शेल रचनेचे नियम दाखवणारी शेल रचना
................,........................,..................................
१शेल रचना
सहजच आला विचार मनीं
मनीं येताच घेतली लेखणी
केली की सुंदर शेल रचना
रचना वाटली मम देखणी
शेल प्रकार हा मनीं भावला
भावला लेखणीतूनी झरला.
केवळ शब्दांचा करिता खेळ
खेळ खेळता काव्यात रमला.
रचिल्या विविध शेल कविता
कविता शेलची लागता गोडी
मांडणी केली असता शब्दांची
शब्दांची गर्दी मनीं झाली थोडी
पाहता पाहात रचली शेल
शेल कवितेचा जमला मेळ
जीवास लागले एकच वेड
वेड मन म्हणे शब्दांचा खेळ
असती विविध त-हा काव्यात
काव्यात नसे बंधन वर्णांचे
अंत्य शब्द ओळीचा असे तोचि
तोचि असावा आद्य दुस-याचे
.....,,,, वैशाली वर्तक
यारिया साहित्य कला समूह
२ विषय - मुखवटे
स्पर्धेसाठी
शीर्षक -- *नको मुखवटा*
वर्ण -- 9
सध्या खरे चेहरे कमी
कमी दिसतात जगात
मुखावटा घालून फिरे
फिरे बिनधास्त जोमात
नाटकात ते आवश्यक
आवश्यक खोटे चेहरे
संपताच नाटक येती
येती खरे खरे मोहरे
चाले नाटकी खोटेपणा
खोटेपणा दिसे जगती
येता उघडकीस खरे
खरे राही सदा सोबती
खरे जगावे , सदा टाळा
टाळा खोटेपणाचा आव
नक्की मिळेल तुम्हा सदा
सदा राहील जगी नाव
असे आहे या तर जगी
जगी अभाव तो ख-याचा
आपल्याला कदापी नको
नको खोटेपणा खोट्याचा
वैशाली वर्तक
३ **फूलबाग
शीर्षक -- माझी बाग
माझ्या बागेत फुलली फुले
फुले पहा आहेत अनेक
रूपे सुंदर , मोहक नावे
नावे त्यांची ऐका एक एक
दारी फुलली पहा बोगन
बोगन देई छाया जनास
पुढे येता सदा बहरला
बहरला झेंडू स्वागतास
मोहक सुगंधित मोगरा
मोगरा हसे पाना-पानात
सुगंध तयाचा पसरवे
पसरवे गंध क्षणार्धात
बहु रंगात किती फुलला
फुलला गुलाब तो सुरेख
सदा साठी राखिला पूजेला
पूजेला मनी आखुनी रेख
जाई जुई कशी लवुनिया
लवुनिया उभी डौलदार
दरवळे मंद गंध पहा
पहा दावी रुप शानदार
ही पहा कशी डौलात उभी
उभी डौलदार रातराणी
होता सांज उमलूनी रात्री
रात्री म्हणे मज नीज राणी
वैशाली वर्तक
शेलरचना
४ जल हेच जीवन शेल रचना
जाणा महत्त्व जलाचे
पंच तत्वातील एक
एक जल तत्व असे
पाच तत्वाची गरज
गरज मानवा भासे
निवारा वस्त्र न् अन्न
अन्न ही जशी गरज
जला शिवाय जीवन
जीवन नसे सहज
विसंबूनी जलावरी
जलावरी सारी सृष्टी
कसे पिकवेल बळी
बळी जीवाने तो कष्टी
निसर्गिक जरी पाणी
पाणी आहे अनमोल
जिरवू मातीत राखू
राखू निसर्गाचा तोल
निसर्गाचा होता कोप
कोप दिसे अतीलोभे
प्रगतीच्या नावे होतो
होतो तो अती क्षोभ
वैशाली वर्तक
अ भा म सा प स्वप्नगंध समूह
चित्र आधारित शेल काव्य रचना
वर्ण 9
५ खोपा सुगरणीचा
पाहूनी चित्र मी रमले
रमले खोप्यातच मन
किती पक्षी हा कलावंत
कलावंत तो सुगरण
सुरक्षित पिल्लू राखण्या
राखण्या ठेवी मऊ वस्त्र
कसा विणला पहा खोपा
खोपा सुबक विना शस्त्र
ईवलेसे पिल्लू डोकावी
डोकावी पहाण्यास आई
आई दरडावूनी सांगे
सांगे आतच रहा बाई
रुप एकच आईचे ते
ते पक्षी प्राणी मानवात
रक्षण करण्याची वृत्ती
वृत्ती दिसे ती अभिजात
वैशाली वर्तक
अहमदाबाद
शेल रचना
६ विषय -- लाडू
चला चला गणपती आले
आले तर लागू तयारीला
आधी बनवुया रवा लाडू
लाडू आवडे गणपतीला
लाडू किती प्रकारचे पहा
पहा उद्या करु बेसनाचे
येता गणपती दिन सदा
सदा वाटती ते आनंदाचे
दहा दिवस ते उत्साहाचे
उत्साहाचे सर्वा भेटायाचे
पण नकोच काळजी घेऊ
घेऊ दक्षता ती फिरण्याचे
वैशाली वर्तक
७ विषय - चैत्र पालवी
संपे पानगळ वृक्षांची
वृक्षांची पाने पाही वाट
चैत्र पल्लवी अंगोपंगी
अंगोपंगी दिसेल थाट
संपली पानगळ आता
आता निसर्ग बहरेल
लेवूनिया कोवळी पर्णे
पर्णे सृष्टीला खुलवेल
थंड वा-याची ती झुळूक
झुळूक शहारेल अंग
फुले फुलतील मोहक
मोहक रंगी होऊ दंग
मोहरेल बहावा पळस
पळस दिसे वनोवनी
वसंताचे नव चैतन्य
चैतन्य पहा मनोमनी
चैत्र महिना चैतन्याचा
चैतन्याचा नव वर्षाचा
मनी उभारी देत असे
असे चैत्र मास हर्षाचा
वैशाली वर्तक
अहमदाबाद
शेल काव्य रचना
८ विषय -- झोका
वर्ण 10
माझ्या अंगणात झुले झोका
झोका झुले माझा सदा छान
नसे थांबत तो दिनभर
दिनभर विसरे मी भान
रोज गाई गाणी तयावरी
तयावरी मिळे जो आनंद
किती रमले मी बालपणी
बालपणी मिळाला स्वानंद
मन हेलकावे वर खाली
खाली झुला येता ,मन हसे
पुन्हा पुन्हा झुलण्याची मौज
मौज त्या काळाची, आता नसे
झोका देतो मना विरंगुळा
विरंगुळा थकल्या तनाला
जीवन असे चढउतार
चढउतार दावी मनाला
वैशाली वर्तक 18/12/2019
९. पदर
शब्द साधा असे पदर
पदर आईच्या मायेचा
पदराने मिळे मनाला
विश्वास तो सदा प्रेमाचा
पदरात दडली ऊब
ऊब मायेची बालकाला
मिळणार ना कोठे अशी
अशी माया त्या चिमण्याला
पदराने मिळे मनाला
मनाला सदा ची उभारी
आशीषचा तो हात शिरी
शिरी घेण्यास उंच भरारी
वैशाली वर्तक
फुलोरा कलेचे माहेरघर ५
एक पाऊल परिपूर्ण ते कडे
शेल रचना काव्य
विषय..महाराष्ट्र देशा कणखर देशा
वर्ण १२
१० माझा महाराष्ट्र
महाराष्ट्र देशा कणखर देशा
देशा तूची मजला ,जीव की प्राण
सर्व जगतात, नसेची दुसरा
दुसरा देश, तयाहून महान
देश नटल्याय कुशी सह्याद्रीच्या
सह्याद्रीच्या कणखर कपारीत
राज्य हिंदवी स्थापिले शिवबांनी
शिवबांनी याच पावन भूमीत
संत वीर खेळाडू व कलावंत
कलावंत साहित्यिक यांची खाण
महाराष्ट्र देशा कणखर देशा
देशा काय किती वर्णू तुझी शान
इंद्रायणी कावेरी कृष्णा सरिता
सरिता भिमा चंद्रभागा गोदावरी
भाव भक्ति रसाची सदैव वाहे
वाहे याच महाराष्ट्र भुमीवरी
करी वारकरी येथे पंढरीला
पंढरीला विठू नामाचा गजर
विसरूनी देहभान भक्त सारे
सारे माऊलीच्या दर्शना हजर
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा