बुधवार, ६ सप्टेंबर, २०१७

गडबड

                   गडबड                            ४/९/२०१७
      करू नका जरा ही "गडबड"
      देती आदेश सतत वरचेवर
      पण सणवार वा कार्यात काय?
      गडबड होतेच ना ऐनवेळेवर ,
             न सांगता, न बोलता, होतेच गडबड

      बाहेर   गावीं    जाण्यास
      करुनी तयारी तपशील वार
      विचाराने संपविता , सर्व काम
      पण, विस्मृती करतेच  गडबड
             अन् ,शेवटक्षणी उडते तारांबळ.

      कार्यक्रमाचे करुनी आयोजन
      सगळे असता नीट सुसज्ज
      पण, अध्यक्ष महाशयच
      न आल्याने ,ठरल्या वेळेवर
           खोळंबा होऊन, शेवटी पुन्हा.... गडबडच
 
      अचानक येता पावसाची सर
      झाली गडबड ,माजला की गोंधळ
      छत्री असूनी दिसेना जागेवर
      ओले होणे ,आले जीवावर
             वस्तूची किंमत कळते त्या वेळेवर .
 
       गडबड ही कृतीच अशी
       जी केल्या नंतर , वाटे मनीं
       उगाचच केलीना,गडबड घाई
       जरा ,उसंत असता धरली
             झाले नसते का, काम  पटकनी?

        गडबड ही स्वतःच स्त्रीलिंगी
        तिचे वर्चस्व सदा दावी
       कितीही करूनी जय्यत तयारी
       धांधरट पणा हा  तिचाच  साथी
             ऐनवेळी चुकाच घडवी.
     
        गडबड ही कृतीच अशी
       जी केल्या नंतर वाटे
        उगाचच केली ना  गडबड घाई!

                       वैशाली वर्तक

रिकामा

                     रिकामा
   चिमण्या  पाखरे गेली परदेशात
   मिळविण्या उच्च शिक्षणास
   तेथेच रमली , डाॕलरच्या दुनियेत
   घरे  तयांची , येथे ओसाड
                  आजीआजोबांना सदैव  भेटीची आस.
   प्रसंगावत येतात पाखरे
   नंदनवना परि सजती घरे
   जेव्हां परातती   पाहुण्यापरी
   ओकी दिसती तयांची घरकुले
                  पाणावती नयने तयांच्या आठवांने
   आलो जरी या जगती
   आपण सारे रिक्त हस्ते
   कमविले  धन मुठी-मुठी भरुनी
   परतणे येथून  रिकाम्याच हाते
              स्थान मात्र मिळवावे अनेक हृदयांमधे
   चांगल्या विचारांची  वेसण
   हवी रिकाम टेकड्या मनास
   मग येत नाही  म्हणण्यात
   रिकामे मन , घर सैतानाचे खास
               बोलणे नुरते तुंबड्या लावी उगाच
   अर्धा भरलेला पाहूनी ग्लास
   भरावा हा पूर्ण , हीच आस
   पण असा विचार न येई मनीं
   तो पूर्ण  रिकामा तर नाही  ?
              समाधानी वृत्ती असावी सदा मनात
   खरेदीला जाता रिकामे पाकीट
   ठरते असून नसल्यागत
   पण आजकालच्या युगात
   प्लास्टिक मनी भरले तयात
              पाऊले  चालती काळाच्या ओघात
         
             .........  ..........  वैशाली वर्तक        

शुक्रवार, ४ ऑगस्ट, २०१७

श्रावणधारा

                         श्रावणधारा                                             
           गुजरातचा पाऊस फारच लहरी, मृग नक्षत्राची ७ जून तारीख सरून  गेली  तरी पावसाला त्याच्या येण्याची फिकीरच नसते. अहो ! 7 जून काय ? 7 जूलै झाली तरी कित्येकदा पत्ता च नसतो .तसा वळवाचा, गारांचा पाऊस पडून जातो म्हणा कधीतरी.   
         पण , साधारण पणे , श्रावण मासात सर्वत्रच सरीवर सरी पावसाच्या येऊ लागतात.  आषाढातील पावसाने सृष्टी हिरवळी जाते  . ग्रीष्माने, आलेले सुकेपण, रुक्ष पण ,निस्तेजता जाऊन  पावसाच्या आगमनाने सृष्टी कशी तरारलेली असते. हिरवागार शालू नेसल्यागत दिसते.आणि कुसुमाग्रजांच्या कविते प्रमाणे ,"हसरा नाचरा जरासा लाज-या " श्रावणात तर, निसर्गाचा एकच रंग दिसतो तो म्हणजे हिरवा आणि म्हणूनच तर ऋतू हिरवा म्हणून संबोधला जातो. झाडे स्वच्छ धुतली गेल्याने मस्त हिरवीगार दिसतात. आपण आपल्या घरच्या रोपांना ,झाडांना  कितीही पाणी घाला ,पण नैसर्गिक पावसाच्या पाण्याची त्याला सर येत नाही.    
         पण ,खर सांगू ? मला तर या श्रावण सरींचे वा पावसाळ्याचे जराही कौतुक नाही. तुम्ही म्हणाल काय अरसिक बाईआहे. अहो! पण आमच्या  सोसायटीत की नाही पाणी भरते .बाहेरचे रस्त्यावर चे पाणी आत येते. जरा 2/4 इंच पाऊस पडला की झाsssले. जरा कुठे पावसाचा आनंद लूटत असता बाहेरचे पाणी आत येऊ लागले  की पावसाची मजा  जाऊन टेंssशन मात्र वाढते . कवितेतून ,पुस्तकातून, साहित्यातून, कवी मनातून श्रावणसरींची किssती कौतुक वाचलीत  तरी प्रत्यक्षात पाऊस , पाऊसानंतर पाणी तुंबणे , घरात तर पाणी येणार नाही ना याची धास्ती.व घरात पावसाच्या पाण्याने येणारी  ओल या सर्व गोष्टीेंमुळे  पावसाचे येणे, म्हणजे दडपणच  वाढविते.   
        नुसते काळ्या ढगांनी भरून आलेले आभाळ, ढगांचा कडकडाट , थंडगार वारे , ओल्या मातीचा  सुगंध हे सारेssसारे काही सुखद वाटते. अशावेळी की नाही, घराबाहेर मागच्या  अंगणात  वा पुढे झोपाळ्यावर , ओट्याच्या कट्टयावर वा  बाल्कनीत  बसून, हातात मस्त  वाफाळलेला कॉफीचा कप तसेच जोडीला टॕब वा मोबाईल घेऊन   whatsapp चे msgs वाचीत बसावे व त्या वातावरणाचा उपभोग  वा मजा   लुटत बसावे अशी तीव्र ईच्छा होते.पण जर, मेघराज गर्जना करत बरसायला लागले व पाऊस वाढला व बाहेरचे पाणी सोसायाटीत घुसू लागले  तर या श्रावण सरी ज्यांचे आपण आता गुणगान करतोय ना ,त्यांचा  जोर वाढला तर , "देवा बस कर रे बाबा हा पाऊस, आवर घाल या श्रावण सरींना. नको हा पाऊस ." असे विचार  मनात येतात आणि त्या वाढत्या पावसाने पाणी घरात  येईल  तर ? या विचाराने जीवाची घालमेल सुरू होते.        
        तसे तर जून महिन्यातच घराच्या entance ला भिंत घातली जातेच.लहान रांगतीमुले घराबाहेर जाऊ नयेत म्हणून भिंत घालतात ना?तशी .बाहेरचे पाणी आत येऊ नये म्हणून सोय करण्यात येतेच .       
         बर हा  पाऊस दिवसा असेल तर ठीक. आणि जरी ही दिवासा पाऊस असला व वाढला की लगेच मुलाचा , सुनेचा  आॕफीस मधून फोन खण-खणणू लागतात, "आई, येथे पाऊस फार आहे .आपल्याकडे कसाकाय? पाणीतर भरू लागले  नाही ना? " एवढेच काय माझ्या इंजीनीअर मुलाने तर बाथरूमला खास दट्टे बनवून घेतले आहेत . त्या मुळे बाहेरचे पाणी वाढले तरी गटर बॕक मारीत नाहीत.तर सांगयचे की त्यांचे ,मुलांचे  विचारणे सुरू होते दट्टे घट्ट लावलेत का? तपासून पहा  म्हणून. आणि पाऊस रात्री  असेल तर मग काय ? मंगळागौर नसतांना पण जागरण करणे  आलेच. बाहेर व-हांड्यात वारंवार जाऊन, पाणी येऊ लागले का ? पाण्याची लेव्हल वाढत तर नाही ना? सतत पहाणे. चालूच रहाते. धड झोप पण  निवांत मिळत नाही.        
   अरे हो !पाणी भरणे यावरून आठविले . परवा भिशीत ,पुढची भिशी कोणाची  तर ही आपली अपर्णा लगेच म्हणाली, "ए मी आॕगस्ट च्या पुढे भिशी घेईन ह .कारण  माझ्या  flat खाली भरपूर गुडघा भर पाणी जमते , मग कशा येणार तुम्ही  ? या वैशालीचे ठीक आहे येईल दोन चार हात मारत ," त्यावर मी तिला म्हटले ,"तुझे ठीक  आहे ग ,तू वर रहाते.आमचा तळमजला. त्यामुळे  एकदा दोनदा तरी पावसाळ्यात, काश्मिरला न जाताच शिकारात रहाण्याचा अनुभव घेतो.आणि सरी थांबल्या व पाणीओसरले की मग काय ? तळमजला त्यामुळे सर्व जण कामास लागतो.त्या पावासाच्या पाण्याने अंगण , घरासमोर  , मागचे आंगण वगैरे सफाई काम करावे लागते ते वेगळेच. पण काय करणार ?श्रावण सरी तर  बरसल्याच पाहिजेत ना!  
      पण, मला काय वाटते ? इंद्राच्या दरबारात एक application च करावी. लिहावे अन् सांगावे की अरे बाबा रोजचा एकच इंच पाऊस पाड म्हणजे पाणी पण जमिनीत मुरेल,व ज्यामुळे बोअरच्या पाण्याचा प्रश्न रहाणार नाही.व महत्त्वाचे श्रावणसरींचा आनंद लुटता येईल आणि असाही गुजरातमधे सरासरी 30 ते 35 इंच पडतो. म्हणजे काय? लहान पणी आपण पत्त्यांचा पांच/ तीन/ दोन डाव खेळ खेळायचो ना? त्यात जेवढे आपल्यास डाव  करावायाचे असायचे तेवढे झाले की म्हणायचो ना? माझे झाले बाबा पोटापाण्या  पुरते डाव .तसे इंद्र सरकारला सांगावे  रोज एकच इंच पाऊस पाड.मग श्रावण सरींचा आनंद लुटता येईल मजा घेता येईल . पण  इंद्र दरबार वा सरकार  काय आपली स्टेटअकांउट आहे? ठराविक रक्कम प्रमाणे  रोजचा एक इंच पाऊस withdrawalकरता यायला . रोज 1"  पाऊस पाडायला.?

शनिवार, २९ जुलै, २०१७

मी अनुभवलेला सिंगापूर

    
       सन  2001  मी बँकेतून VRS घेण्या आधी आम्ही दोघांनी बँकोक, पटाया , शेवटी 7 दिवस सिंगापूर अशी सहल आयोजित केली होती. ते आमचे पहिले सिंगापूर दर्शन . पण तेव्हा फक्त हाॕटेल मधे राहून सिंगापूरची पहाणी झाली . तोंड ओळख झाली .कारण हाॕटेल मधे राहून तेथील लोकांची  रहाणी करणी जीवनशैली याची काहीच कल्पना येणे शक्य नसते. पण सचिन ची (मुलांची ) बदलीच सिंगापूरात झाल्याने सिंगापूरामधे वास्तव्य करावयास मिळाले. व आता तर दरवर्षी २महिने सिंगापूर मधे येतो. आणि दरवर्षी चला" मामाच्या गावाला जाऊया"म्हणतात तसे दरवर्षी चला "सचिनच्या सिंगापूरला जाऊया" म्हणत नित्य नियमित रहावयास येतो.
         खरच , सिंगापूर एक तर भारता पासून तसे जवळ .अहमदाबाद पासून पाच - साडेपाच तासांच्या अंतरावर. सिंगापूर सुरेख ,सुंदर , शिस्तीचे अन् सोपे.सोपे  एवढया  साठी की  आमच्या सारख्या कधी तरी रहायला येणा-यांना तसेच वरिष्ठ नागरिकांना जर पत्ता नीट माहित असेल तर हिंडण्यात, फिरण्यात कठीण पणा भासत नाही .तसेच transportation  सोय पण फारच छान. प्रत्येक cluster च्या वा रहात्या घराच्या जवळच शक्यतो MRT वा बस स्थानक असतात,  त्यामुळे कुठेही जाणे सहज सुलभ होते. .तसेच जीवन पण  रहायला सुरक्षित आहे.
        कुठे ही नजर टाका, 5/25 झाडे नजरेसमोर येतात. सर्वत्र हिरवळ
पसरलेली . Vertical plantation नजरेस येते.  मध्यंतरी मी सिंगापूरात असतांना आमच्या येथील  चारोळी ग्रुप वर " असेच काही तरी येते माझ्या मनीं" म्हणून चारोळीचा विषय होता .तर लगेच माझ्या मनांत येथील  हिरवळ पाहून विचार सुचला.
                  असेच काही तरी येते माझ्या मनीं
                  दिन सिंगापूर सोडण्याचे  येता जवळी
                  घ्यावी डोळा भरूनी येथील  हिरवळ
                  जीवास देत राहील गारवा वर्षे भर.
  असे सदा हरित सिंगापूर सर्वांना आर्कषित करणारे आहे.
             तसेच सिंगापूर मधे येथील सिंगापूरीयन लोकात,   आपल्या भारतीयां सारखी एकत्र कुटुंब पध्दती पहावयास मिळते. जेव्हा मी नातीला शाळेच्या  बससाठी सोडायला जाते. तेव्हा एखादी तरी आजी वा आजोबा नातवा बरोबर सोडायला आलेले दिसतात. एक मात्र गोष्ट जाणविली. कीं सिंगापूरीयन बायकांना आपल्या सारखे सबंध दिवस स्वयंपाक घरात रहावयास आवडत नसावे.  ठिक- ठिकाणी food court दिसतात. आॕफीस मधून परत येतांना ब-याच जणांच्या  हातात तयार फूड पार्सल दिसतात. त्यामुळे त्यांच्या  स्वयंपाक घरात उगाचच वर्दळ नसते. 
              इथे कपडे वाळत घालण्याची सोय  मात्र फारच भयानक आहे.अर्थात घरात पण स्टाँड अथवा दो-यां वर कपडे वाळत  घालता येतात . तरी पण काही HDB मधे ती बांबूवर  कपडे वाळत घालण्याची सोय धोकादायक वाटते.
            तसेच येथील लोकांच्यात स्त्रीदाक्षिण्य आहे, तसेच वरिष्ठ नागरिकांना मान देणे हे पण प्रामुख्याने दिसते. वरिष्ठांना Metro वा बस मधे जागा देणे . वगैरे शिष्टाचार ते छान  पाळतात. रस्त्यावर पण ,कोणास  जिथे जावयाची याची कल्पना नसेल, अजाण असतील व  विचारले तर योग्य  माहिती सांगण्यात मदत करतात.  आणि वस्तूंची उपलब्धता म्हटली, तर आपल्या भारतीयांच्या सर्व साधारण लागणाऱ्या नित्य उपयोगी वस्तू पण मिळतात.
          या सर्व गोष्टींचे निरीक्षण सिंगापूरातील वास्तव्यात करता आले , तसेच संस्कृती दृष्टा सिंगापूरात दरवर्षी सर्व भारतीयांचा एक कार्यक्रम  असतो .तेव्हा भारताच्या सर्व प्रादेशिक  लोकांना , त्यांच्या त्यांच्या संस्कृती व कलेचे दर्शन घडविणारा कार्यक्रम असतो.  भारतातील सर्व प्रादेशिक लोक तेथे   आपापल्या नियत केलेल्या  जागी संस्कृती ची झलक दाखवितात. आम्ही एकदा तिथे असता आपल्या MMS ने सत्यनारायण पूजा , नूतन वर्ष गुडीपाडवा बद्दल  प्रत्यक्षात   गुडी उभारून, तसेच गणपती उत्सव, दही हंडी , दसरा ,दिवाळी सणांची  पोस्टरस् लावून सण व उत्सवांचे दर्शन घडविले होते .
         त्याच कार्यक्रमाच्या वेळी माझी श्री  माधवजी भावे यांची भेट झाली. सचिनने (माझ्या मुलाने) त्यांची  ओळख करून दिली. व शब्दगंधची माहिती करून दिली. त्यांनी पण मला सविस्तर शब्दगंध दर महिन्यास दिलेल्या विषयांवर एकेकाच्या  घरी होतो. पण त्या वर्षी आम्ही सिंगापूर पहाण्यात व्यस्त असल्याने शब्दगंध ला हजर नाही राहू शकलो. पण दुस-या वर्षी  सिंगापूरात येताच मात्र ,श्री केळकरांकडे मी पहिल्यांदा शब्दगंध ला आले. मग मात्र मला नियमित  email व्दारा विषय कळू लागले . यात सांगावयाचे हे की सिंगापूर शब्दगंधने  माझ्यातील कवी मन जागे केले. तसे आम्ही भारतात विविधा ग्रूपवर  हस्तलिखित काढतो.पण दर महिन्यास विषय देऊन  सिंगापूर शब्दगंधाने माझी कल्पना शक्ती जागृत केली. आता तर असे झाले आहे की आम्ही सिंगापूर मधे आलो की आवर्जून शब्दगंध ला हजरी लावतो. सर्वांच्या  कविता ऐकून मजा तर येतेच तसेच प्रत्येकाच्या काव्य  शैलीचा आस्वाद घेता येतो.मी सिंगापूर शब्दगंधची खरच ऋणी आहे. कारण शब्दगंधनी मला त्यांच्यात समावून घेतले.
       तसेच आपले सिंगापूर महाराष्ट्र मंडळ ,मराठी संस्कृती टिकविण्यात फार सक्रिय आहे. भारता बाहेर पण आपली मराठी भाषा जीवंत ठेवण्यात
मंडळाचा भरपूर वाटा आहे.तेव्हा असे भाषा व संस्कृती प्रेमी लोक सिंगापूरात असता मराठी भाषा व संस्कृती ला नक्कीच कधीच मरण नाही.
         

शुक्रवार, २१ जुलै, २०१७

गाव

गाव
काल मी पाहिला स्वप्नात एक गाव
कल्पलेला होता, जसा माझ्या मनात
        चारी बाजूस तटबंदी डोंगर-माळ
         जणू सज्ज  उभी तयाच्या रक्षणास
तटबंदी टेकड्यांची, गट्टी जमे ढगांशी
खेळताना मुसळधार ,पाऊस पाडण्याची
     सर्वत्र डोलती हिरवी गार शिवारे
     वा-याच्या झुळके वर नाचती माळराने
 कृषीवल फिरवी समाधानी नजर
 बैलांना झाली होती चा-याची चंगळ
            शेतात लागलीय    धान्याची   रास          
            बैल गाड्या घेतील बाजारपेठत धाव
  नजरेस नव्हते सिमेंट चे जंगल
  टुमदार कौलारू घरे होती सुंदर
            कोठे दिसत नव्हते वीजेचे जाळे
             रात्री चमकणार होते आकाशात तारे
 सारे  गाव कसे  स्वच्छ अन् निर्मळ
  प्रदूषणला  कुठे नव्हता , थारा कणभर
            काल मी पाहिला स्वप्नात एक गाव
             कल्पलेला होता जस्सा माझ्या मनात
                               .......वैशाली वर्तक

गुरुवार, २० जुलै, २०१७

धीर धरि धीर धरी

                  धीर धरी धीर धरी                    ९/४/१७
प्याला विषाचा देता राणाने,
सहज केले प्राशन मीरेने.
तारण्या असता तिचा  हरी,
 धीर धरी धीर  धरी.

ग्रीष्मा नंतर बरसत येती,
पर्जन्य  धारा अमृत रूपी.
गोमटी फळे मिळतील मोठी,
धीर धरी धीर धरी.

पाल्यांना शिक्षीत करूनी,
देशला ने प्रगती पथावरी.
सरकार दत्त असता सवलती,
धीर धरी धीर धीरी

 रजनी अंती येते रम्य उषा,                       
भगीरथ परिश्रमाने बळीराजा.
सुगीचे दिन येतील धरेला,
धीर धरी धीर धरी.

असता उभा विठ्ठल  पाठी,
तुकयाच्या गाथा तारिल्या जळीं
सदा असू दे विठू नाम मुखी,
धीर धरि धीर धरी

जीवन नौका करण्या पार,
प्रभू रामराया सदा तयार.
 कसली खंत धरीशी मनी  ,                                   
धीर धरी धीर धरी.

                                    वैशाली वर्तक.      

रविवार, १८ जून, २०१७

स्वभाव

स्वभाव                                        14/6/2017

   रूप म्हणे मनाला,
  "माझ्यामुळेच सर्व
   वाखाणती  मानवाला
   जिकडे तिकडे माझीच वाहवा
   सर्वत्र माझ्याच सौंदर्याची चर्चा"

   मन म्हणाले ," नाही रे रुप.
  "माझ्यात दडलेली ,भरलेली वृत्तीच
   ओळखली जाते स्वभाव म्हणून.
   अन् स्वभावाने जो उजवा ,
   वाखाणला जातो सर्व लोकांत"

   असती त-हा ,अनेक   स्वभावाच्या ,
   म्हणूनच वदती, "जितक्या व्यक्ती वल्ली तितक्या"
   कधी तापट तर कधी मवाळ
   संकुचित तर , कोणी दिल-खुलास
   घडते दर्शन त-हांचे वृत्तीतून
   वाणीतून , व्यवहारातून वा वर्तणुकीतून.

    कोणी स्वभावाने असे भोळा-भाबडा,
    तर कधी जसा लबाड-कोल्हा.
    असतो भित्रट , जणू ससा कोणी,
    कशाचे धाडस नसे अंगी,
    भितीचे सावट, वसे सदा मनीं.

    असे स्वभाव दिसती प्राणी-मात्रात
    स्वभावाने असता हाडाने-गरीब
    म्हणती तिजला जणू गाय-गरीब
    काही वृत्तीने  उदार , दानी-दातार
    जसे  नांव  कर्णाचे,दानवीर महान,

     जे असते आपणा जवळी
     ते सोडूनी , धावे नसत्या पाठी
     अशी वृत्ती पण दिसे स्वभावी
     असावी  सदा वृत्ती मात्र समाधानी.

     स्वभावाची जडण घडण होते बालपणात
     जसा होतो  मानव मोठा, ज्या त्या वातावरणात
     परिस्थितीने  बदलते रूप स्वभावाचे
     मिळता धडे-बोल आयुष्यात अनुभवाचे.

     "रे रूपा , तू तर बदलत राहशी,
     "स्वभाव" मात्र जीवनभर साथ देई,
     जोडून ठेवी जनांशी-आप्तांशी
     सहजपणे  जोडला राही विश्वाशी.
         
       वैशाली वर्तक

अलिप्तता व दुर्लक्षता

अलिप्तता आणि दुर्लक्षता. तसे पहाता दोन्ही   प्रवृत्ती.वेगवेगळ्या आहेत.  .मनुष्याच्या स्वभावाची जडण घडण ही  तो लहानाचा मोठा   होतो.          ...