्हटली, तर आपल्या भारतीयांच्या सर्व साधारण लागणाऱ्या नित्य उपयोगी वस्तू पण मिळतात.
          या सर्व गोष्टींचे निरीक्षण सिंगापूरातील वास्तव्यात करता आले , तसेच संस्कृती दृष्टा सिंगापूरात दरवर्षी सर्व भारतीयांचा एक कार्यक्रम  असतो .तेव्हा भारताच्या सर्व प्रादेशिक  लोकांना , त्यांच्या त्यांच्या संस्कृती व कलेचे दर्शन घडविणारा कार्यक्रम असतो.  भारतातील सर्व प्रादेशिक लोक तेथे   आपापल्या नियत केलेल्या  जागी संस्कृती ची झलक दाखवितात. आम्ही एकदा तिथे असता आपल्या MMS ने सत्यनारायण पूजा , नूतन वर्ष गुडीपाडवा बद्दल  प्रत्यक्षात   गुडी उभारून, तसेच गणपती उत्सव, दही हंडी , दसरा ,दिवाळी सणांची  पोस्टरस् लावून सण व उत्सवांचे दर्शन घडविले होते .
         त्याच कार्यक्रमाच्या वेळी माझी श्री  माधवजी भावे यांची भेट झाली. सचिनने (माझ्या मुलाने) त्यांची  ओळख करून दिली. व शब्दगंधची माहिती करून दिली. त्यांनी पण मला सविस्तर शब्दगंध दर महिन्यास दिलेल्या विषयांवर एकेकाच्या  घरी होतो. पण त्या वर्षी आम्ही सिंगापूर पहाण्यात व्यस्त असल्याने शब्दगंध ला हजर नाही राहू शकलो. पण दुस-या वर्षी  सिंगापूरात येताच मात्र ,श्री केळकरांकडे मी पहिल्यांदा शब्दगंध ला आले. मग मात्र मला नियमित  email व्दारा विषय कळू लागले . यात सांगावयाचे हे की सिंगापूर शब्दगंधने  माझ्यातील कवी मन जागे केले. तसे आम्ही भारतात विविधा ग्रूपवर  हस्तलिखित काढतो.पण दर महिन्यास विषय देऊन  सिंगापूर शब्दगंधाने माझी कल्पना शक्ती जागृत केली. आता तर असे झाले आहे की आम्ही सिंगापूर मधे आलो की आवर्जून शब्दगंध ला हजरी लावतो. सर्वांच्या  कविता ऐकून मजा तर येतेच तसेच प्रत्येकाच्या काव्य  शैलीचा आस्वाद घेता येतो.मी सिंगापूर शब्दगंधची खरच ऋणी आहे. कारण शब्दगंधनी मला त्यांच्यात समावून घेतले.
       तसेच आपले सिंगापूर महाराष्ट्र मंडळ ,मराठी संस्कृती टिकविण्यात फार सक्रिय आहे. भारता बाहेर पण आपली मराठी भाषा जीवंत ठेवण्यात
मंडळाचा भरपूर वाटा आहे.तेव्हा असे भाषा व संस्कृती प्रेमी लोक सिंगापूरात असता मराठी भाषा व संस्कृती ला नक्कीच कधीच मरण नाही.
         

शुक्रवार, २१ जुलै, २०१७

गाव

गाव
काल मी पाहिला स्वप्नात एक गाव
कल्पलेला होता, जसा माझ्या मनात
        चारी बाजूस तटबंदी डोंगर-माळ
         जणू सज्ज  उभी तयाच्या रक्षणास
तटबंदी टेकड्यांची, गट्टी जमे ढगांशी
खेळताना मुसळधार ,पाऊस पाडण्याची
     सर्वत्र डोलती हिरवी गार शिवारे
     वा-याच्या झुळके वर नाचती माळराने
 कृषीवल फिरवी समाधानी नजर
 बैलांना झाली होती चा-याची चंगळ
            शेतात लागलीय    धान्याची   रास          
            बैल गाड्या घेतील बाजारपेठत धाव
  नजरेस नव्हते सिमेंट चे जंगल
  टुमदार कौलारू घरे होती सुंदर
            कोठे दिसत नव्हते वीजेचे जाळे
             रात्री चमकणार होते आकाशात तारे
 सारे  गाव कसे  स्वच्छ अन् निर्मळ
  प्रदूषणला  कुठे नव्हता , थारा कणभर
            काल मी पाहिला स्वप्नात एक गाव
             कल्पलेला होता जस्सा माझ्या मनात
                               .......वैशाली वर्तक

गुरुवार, २० जुलै, २०१७

धीर धरि धीर धरी

                  धीर धरी धीर धरी                    ९/४/१७
प्याला विषाचा देता राणाने,
सहज केले प्राशन मीरेने.
तारण्या असता तिचा  हरी,
 धीर धरी धीर  धरी.

ग्रीष्मा नंतर बरसत येती,
पर्जन्य  धारा अमृत रूपी.
गोमटी फळे मिळतील मोठी,
धीर धरी धीर धरी.

पाल्यांना शिक्षीत करूनी,
देशला ने प्रगती पथावरी.
सरकार दत्त असता सवलती,
धीर धरी धीर धीरी

 रजनी अंती येते रम्य उषा,                       
भगीरथ परिश्रमाने बळीराजा.
सुगीचे दिन येतील धरेला,
धीर धरी धीर धरी.

असता उभा विठ्ठल  पाठी,
तुकयाच्या गाथा तारिल्या जळीं
सदा असू दे विठू नाम मुखी,
धीर धरि धीर धरी

जीवन नौका करण्या पार,
प्रभू रामराया सदा तयार.
 कसली खंत धरीशी मनी  ,                                   
धीर धरी धीर धरी.

                                    वैशाली वर्तक.      

रविवार, १८ जून, २०१७

स्वभाव

स्वभाव                                        14/6/2017

   रूप म्हणे मनाला,
  "माझ्यामुळेच सर्व
   वाखाणती  मानवाला
   जिकडे तिकडे माझीच वाहवा
   सर्वत्र माझ्याच सौंदर्याची चर्चा"

   मन म्हणाले ," नाही रे रुप.
  "माझ्यात दडलेली ,भरलेली वृत्तीच
   ओळखली जाते स्वभाव म्हणून.
   अन् स्वभावाने जो उजवा ,
   वाखाणला जातो सर्व लोकांत"

   असती त-हा ,अनेक   स्वभावाच्या ,
   म्हणूनच वदती, "जितक्या व्यक्ती वल्ली तितक्या"
   कधी तापट तर कधी मवाळ
   संकुचित तर , कोणी दिल-खुलास
   घडते दर्शन त-हांचे वृत्तीतून
   वाणीतून , व्यवहारातून वा वर्तणुकीतून.

    कोणी स्वभावाने असे भोळा-भाबडा,
    तर कधी जसा लबाड-कोल्हा.
    असतो भित्रट , जणू ससा कोणी,
    कशाचे धाडस नसे अंगी,
    भितीचे सावट, वसे सदा मनीं.

    असे स्वभाव दिसती प्राणी-मात्रात
    स्वभावाने असता हाडाने-गरीब
    म्हणती तिजला जणू गाय-गरीब
    काही वृत्तीने  उदार , दानी-दातार
    जसे  नांव  कर्णाचे,दानवीर महान,

     जे असते आपणा जवळी
     ते सोडूनी , धावे नसत्या पाठी
     अशी वृत्ती पण दिसे स्वभावी
     असावी  सदा वृत्ती मात्र समाधानी.

     स्वभावाची जडण घडण होते बालपणात
     जसा होतो  मानव मोठा, ज्या त्या वातावरणात
     परिस्थितीने  बदलते रूप स्वभावाचे
     मिळता धडे-बोल आयुष्यात अनुभवाचे.

     "रे रूपा , तू तर बदलत राहशी,
     "स्वभाव" मात्र जीवनभर साथ देई,
     जोडून ठेवी जनांशी-आप्तांशी
     सहजपणे  जोडला राही विश्वाशी.
         
       वैशाली वर्तक

सोमवार, २९ मे, २०१७

शतक

एक  साधी सरळ कविता

                                 शतक
                             दहा वर शून्य शंभर,
                             पहिला माझा नंबर,
                             घोकून  केले  रटण,
                             बालपणी शतकच

                             खेळताना सापशिडी ,
                             शतक  गाठण्या  परि ,
                             कितीदा केले वर खाली ,
                             अंती पोहचले  शतका वरी.

                             पुरता पुरविला पिच्छा ,
                             विद्याभ्यासात शतकाने ,
                             गुणांची मोजणी करिता ,
                             शतक अंकच आले पुढे    

                             इतिहासात शतकानुसार
                             शतक सरते   पुढे ,
                             एकोणीसाव्वे  शतक मात्र
                             स्वातंत्र्य प्राप्तीचे  ठरे

                             शतक मारण्याची
                             लागते  चुरस फलंदाजांची
                             किती शतके मारलीत
                             टिपणीत नोंद करण्याची

                             देतांना हमी सुद्धा ,
                            शतकच येते पुढे ,
                            "शंभर टक्के खात्री देतो " म्हणत ,
                            उच्चारण होते शतकाचेच .

                           जीवनाचा कालखंड ,
                           गृहीत धरतात शतकात ,
                           शतायुष्यी होवो म्हणत
                           आशिष देतात झोकात

                             वैशाली वर्तक

गुरुवार, ११ मे, २०१७

नाही पुण्याची मोजणी

नाही पुण्याची मोजणी ।

      जन कल्याणा असती विभूती ।
      विश्वबंधुत्व भाव वसे ठायी ।
      दुजा भाव कधी न मनी ।
                     नाही पुण्याची मोजणी ।।  
                           
      सोयरे तयांचे तरू वेली।
      छाया माया देती तयांपरि ।
       जीवन सफल तयात जाणी ।
                     नाही पुण्याची मोजणी ।।                       
                   
       नसे खंत सुख -दुःखाची ।
       भक्ती मार्ग सदा आचरती ।
        जिणे जणू गंगेचे पाणी ।
                      नाही पुण्याची मोजणी ।।
      पर उपकार धर्म  हाची ।
      पाप भावना मुक्त होती।
      संत संगतीत पुण्य जाणी
                        नाही पुण्याची मोजणी ।।
      जरि करिता  दुःस्वास जनांनी ।
      साहुनी घेती सुस्मित वदनी ।
       क्रोध न येई ध्यानी मनी ।                                                     
                           नाही पुण्याची मोजणी ।।
       निवृत्त होऊनी ज्ञानी होती।    
       सोपान मार्गी होई मुक्ती ।    
       देती शिकवण जीवनाची ।
                          नाही पुण्याची मोजणी ।।
                                                            वैशाली वर्तक (अहमदाबाद)
.

बुधवार, १० मे, २०१७

हव्यास

                     हव्यास
                       देवा दूर कर रे  इतुका  हव्यास
        सदा समाधान, देगा देवा
        गरजे पुरते ,दे जनांना
        सुख शांति ,नांदेल जगती
        नसेल जर हव्यासी कोणी
                                देवा ,नको रे इतुका हव्यास

        धन कमविण्याचा असे हव्यास
        संचयास नसे , अंत ना पार
        धना पोटी धावे , तीन्ही-काळ
        असता जाणिव ,जाणे रिक्तच
                              देवा ,नको रे इतुका हव्यास.

       रयतेला , धरूनिया  हाती
       हव्यास मनीं , व्हावे सत्ताधारी
       स्वार्थ  स्वतःचा  सदा साधती
       करूनिया , दुरुपयोग सत्ते-तूनी
                                देवा ,नको रे इतुका हव्यास.

        करु पहातो, निसर्गाला दास
        विज्ञान प्रगतीचा, मनीं हव्यास
        सृष्टीचा स्वामी, तयाचाच मिरास
        न जाणती तयाच्या ज्ञानाचा प्रकाश
                               देवा, नको रे इतुका हव्यास.

         विद्यार्जनाचा असावा हव्यास
        मिळवावे विद्या धन हम-खास
        तयानेच मिळतो मान सन्मान
        या हव्यासास, नसावा कधी पार

                               देवा ,असावा रे हा हव्यास.
                               देवा, असावा रे हा हव्यास.

                                            ............वैशाली वर्तक  ७/५/२०१७

सोमवार, २० मार्च, २०१७

चाळा

चाळा
         चाळा जो लागतो जीवा
         वारंवार तेच करण्याचा
         तयाचा लागतो  लळा
         करी  प्रेरित चाळयाला
                          चाळा जो लागला  जीवा
          गुंततो जीव चाळ्यात
          हरपते भान वेळे च                      
         असे हा हुकूमी एक्का
          विरंगुळा म्हणोनी जोपावा
                           चाळा जो  लागला जीवा
          कुणी चाळ्याने उडवी खांदे
          तर कोणी मारती डोळे
          गळ्याशी येती हे चाळे
          नसावेत तापदायी चाळे
                          चाळा जो लागला जीवा
         चाळा टाळी मागण्याचा
         म्हणती  "द्या टाळी" सर्वदा
         अंती नाव  तयांचे ते झाले
         स्वीकार करणे टाळ्यांचे
                         चाळा जो लागला जीवा
           मनी काळजी वा चिंता
           चाळा असे नखे  खाण्याचा
           भरे डोक्यात विचार माळा
           अन्   नुरती नखे बोटाला
                           चाळा जो लागतो जीवा
            या युगाचा एकची चाळा
            मान खाली राखती सदा
            सदैव  लागे फोन साथीला
            न  होई संवाद एकमेकात
                           चाळा जो लागतो जीवा
            असे हे विविधतेचे चाळे
            तयांचे वेड हे लागे
            जतन जे करिते तयांचे
            वेळ छानसा जातसे
                             चाळा जो असावा जीवाला

     

       

     









.

रविवार, १२ फेब्रुवारी, २०१७

भाव

                           भाव  

     भाव म्हणजे मोल वस्तूंचे        
     भासता उणीव मुल्य चढे
      असता मुबलक उतरे भाव
      अर्थ शास्त्राचा नियम खास    
                       भाव दिसे अर्थतंत्रात          
     
  दडला भाव नर्तन-चित्रात
  साकार होई तो कला दर्शनात
  होता  भावपूर्ण   अभिनय              
  मूर्तीमंत   तो उतरे कलेतून
                            भाव वसे हर-एक कलेत
 
  शब्दा विना कळते सारे  
   घडे संवाद दोन जीवात        
  भाव नजरेने  सांगे मनीचे      
  भाव वसती जे अंतरंगात
                        चेहरा सांगे भाव क्षणात

धन दौलत नकोस तयास
नकोच व्रत  वैकल्याचा भार
हवा नजराणा भाव भक्तीचा
भोळ्या भावाचा सदा भुकेला
             देव पाही भाव भक्तात

प्रेमळ भाव आईचे हृदयी
वडीलांचे ठायी उदात्त भाव
सदा निरागस बाल्याचे दिसती
 शांत निर्मळ प्रसन्न भाव
                         प्रभो ,दिसती तव नयनात
                                                           
   वैशाली वर्तक    29/1/'17

रविवार, १५ जानेवारी, २०१७

रहस्य

  1.    रहस्य    

मनात येतात राहून राहून
महा-भारतातील, काही रहस्य

     कुमारीवस्थेत कुंतीस, कैसे मिळाले मातृत्व?
     दुर्वांसांच्या श्लोकात, कोणते गुढ सामर्थ्य ?
     करिता मंत्रोच्चार कुंतीने ,सूर्य देव झाले प्रसन्न
     अन् जन्मास आले, तेजस्वी पूत्र कर्ण
                                 मनात येतात राहून राहून.....
     दुर्योधनाने कणकनीतिने रचिली एक नामी युक्ती
     पांडवाचा नाश करायास लढविली कूटील बुद्धी
     बांधूनिया लक्षागृह ,पाठविले तयांना वारणावतवनी
     परि ,पांडव निघाले कुशलक्षेम, जळत्या लक्षागृही
                                 मनात येतात राहून राहून......
       होते जरी पितामह, राज-सभेत  हजर
       दुःशासनाने मांडिले ,पांचालीचे वस्त्र हरण
       का हतबल पितामह ,पाहूनी त्या दुष्कृत्यास
       कैसे पुरविले वस्त्र सख्याने, तिच्या लज्जारक्षणास
                               मनात येतात राहून राहून.......
        एकच तुळसी पत्र, सेवन करिता माधवाने
        शिष्यांसह दुर्वांस मुनी, परतले समाधानाने
        न भक्षिता अन्न कण, झाले संतृप्त भोजनाने
       काय गुढ होते असे , द्रौपदी च्या थाळी मधे.
                                मनात येतात राहून राहून
                                महाभारतातील काही रहस्य
                         
                                                                                       
   

.

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...