मंगळवार, ६ डिसेंबर, २०११

man pakhru pakhru/ घायाळ मन/मन माझे / मन( अष्टाक्षरी /मनाशी संवाद मनस्थिती मनस्थिती


 
                                                          मन पाखरू पाखरू
       स्नेहा नुकत्याच झालेल्या स्वत:च्या साखरपुड्याच्या समारंभाचा कोम्पुटर   वर लोड केलेला अल्बमचा  स्लाईड शों पहात होती.आणि बाजूला मराठी गाणी लावली होती .
                                       मी  मनांत हसता प्रीत हसे
                                        हे गुपित कुणाला सांगू कसे ?
गाणे वाजत होते गाणे. गुणगुणत मनाशीच हसत , पुन्हा  पुन्हा  दोघांचे फोटो न्याहाळीत होती. लग्नात कुठल्या प्रकारच्या,कोणत्या रंगाच्या साड्या  घ्यायच्या ,पैठणी कोणत्या  रंगाची घ्यायची, हेअर स्टाईल कशी करावयाची ब्युटी  पार्लरची  अपोईटमेंट कधी ,किती दिवस अगोदर घ्यायची ? हनीमूनला जाताना कोणते कपडे  न्यायचे ? वगैरे विचार करत होती .मनाचे पाखरू इकडून तिकडे बागडत अनेक विचार करत होते .मन  पाखरू थेट लग्न  समारंभा पर्यंत जाऊन पोहचले होते. खरच आहे . असेच असते .मनच  ते.त्याला पाखरू काय उगाच म्हणतात ? पाखरू जसे या फुलावरून त्या फुलावर स्वच्छदाने उडत भरकटत असते.तसेच मन पण या विषयावरून त्या विषयावर उड्या मारत असते. म्हणून तर त्याला चंचल असे म्हटले जाते  ,
        महाभारतात  यक्षाने  युधिष्ठिराला जे प्रश्न विचारले त्यातील एक प्रश्न होता.जगात सर्वात गतिमान काय ? तर युधिष्टीराने  क्षणात उत्तर दिले " मन " , मनासारखे  गतिमान काहीच नाही . क्षणात बसल्या जागी  पृथ्वी  प्रदक्षिणा करून येणारे,तिन्ही लोकात , तिन्ही जगात इतकेच नव्हे तर तिन्ही काळात फिरून येणारे मनच असते .गत जन्माच्या स्मृतीतून गेल्या जन्मात फिरून येते.
       जुन्या आठवणीत मन भूतकाळात जाते. जुन्या वस्तू हाताळताना, फोटो पहाताना मन सहजतेने भूतकाळाशी समरस  एकरूप होते. विचारांनी ,कल्पनांनी ,स्वन्पातून मन भविष्य ,भूत ,वर्तमानात सहजतेने विहरते,बागडते,भरकटते भरारी घेते .
        देवाने माणसाला डोक्यात मेंदू व शरीरात मन बहाल करून खूपच कृपा केली आहे.त्या मनाचा तो राजा असतो. दोन  अक्षरी साधा सुधा वाटणारा शब्द "मन " त्याला किती पैलू आहेत. राग ,लोभ ,द्वेष,भय,  आनंद ,दु:ख मद,मोह मत्सर इत्यादी. या पैलू  मुळेच मनाला भावना प्राप्त होतात .हेच मन माणसाला मस्त मजेत  जगावयाला  शिकवते.हे मन सुंदर ,सुद्दृढ , निर्मल असे असते. त्यासाठी त्यावर चांगली  जडण घडण करावी लागते ..
     लहानपणात मन निरागस असते.त्याला लोभ ,दु;ख ,काळजी , किंव्हा भय वगैरे पैलू  पडलेले नसतात .पुढे जवाबदारी मुळे, मोठे झाल्याने, विशिष्ठ संस्कार धडवून  वा  करून त्या  मनाची जडण  घडण होते. चांगले- वाईट,आपले-दुस-यांचे ,तुझे-माझे,वगैरे भावना स्पर्शतात .मग मनाचा कठोरपणा  वाढतो. दुजाभाव,मोह,स्पर्धा  इर्षा स्वार्थ वगैरे पैलू दिसू लागतात . हेच मन पाखरू , भरकटणारे मन या व्यावहारिक जीवनात रागाने ,द्वेषाने,इर्षेने, स्वार्थाने बसल्याजागी इतरांचा हेवा करते .वाईट चिंतते वा  इच्छ्ते .म्हणूनच इंग्लिश  मध्ये म्हण
आहे ना , empty  mind  is devil work shop                        
    हेच  मन पाखरू  प्रियजनांची काळजी,चिंता करत असतांना कटू प्रसंगी नको नको ते चिंतते.अगदी शत्रू
पण विचार करणार नाही असे वाईट विचार करत रहाते.म्हणून त्या मन पाखरा साठी "मन चिंती ते वैरी पण न चिंती "म्हण रूढ झालेली आहे .तर कधी हे मन पाखरू शेख  चील्लीतल्या गोष्ट्यी सारखे विचारांच्या ढगात गुरफटत भरकटत जाते . "मी हे करीन, मी ते करीन,मग असे होईल, मला असे वा अमुक करता येईल, मला असे काही मिळवता येईल,.मी अमुक करून दाखवीन.' असे विचार करत, विचारांच्या ढगातले मन, काचेचे  भांडे खळकन फुटावे तसे विचारांचे ढग हवेत कोलमडतात .आणि म्हणतात ना  जसे,
"मनातले मांडे मनातच रहातात "
.       यौवनात स्वप्नाळू पणे भविष्याची स्वप्ने हेच मन पाखरू रंगविते. मनानी अनेक प्रवास करते  अथवा केलेली प्रवास ठिकाणे गप्पा गोष्टीतून  पुन्हा फिरून येते .नवीन घर  बांधते ,सजवते ,त्यात मन विसावते सुखावते . आकाशात सूर्योदयी व  सुर्यास्ती जसे रंग बदलतात त्या प्रमाणे मन पाखरूचे रंग क्षणोक्षणी बदलत  असतात .
        स्वप्न म्हणजे पण काय ? दिवस भरात वा  कधी काळी केलेल्या विचारांचे मनाचे खेळ .म्हणून म्हणतात्त  'मनी वसे ते स्वप्नी दिसे ' मनातील विचार अंधुकपणे स्वप्नात दिसतात .
       रामदास  स्वामींनी या  मनास जिंका, त्यावर  काबू  मिळवा याबद्दल "मनाचे  श्लोक" लिहून मनास कसे वळण लावावे .हे उत्तम रित्या सांगितले आहे ..जो मन जिंकतो तो जग  जिंकतो .हे काही खोटे नाही .पण हे मन पाखरू फार चंचल असल्याने त्यावर ताबा मिळविणे फार कठीण आहे. संत लोकांचे वेगळे आहे त्यांचे तृप्त मन जगाला आनंद देण्यासाठी आहे." आर्ट ऑफ लीविग" अथवा योगशिबिरातून पण आज काल थोडा  फार मनावर  ताबा काबु मिळवण्याचे प्रयत्न  आपण करतो .
      यश ,वैभव आनंद ,प्रेम मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात .पण आपणास हे प्रयत्न करण्यास आपले मनच  उद्युक्त करत असते .यशस्वी आयुष्य जगण्यासाठी जिद्द हवी असते. धैर्य हवे असते .आत्मविश्वास हवा असतो. आणि हे सारे आपल्या मनातच असते.  आपल्याला जे हवे असते ते मनच आपल्याला देऊ शकते. मन आपल्याकडे खूप  काही सतत मागत असते, पण या  मनाकडे  आपणही खूप काही मागू शकतो .म्हणून हे मनच प्रसन्न झाले तर आपण हवे ते मिळवू शकतो. म्हणूनच म्हणतात ," मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे साधन " तेव्हा या भरकटणा-या  मनास प्रसन्न करणे आवश्यक आहे .मन प्रसन्न तर सर्व काही प्राप्त होते .
    
  

अभाशम ठाणे जिल्ला समूह 1
उपक्रम 
विषय - घायाळ मन

मन असते कोमल
दुखावते  ते सहज
विचारांती बोलावे
समजून बोलणे गरज

शस्त्र  करीती इजा
होते  उपाये ती बरी
पण शब्द करी घायाल
औषध काम न करी

फुलापरी  असे मन
सदा तयास  जपावे
दुःखद वार्ता कानी
सैरावैरा मन धावे

पहाता भीषण प्रसंग
मन होतसे  उदास
काही वेळा साठी
वाटे मनास भकास


मन करु नये घायाल
 त्रास होतसे जीवास
स्मरताची  ईश्वरास
शांति मिळे मनास


वैशाली वर्तक 






कवी संजीव प्रतिष्ठान
आयोजित 
कवी संजीव काव्य लेखन स्पर्धा2022
विषय - मन माझे  मन माझे

 * संतृप्त मन*


मन   माझे कोमल
दुखावते ते सहज
विचारांती मी बोलते
समजून बोलणे गरज

  मन  अल्लड बालपणी
होता  मातीचाच गोळा
मायबापांच्या  संस्कार कृपे
 आज आनंदाचा सोहळा

होता कळीचे फूल माझे
मन धावे सुसाट वा-यापरी
 भूईवर तर क्षणात नभी
आवरू न शके आजवरी

मन झाले शब्दांचे पाखरु
धावे लेखणीतूनी क्षणा क्षणा
नाना रसातूनी न्हाऊन ते
आनंद देते जना मना


पहाता  भीषण प्रसंग
मन  माझे होतसे  उदास
काही वेळा  साठी तर
भासे मनास भकास


अनुभवे जाता काळ
 मन संतोषी आनंदले
प्रसन्नता लाभे जीवा
 हर्षे मन विसावले

वैशाली वर्तक 
अहमदाबाद  (  गुजरात)








अधीर मन*


ध्यानी मनी स्मरे तुज
तुझ्या  नामाचे रटण
 राहो तुझे रुप चित्ती 
सदा करिते स्मरण


मुखी घेता तव नाम
विसरते देहभान
आसावला जीव वेडा
गाते तव गुणगान    


तुझ्या नामाचा गजर
चाले सदा   क्षणो क्षणी
   आसावला जीव वेडा
  आस दर्शनाची मनी


माते तव दर्शनाला
मन माझे आतुरले 
कधी पाहीन तुजला
मन माझे अधीरले


 
मन माझे आनंदेल
प्रसन्नता लाभे जीवा
तव रूप पाहुनिया  
आसावल्या वेडा जी

 आस लागली अंतरी
आले आता मी शरण
आसावला जीव वेडा
दाखवावे तव चरण

वैशाली वर्तक 

अहमदाबाद





  ओळ काव्य -मज राहवले नाही


   शीर्षक - *ओढ*


भेट आपुली  पहिली

 *मज  नाही राहवले*

माझ्या  विचलित मना   

तूची   मज सावरले           1



पहिल्याच भेटीतला

वाटे अश्वासक   स्पर्श 

 दिले अनामिक सुख

देतो मना सदा हर्ष            2


छंद तुला  बघण्याचा

कसे आवरु मनाला

तुझाओझरता स्पर्श 

वेड लावितो जीवाला        3 


गंध तुझ्याच  प्रीतीचा

सदा   रहातो अंतरी 

रोज वसंत फुलेल       

 विश्वासाने ऊर भरी           4


सख्या येता सांजवेळ

उजळती आठवणी

मज नाही रहावले

प्रीत गंध स्मरे  मनी          5                             



LMD 37


आधीर मन

मन माझे  झालेअधीर
सदैव तुला भेटण्यास
कधी येशील जवळी
सांग माझ्या  मनास

   मनास छंद तुज पहाण्याचा
कसे आवरु  मम मनाला
तुझाओझरता स्पर्श 
वेड लावितो जीवाला 

तव रूप पाहुनिया  
मन माझे आनंदेल
प्रसन्नता लाभे जीवा
हर्षे मन विसावले

81414







अ भा ठाणे जिल्हा समूह 1
आयोजित उपक्रम क्रमांक
4/4/23
विषय. मनाशी संवाद 

मनाशी  साधवा संवाद
जातो त्यात वेळ जरा
मिळता निवांतात वेळ
मनःशांती साठी  उपाय बरा. 

उघडावे अनुभवाचे गाठोडे
गतकालीन चुका सांगे मन
मिळे प्रेरणा सुधारण्या
उज्वल भविष्य दावी क्षण

संवाद मनाशी  साधता
मन रंगवे   स्वप्ने सप्तरंगी
करण्या पूर्तता विचार मालिका
सहज तरारते  अंतरंगी

 जसे स्वरूप दावी दर्पण
   साधिता मनाशी संवाद
 अंतर्मन होई निर्मळ
 नुरे मग वाद विवाद.

वैशाली वर्तक
अहमदाबाद
 





      कल्याण  डोंबिवली महानगरसमूह 2 आयोजित  उपक्रम
5/7/22
विषय - मन माझे फुलपाखरु

       झाले मन पाखरु

मन  असतेच पाखरु
जसे फुलपाखरु चंचल
क्षणा क्षणाला भिरभिरे
 मनही असते चपळ

पाहूनी फुल-पाखरास
मन माझे  आले फिरुनी
गतकाळातूनी वर्तमानी
काळ सरला नजरेतूनी

घर बसल्या  मन फिरले
उगा का वदताती जन
न  आवरे आवरिता
त्याच स्थितीत होते मम मन

मिळाला थोडा विरंगुळा
मनाने  केले मनोरंजन
हेच तर  त्याचे  असे लक्षण
आनंदात जाती काही क्षण

वैशाली वर्तक 
अहमदाबाद



          अ भारतीय मसाप ठाणे जिल्हा 2
आयोजित उपक्रम
विषय.. मनस्थिती मनस्थिती 

जशी घडते घटना 
मन होई विचलित
नाचे मन आनंदाने
मन विभोर  होते  खचित

 येता प्रसंग तो बाका
मनस्थिती भयभीत
काही सुचेना क्षणभर
काय करावे अवचित

सुख दुःखाचा जीवनी
चाले  सदोदित खेळ
पण ठेवता मन शांत
साधावा लागतो मेळ

 रामादासांचे  मनाचे श्लोक
 अशा वेळी येती कामी
मनस्थिती शांत राखण्या
पठण श्लोकांचे युक्ती नामी

वैशाली वर्तक
अहमदाबाद



मराठी साहित्य  मंडळ गुजरात प्रदेश  आयोजित  काव्य लेखन स्पर्धासाठी
विषय -- **मन हे फुलपाखरु*



मन कधीच न असे दृश्य
तरी मन दावी तयाचे महत्त्व
जन म्हणती ते वसे हृदयात
  कर्मातूनी दिसे त्याचे अस्तित्व .

मन असे बुध्दी च्या कह्यात
तना करवी, काम होई क्षणात
 येता विचार , मन धावे सैरावैरा
नसे कोणी तयासम गतीशील जगात.


पाखरु असे मन सदा चंचल
फिरुन येती जरी बसता घरी
भिरभिरे फुला वरुनी त्या फूली
 येई फिरुनी क्षणार्धात  जगभरी.

मन ठेवावे सदा निर्मल
न जडावे तयास  मनो-विकार
काम क्रोध मोह माया लोभ पासूनी
दूर रहाण्या, करावा सद् विचार

मन ठेवावे  सदा काळ प्रसन्न
मिळते तयातच समाधान
सर्व  ईच्छा वसती मनातच
तेचि सर्व  सिध्दीचे   साधन

वैशाली वर्तक
अहमदाबाद 
गुजरात

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...